आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : सिद्धान्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धान्त म्हणजे थिअरी.. एखाद्या गोष्टीची शास्त्रोक्त बाजू किंवा तात्विक मिमांसा. ही थिअरी आयुष्याचीही असू शकते, किंवा मग गणिताचीही. ‘नवलखा आर्ट्स मीडिया अॅण्ड एण्टरटेन्मेण्ट’चे निलेश नवलखा, ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे विवेक कजारिया आणि ‘व्हर्च्यू एण्टरटेन्मेण्ट’चे अमित अहिरराव या तिघांनी एकत्र मिळून असाच एक ‘सिद्धान्त’ आपल्यासमोर मांडला आहे. फॅण्ड्री, शाळा सारख्या अभिरूचीसंपन्न आणि दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणाऱ्या निर्मितीसंस्थेचा हा अजून एक सिनेमा आहे म्हटल्यावर या चित्रपटाचा प्रोमो पाहतानाच उत्सुकता वाढते. विशेष म्हणजे या सिनेमाची ख्याती सातासमुद्रापार अगोदरच पोहोचली आहे. सिद्धान्तची निवड 16व्या 'मामी' फिल्म फेस्टिवल (IFFI), टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (IFFSA ) आणि न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी करण्यात आली होती.
डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच व्हावा. आंतरप्रिनिअर किंवा इंडस्ट्रीअलिस्टच्या मुलाने वडिलोपार्जित व्यवसाय वृध्दिंगत करावा. राजकारण्याच्या मुलांनीही राजकारणातच प्रवेश करावा. ही खरं तर जगरहाटी आहे. अभिनेते आणि गायकांच्या मुलांकडनही तिचं अपेक्षा ठेवली जाते. आजी-आजोबा आणि आई-वडिलांची कसब रक्तातनं मुलांकडे येतेच येते, ह्या ठाम सिद्धान्तवर जग चालतंय. पण जेव्हा हा सिद्धान्त एखाद्या वेळेस चुकीचा ठरतो, तेव्हा आकांडतांडव केला जातो. ह्याची पुन:प्रचिती येते, ह्या सिनेमामधनं.
आजोबा नातवाच्या नातेसंबंधाचा सिद्धान्त या सिनेमात सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. गणितज्ज्ञ आजोबांच्या अपेक्षांच ओझ कलेची आवड असणा-या नातवाच्या डोक्यावर येतं आणि हा डोक्यावरचा भार पेलताना, अख्या घरादारालाच काय डोकेदुखी होते, ते सिनेमातनं मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय, दिग्दर्शक विवेक वाघ यांनी.
सुरूवात खरं तर होते, नातवाचा गणितातला सिद्धान्त सोडवण्याच्या प्रयत्नाने. पण नंतर आयुष्याचा सिद्धांत चुकीच्या पध्दतीने सोडवायला निघालेल्या आजोबांनाही त्यांचं प्रमेय सुटतं.
‘रिमोट कंट्रोल’, ‘सावधान शुभमंगल’, ‘नकळत सारे घडले’, ‘बहुरूपी’मुळे शेखर ढवळीकर यांची शैली मराठी प्रेक्षकांना परिचयाची आहेच. त्यांनीच यातले पटकथा संवाद लिहिलेत.
सिनेदिग्दर्शनातलं पहिलं पाऊल असलं तरीही विवेक वाघ यांना फिल्ममेकिंगचा चांगलाच अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे लेखक-दिग्दर्शक यांनी या चित्रपटाची संहिता एवढी सशक्त बनवलीय. की दोन तास हा चित्रपटअनुभव आपण एन्जॉय करतो.
विक्रम गोखले यांच्यासारख्या सशक्त अभिनेत्यासमोर उभं राहताना अर्चित देवधरच्याही अभिनयाचा कस लागला आहे. पण अर्चितने हा सिद्धान्त चांगल्या रितीने सोडवलेला दिसतो. विक्रम गोखले आणि अर्चित देवधर यांच्या भोवती जरी कथानक प्रामुख्याने फिरत असलं तरीही, स्वाती चिटणीस, गणेश यादव, माधवी सोमण, सारंग साठ्ये, नेहा महाजन, आणि किशोर कदम यांच्या महत्वपूर्ण भूमिकांचा साजही चित्रपटाला आहे.
फक्त सिद्धान्तची ही थिअरी आजच्या एन्ड्रॉइडच्या जमान्यातल्या बालक-पालकांसाठी असल्याने ती अजून सोप्पी करता आली असती, तर हा सिद्धान्त सोडवायला त्यांना जड वाटला नसता, हे चित्रपट पाहताना जाणवतं. तरीही एकूणच हा सिनेअनुभव एकदा तरी घ्यावा असा आहे.