मराठी चित्रपट आशयघन होत चालले आहेत अशी चर्चा असताना गेल्या चार पाच वर्षात या चित्रपटांना आडवळणी वाटावीत अशी शीर्षके देण्याचा एक प्रवाह अवतरला. 'फुंतरु', 'बंदुक्या' अशा आडवळणी नावांचे चित्रपट गेल्या काही महिन्यांत झळकले आहेत. याच प्रवाहातील नवा चित्रपट म्हणजे 'उबुंटू'. जरा वेगळे शीर्षक देऊन प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणे हा एक उद्देशही त्यामागे असू शकतो. 'उबुंटू' हे नाव ऐकल्यावर हे नेमके काय बुवा? असा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.
जागतिक स्तरावरील मानवतेला जोडणारा बंध म्हणजे 'उबुंटू'. मानवतावादी विचारांचे तत्वज्ञान प्रभावीपणे मांडण्यासाठी आफ्रिकेत 1980, 1990च्या दशकात उबुंटू हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जाऊ लागला. दक्षिण आफ्रिकेचे महान नेते नेल्सन मंडेला यांच्या कार्याशी 'उबुंटू' हा शब्द अशारितीने जोडला गेला आहे की, 'उबुंटू' म्हटले की मंडेलांचे कार्य अशी दुसरी पर्यायी ओळखही या शब्दाला मिळाली. मानवतेशी जोडणाऱ्या 'उबुंटू'च्या तत्वाचा गाभा आपल्या चित्रपटातून दिसावा या उदात्त हेतूने अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी त्याच शीर्षकाचा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे.
पुष्कर श्रोत्री व प्रसाद ओक या दोघांनी मिळून 2009 साली `हाय काय नाय काय' हा विनोदी मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेमच प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आठ वर्षांनी प्रसाद ओक यांनी त्यांचा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे `कच्चा लिंबू'. प्रसाद ओक यांच्या उत्तम दिग्दर्शनाचे कौतुक झाले पण 'कच्चा लिंबू'ला प्रेक्षकांनी अगदी क्षीण प्रतिसाद दिला. प्रसाद ओक यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपट दिग्दर्शनातील जोडीदार पुष्कर श्रोत्री यांनी 'उबुंटू' दिग्दर्शित केला तो त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट. परंतु 'उबुंटू' बघितल्यानंतर हाती फक्त निराशा आणि निराशाच येते.
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा आणि बरंच काही..
कथा
उबुंटू चित्रपटाची सुरुवात होते ती ढोबळेवाडी गावातील जळणाऱ्या गंजीच्या दृश्याने. अण्णा नावाच्या गृहस्थाच्या शेतातील गवताची गंजी जळतेय असे पाहून खूप लोक तिथे जमा होतात. ही गंजी कशी जळाली असेल याचा तर्कवितर्क सगळे करत असतात. त्यात शोध असा लागतो की, अंतवक्र, बर्हिवक्र भिंगाचा प्रयोग करताना ढोबळेवाडीच्या शाळेचे विद्यार्थी एका कागदावर भिंगातून सूर्यकिरण एकत्रित करण्याचा प्रयोग करत होते. त्यातून कागदाचा तो कपडा जळाला. हवेने जवळच्याच गंजीवर उडाला व घेतला पेट गंजीने. विद्यार्थ्यांच्या प्रयोगातून झालेल्या नुकसानीने ढोबळेवाडीचे सरपंच व गावकरी मुलांवर नाराज होतातच शिवाय ते या गोष्टीचे सारे खापर या विद्यार्थ्यांना शास्त्रीय ज्ञान मिळावे म्हणून प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यावर फोडायला निघतात.
ढोबळेवाडी हा गाव तसे दुर्गम भागात आहे. तिथे मोबाइलची रेंज व्यवस्थित मिळणे हे देखील कधीकधी मुश्किल होऊन बसते. त्याचप्रमाणे गावात बाहेरुन येणाऱ्या एसटींची संख्याही अगदी तुरळक. अशा या ढोबळेवाडीत असलेली शाळा आहे एकशिक्षकी. आपल्या लहानपणी खूप खडतर अवस्थेत शालेय शिक्षण घ्यावे लागले, तसे इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये या विचारापोटी ढोबळेवाडीतील शिक्षक ध्येयवादाने तिथे शिकवत असतात. शाळेमध्ये पटसंख्या खूपच कमी आहे. जेमतेम पंधरा विद्यार्थी शाळेत येतात. सरकारी नियमानूसार 35 विद्यार्थी संख्या असली तरच ही शाळा चालू ठेवली जाऊ शकते अन्यथा ढोबळेवाडीची एकशिक्षकी शाळा बंद करुन या गावापासून आठ किमीवर दूर असलेल्या एका गावातील शाळेत विद्यार्थ्यांना पाठवावे लागणार असते. नेमके या वस्तुस्थितीकडे गावचे सरपंच लक्ष वेधतात. शाळेत विद्यार्थ्यांची आवश्यक संख्येइतकी उपस्थिती नसेल तर शाळा बंद करावी लागेल असा इशाराही स्पष्टपणे सांगतात.
कथा
शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकाला काही दिवसांची मुदतही सरपंच व गावकऱ्यांकडून दिली जाते. इथे चित्रपटाच्या कथानकाला वेगळे वळण मिळते. ढोबळेवाडीची शाळा बंद पडू नये म्हणून प्रयत्नांची शिकस्त करण्याचे शिक्षक व शाळेतील विद्यार्थी ठरवितात. नेमके इथेच कथानकाला वेगळे वळण लागते. या शाळेतले एकमेव शिक्षक मुलांना विविध विषय शिकवत असतात. भूगोल हा विषय शिकवताना ते मुलांना उबुंटू या संकल्पनेचा परिचय करुन देतात. जागतिक स्तरावरील मानवतेला जोडणारा बंध म्हणजे उबुंटू. याच तत्वाचा आधार घेऊन एकमेकांना सहाय्य करुन आपण शाळेला कायमचे बंद होण्यापासून वाचवायचे असा विचार हे विद्यार्थी करु लागतात. हे देखील मानवतेचेच कार्य आहे हे या मुलांच्या मनावर ठसलेले असते.
या विद्यार्थ्यांमधे अब्दुल हा हुशार विद्यार्थी असतो. त्याची बहिण सलमा ही देखील शाळेत येत असते. अचानक हे दोघेही शाळेत यायचे बंद होतात. अब्दुलला त्याचा मामा सांगलीला त्याच्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी घेऊन जातो. दुसऱ्या बाजूला सलमाचे लग्न तिची आई ठरविते. हे लग्न दोन वर्षांनी होणार असते. अब्दुल आपल्या मामाच्या हॉटेलमधे जे काम करेल त्यापोटी त्याला जो पगार मिळेल तो पैसा सलमाच्या लग्नकार्यासाठी उपयोगी पडू शकतो असा विचार अब्दुलच्या आईने केलेला असतो. अब्दुलचे सांगलीला निघून जाणे हे त्या शाळेतील त्याच्या वर्गमित्रांसाठी धक्कादायकच असते. शाळेमधे समजा इन्स्पेक्शन झाले तर त्यावेळी शैक्षणिक अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नांना बिनचूक उत्तरे फक्त अब्दुलच देऊ शकेल अशी सगळ्यांना खात्री वाटत असते. इन्स्पेक्शनमधे घेतलेल्या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक दिसली व तसा अहवाल इन्स्पेक्शन करणाऱ्याने दिला तर ढोबळेवाडीची शाळा बंद होण्याचा धोका टळणार असतो.
कथा
याच दरम्यान शिक्षकाच्या गरोदर असलेल्या पत्नीची तब्येत नाजूक होते. तिच्यावर एक महत्वाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होऊन बसते. शिक्षकाला तसा दूरध्वनी येताच ते चार पाच दिवस आपली पत्नीला ज्या गावी रुग्णालयात दाखल केले आहे तिथे जायला निघतात. नेमके याच चार पाच दिवसांत शाळेतील काही विद्यार्थी एक योजना आखतात. शाळा बंद पडायला नको असेल तर इन्स्पेक्शनच्या वेळी अब्दुल हा विद्यार्थी शाळेत हवाच असा विचार मनात प्रबळ होऊन गौरी ही विद्यार्थीनी व संकेत हा विद्यार्थी ढोबळेवाडीहून पहाटेची एसटी पकडून सांगलीला जायचा मनसुबा आखतात. मात्र आपल्या या हालचालींची गंधवार्ता ते आपले विद्यार्थीमित्र वगळता अन्य कोणालाही कळू देत नाहीत. म्हणजे आपल्या घरच्या मंडळींनाही नाही. त्यासाठी शाळेतले विद्यार्थी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या एकत्र ठेवतात व त्यातून कोण सांगलीला जाणार याची एक चिठ्ठी काढली जाते. ती निघते गौरीच्या नावाची. पण गौरीला एकटीला सांगलीला जाऊ देण्यास तिचे वर्गमित्र तयार होत नाहीत. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला संकेत हा मग तिचे मन वळवून तिच्यासोबत सांगलीला जायला निघतो. ती दोघे सांगलीला एसटीबसने रवाना होतात. इथे ढोबळेवाडी शाळेतील त्या दोघांच्या मित्रांना रहस्य उलगडते ते म्हणजे ज्या सर्वांच्या नावाच्या चिठ््ठ्या तयार केल्या असे गौरीने भासविले होते, त्या प्रत्येक चिठ्ठीवर गौरीचेच नाव तिने लिहिलेले होते. हे सत्य समोर येताच हे वर्गमित्र हबकतात.
गौरी व संकेत ढोबळेवाडीहून जेव्हा एसटीने सांगलीला पोहोचतात त्यावेळी ते एवढे मोठे शहर बघून ते काहीसे गांगरतात. ते तिथल्या अनेक हॉटेलमध्ये अब्दुलची चौकशी करतात पण काहीच थांगपत्ता लागत नाही. गौरी व संकेत निराश होतात. मग विचार करताना त्यांना लक्षात येते की काही विशिष्ट भागात खिमा-पाव हा पदार्थ मिळतो अशी हॉटेल्स आहेत. आपण त्या ठिकाणी अब्दुलची चौकशी करु. ते अशा भागात फिरत असताना त्यांना अचानक अब्दुलचा मामा रझाक दिसतो. ते रझाकला गावच्या शाळेची सगळी परिस्थिती सांगतात व अब्दुलला आम्ही पुन्हा ढोबळेवाडीला घेऊन जायला आलोय म्हणून विनंती करतात. पण रझाक हा अत्यंत बेरकी असतो. त्याने अब्दुलला हरकाम्या केलेले असते. तो आपल्या हॉटेलमधे अब्दुल नाही म्हणून बिनदिक्कतपणे खोटे सांगतो व या गौरी व संकेतला वाटेला लावतो. पण तो खोटे बोलतो आहे हे या मुलांच्या लक्षात येते. ते पोलिसांची मदत घेतात.
कथा
रझाकच्या हॉटेलमधे अब्दुल आहे का याची तपासणी करायला आलेल्या पोलिस हवालदाराला रझाक पैसे व खिमा पावचे पार्सल देऊन खिशात टाकतो. रझाक त्यानंतर आपल्या हॉटेलमधील एका नोकराला फोन करुन सांगतो की, अब्दुल जिथे आहे तिथेच त्याला रोखून ठेव. अब्दुल हा दुकानातून जवळच एका दर्ग्याजवळ चहा द्यायला गेलेला असतो. रझाकचा नोकर तिथे अब्दुलला शोधून काढतो व त्याला कुठेही हलू देत नाही. इथे अब्दुलची वाट बघत असणारे गौरी व संकेत पुन्हा हताश होतात. पण त्यांना रझाकचा संशयही आलेला असतो.
या सगळ्या घडामोडीत गौरी व संकेतची दुपारची एसटी चुकते. त्यामुळे ढोबळेवाडीत मोठा गोंधळ उडणार हे आता या दोघांनाही लक्षात आलेले असते. इथे ढोबळेवाडीत आपली मुले रात्री उशीरापर्यंत घरी आलेली नाहीत म्हणून गौरी व संकेतच्या घरचे प्रचंड अस्वस्थ होतात. या मुलांना शोधण्यासाठी गावकरी पंचक्रोशीत शोधाशोध करु लागतात. पण मुलांचा ठावठिकाणा लागत नाही. इथे गौरी व संकेत अख्खी रात्र सांगली शहरात एकाकी अवस्थेत काढतात. अब्दुलचा मामा रझाक याला काही उपरती होऊन तो रझाकला ढोबळेवाडीला परत जाऊ देतो का? गौरी व संकेत अब्दुलला ढोबळेवाडीला परत आणण्यासाठी सांगलीला जातात त्या गोष्टीसाठी शिक्षकाला सरपंच व गावकरी जबाबदार धरतात का? अब्दुल अखेर ढोबळेवाडीस परत येतो का? ढोबळेवाडीची शाळा बंद होण्यापासून अखेर वाचते की वाचत नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय
उबुंटू या चित्रपटात सारंग साठ्ये यांनी शिक्षकाची केलेली भूमिका अतिशय समंजस झाली आहे. ते एकशिक्षकी शाळेतले शिक्षक म्हणून खरच शोभतात. या शिक्षकाचा ध्येयवाद त्याच्या अभिनयातून प्रतीत होतो. या एकशिक्षकी शाळेतील विद्यार्थी गौरी (कलावंत - भाग्यश्री संकपाळ), संकेत (कान्हा भावे) या दोघांच्या भूमिका ठाकठीक झाल्या आहेत. त्यांनी अब्दुल (अथर्व पाध्ये) या आपल्या वर्गमित्राला सांगलीत जाऊन पुन्हा ढोबळेवाडीत आणण्याची चालविलेली धडपड आपल्या अभिनयातून ठीकठाक दाखविली आहे. पण या दोघांना असलेले संवाद व त्यांच्यावर चित्रीत झालेली दृश्ये ही काहीवेळेस हास्यास्पद स्तरावर जातात. त्यामुळे या त्यांच्या धडपडीचे गांभीर्य खूप कमी होते. सलमा (आरती मोरे), शुभम पवार (विकास), चंदू (आर्य हडकर), माधव (पूर्वेश कोटियन), चैत्राली गडकरी (अंकिता), मंजू - (आर्या सौदागर), बाळकृष्ण (बाळकृष्णा राऊळ), गौरीची आई (योगिनी पोफळे), सरपंच (शशांक शेंडे), सरपंचाची बायको (स्मृती पाटकर), अब्दुलची आई (कल्पना जगताप) या सहकलाकारांच्या भूमिका ठाकठीक झाल्या आहेत. मुळ कथा, कथाविस्तार, पटकथा व दिग्दर्शनातील विस्कळीतपणामुळे या भूमिकांना स्वत:चा बाज नीट गवसलेला नाही.
दिग्दर्शन
पुष्कर श्रोत्री हे मराठी चित्रपट, नाटक, मालिकांमधील नाणावलेले अभिनेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या भूमिका केल्याने प्रेक्षकशरण भूमिका व अभिजात भूमिका यांच्यात नेमके काय अंतर आहे हे त्यांना नक्कीच नीट माहिती आहे. अभिनेता म्हणून त्यांनी आजवर जे कौशल्य दाखविले आहे, जो अनुभव घेतला आहे त्याचे पाठबळ घेऊनच ते दिग्दर्शक म्हणून पुढच्या प्रवासाला सज्ज झाले. भालचंद्र कुबल यांनी लिहिलेली उबुंटूची मूळ कथा ही कागदावर वाचताना कदाचित पुष्कर श्रोत्रींना नक्कीच आकर्षक, मनोवेधक वाटली असेल पण तिचा कथाविस्तार करताना व ती पडद्यावर साकारताना श्रोत्री कमी पडले आहेत. उबुंटू या चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा भाग हा काही प्रमाणात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो पण उत्तरार्धात असे प्रसंग, संवाद आहेत की जे रटाळ झाले आहेत. कथा, पटकथा, संवाद लिहिणाऱ्यांचे तसे जे अपयश आहे तसेच ही घसरगुंडी रोखू न शकलेल्या दिग्दर्शकाचेही ते अपयश आहे. या चित्रपटाचा कथाविस्तार, पटकथा, दिग्दर्शन पुष्कर श्रोत्रींचे असून निर्माताही तेच आहेत. या चित्रपटाच्या संवादलेखनातही त्यांचा सहभाग आहे. इतक्या आघाड्यांवर एका व्यक्तीने सहभागी होऊन उत्तम चित्रपट निर्माण केल्याची उदाहरणे असतीलच. पण उबुंटूच्या बाबतीत हे गणित पुष्कर श्रोत्रींना जमलेले नाही. चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचा संबंध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा येणारा संबंध हे अनाकलनीय आहे. ते कथेत विजोड वाटते. खेदाने नमुद करावे लागेल की उबुंटूच्या मांडणीचा आत्मा दिग्दर्शक म्हणून पुष्कर श्रोत्रींना गवसलेलाच नाही. त्यामुळे लहान मुलांची ही कथा पडद्यावर रंगवून एक सुंदर चित्रपट निर्माण करण्याची संधी वाया गेली आहे. हा धड मुलांचाही चित्रपट होत नाही, धड मोठ्यांचाही चित्रपट नाही.
संगीत
उबुंटू चित्रपटाला संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाण्यांपैकी एक गाणे हे विद्यार्थ्यांचे प्रार्थनागीत आहे. ते अतिशय सुंदर झाले आहे. पूर्वी उंबरठा या चित्रपटात एक प्रार्थनागीत होते ते म्हणजे `गगन सदन तेजोमय...' या प्रार्थनागीतानंतर बरेच वर्षात चांगले प्रार्थनागीत मराठी चित्रपटात ऐकायला मिळाले नव्हते. ते उबुंटू चित्रपटात ऐकायला मिळाले. फक्त या प्रार्थनागीताचे शब्द इथे सांगत नाही. प्रत्यक्ष ऐकल्यानंतर ते अनुभवा. या चित्रपटातील बाकीची गाणी खूप लक्षात राहतील अशी खात्री देता येत नाही. उबुंटूमधील गाणी श्रीरंग गोडबोले, समीर सावंत यांनी लिहिली आहेत. तर अजित परब, मुग्धा वैशंपायन, अनुराग इनामदार, विदित पाटणकर, वेदांत चिम्मालागी, मुग्धा हसबनीस यांनी ती गायली आहेत.