आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview: ‘मिस्टर अँड मिसेस’ च्या कलाकारांनी शेअर केले अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नाटकातील कलाकार मेकअप करताना आणि नाटक पाहण्यासाठी पोहोचलेले स्टार्स)
‘मिस्टर अँड मिसेस’ या नाटकाने १७५ प्रयोगांचा टप्पा नुकताच पूर्ण केला. त्यानिमीत्ताने नाटकाच्या कलावंताशी केलेली ही बातचित. नाटकातील कलाकारांनी त्यांचा अनुभव divyamarathi.comशी शेअर केला, वाचा काय म्हणताय हे कलाकार...
मधुरा वेलणकर– (नाटकाली ‘मीरा’ व्यक्तिरेखा)
मी गरोदर असताना ब्रेक घेतला होता. ब्रेकवरून परतताना हे नाटक करण्याचं ठरवलं. कारण वेगळ्या पध्दतीचं नाटक करायचं होतं. हे आजच्या काळातलं नाटक असूनही ‘फ्युचरिस्टीक’ नाटक आहे. या नाटकाला जेवढ प्रेम प्रेक्षकांचं मिळालं. तेवढीच दखल समीक्षकांनी घेतली. पुरस्कारही मिळाले. आजच्या काळापेक्षा दोन पावलं पुढे जातं, भाष्य करणा-या नाटकाचा आपण भाग होऊ शकलो, याचा आनंद आहे. खरं तर १७५ प्रयोग करणं हे मराठी नाटकांसाठी नवीन नाही. पण अशा धाटणीचं नाटक, जे विनोदी नाटक नाही, खर्चिक आहे. त्यात माझे सहकलाकार हे इतर नाटक, सिनेमा आणि डेली सोपमध्ये व्यग्र असताना आम्ही १७५ प्रयोग करू शकतोय, हे विशेष आहे.
मला आजही आठवतंय, पूण्याच्या टिळक स्मारकात नाटकाचे एक नाही, दोन नाही तर चक्क तीनदा प्रयोग पाहायला आलेल्या म्हाता-या आजी मला ग्रीनरूममध्ये भेटून ओक्सबोक्क्षी रडल्या होत्या. एकीने तर मला ‘आता हेच आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे का गं’ असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांचा कंठ दाटलेला होता. खूप वेगवेगळे प्रश्न प्रेक्षक नाटक संपल्यावर विचारायचे. याचं कारण हा नाट्यानुभव त्यांचे मन सुन्न करणारा आहे. हेच या नाटकाचे यश आहे, असं मी म्हणेन.
चिन्मय मांडलेकर (नाटकातली ‘अमित जयंत’ व्यकितरेखा)
२०१० साली प्रियदर्शनने मला ह्या नाटकाची कथा ऐकवली. त्यावेळी डेली सोप आणि ‘सुखाशी भांडतो आम्ही’ या नाटकात मी व्यस्त होतो. त्यामुळे मी प्रियदर्शनला मला पुढचे एक वर्ष वेळ नसल्याचं सांगितलं. पण प्रियदर्शन माझ्यासाठी चक्क एक वर्ष थांबला. त्यामुळे मला हे नाटक करता आलं. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे, यात वापरले जाणारे कॅमेरे. असा प्रयोग कोणत्याही नाटकात पहिल्यांदाच झाला. हे नाटक २१ डिसेंबर २०१३ला रंगभूमीवर आले. आणि नेपथ्यामध्ये १९ डिसेंबरला कॅमेरे लागले. त्यानंतर अशा वेगळ्या धाटणीच्या नाटकाचा रंगभूमीवर प्रवास सुरू झाला. या नाटकातली दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, या नाटकात कोणीच ‘सर’ नव्हतं. नाटकाचा निर्माता अभिजीत, दिग्दर्शक प्रियदर्शन पासून ते सर्वच आम्ही कलावंत समवयस्क होतो. त्यामुळे एक ‘फ्रेंडली एनर्जी’ नाटकात होती. महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी याचे प्रयोग झाले आणि लोकांनी या नाटकाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. कोणी मेकअपरूममध्ये येऊन तर कोणी फेसबुकवरून आणि फोनवरून प्रतिक्रिया कळवतं, तेव्हा छान वाटते.
प्रियदर्शन जाधव – (दिग्दर्शक, मिस्टर अँड मिसेस)
या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या पण त्यानंतर निर्मात्याला काही कारणाने नाटक करता येणं शक्य नसल्याने, हे नाटक आता रंगभूमीवर येणार की नाही असं वाटत असतानाच सुदैवाने अभिजीत साटमने या नाटकाची निर्मीती करायचा निर्णय घेतला आणि २०१३च्या डिसेंबरला नाटक रंगभूमीवर आलं. नाटकात कॅमे-यांचा उपयोग केला जातं असल्याने, खूप खर्चिक नाटक होतं. बिग बॉस, मदर स्वॅपिंग सारख्या विषयांची पार्श्वभुमी नाटकाला आहे. धावत्या जीवनशैली सोबत आपलं बदलेली रिलेशनशीप स्टेट्स, कॅमे-याचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाल्याने बदललेलं आयुष्य आणि आपलं वैयक्तिक आयुष्य रिअॅलिटी शो किंवा सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातनं जगजाहिर करण्याची मानसिकता या सर्वांवर प्रकाश टाकणारं हे नाटक आहे. आज आपल्या मुलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र, निवारा आणि कॅमेरा ह्या गरजा आहेत. हे सगळं नाटकातनं दिसतं, जे प्रेक्षकांना पटतं, आणि म्हणूनच हे नाटक यशस्वी झालंय. मराठी रंगभूमीचे वैशिष्ट्य आहे, इथले निरनिराळे प्रयोग प्रेक्षक स्विकारतात आणि त्यामुळेच नाटक इतके प्रयोग करू शकलं आहे.
अभिजीत साटम – (निर्माता)
कधी गंमतशीर वाटणारा, कधी विवादास्पद झालेला, कधी आव्हानात्मक तर कधी पुरस्कारांचा अन् कौतुकाचा वर्षाव करणारा, पण लक्षात राहिलेला असा १७५ प्रयोगांचा प्रवास होता. हे पहिलं नाटकं आहे, ज्यात सहा कॅमे-यांचा वापर झाला आहे. त्यामुळे नाटकाची संहिता जेवढी सक्षक्त आहे. तेवढीच त्याची टेक्निकल बाजूही सशक्त असणं आवश्यक होतं. आणि ते सगळं व्यवस्थित झालं. आणि गेलं दिड वर्ष हे नाटक रंगभूमीवर चालू आहे. याचा आनंद आहे. ह्या नाटकाने ५०० किंवा १००० प्रयोगांचा टप्पा गाठावा, असं काही उद्दिष्ट नाही. लोकांना आणि अभिनेत्यांना जिथंपर्यंत प्रयोग हवे आहेत. तो पर्यंत करत राहणार.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, या नाटकाची छायाचित्रे...
सर्व फोटो- अजित रेडेकर
बातम्या आणखी आहेत...