मराठी सिनेमा आणि त्याचा प्रेक्षकवर्ग जसा वाढत आहे, त्याप्रकारे मराठी चित्रपटांमध्ये अनेक अमराठी कलाकार मंडळी देखील मनापासून सहभागी होत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, \'लय भारी\' सलमानचे उदाहरणं देता येईल. या यादीत आणखी एक नाव सामील झालं आहे. \'तारक मेहता का उल्टा चष्मा\' या मालिकेत ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता 21 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या \'ढिनच्यॅक एंटरप्राइज\' या सिनेमातून मराठीत पदार्पण करतेय. या सिनेमात ती तिच्या ग्लॅमरस रुपात एका प्राध्यापिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याकरिता मुनमुनने मराठी भाषा देखील शिकून घेतली.
या सिनेमात मनवा नाईक, भूषण प्रधान आणि खुर्शीद लॉयर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या नावावरून नेमकं काय ढिनच्यॅक असेल याची सगळयांनाच उत्सुकता लागली आहे. पण या सिनेमाचा ढिनच्यॅक एलिमेंट म्हणजे त्याची कथा आहे.
एखादी वस्तू समोरचाच्या विकत घ्यायला लावणे म्हणजेच मार्केटिंग नसून त्याचा समाजाच्या आणि माणसाच्या भल्यासाठीदेखील वापरता येऊ शकतं हे हया सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. ढिनच्यॅक एंटरप्राइज सिनेमा फक्त रोमॅंटिक कॉमेडी नसून प्रेक्षकांना डोळसपणे विचार करायला लावणारा सिनेमा आहे. सिनेसृष्टीत असे गंभीर विषय खूपच कमी हाताळले जातात.
निशांत सपकाळे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केले असून चार्मी गाला हे निर्माते आहेत. उदयसिंग मोहिते यांनी छायाचित्रिकरणाची धुरा सांभाळली असून देवेंद्र मुरुडेश्वर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. समीर साप्तीकर आणि काशी रिचर्ड यांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे. सचिन पाठक आणि मयुर सपकाळे यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत तर हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या गायकांचा सिनेमातील गीतांना स्वरसाज चढला आहे. हिंदीतील प्रख्यात गायक मिकासिंग, हर्षदीप कौर, पापोन आणि शिंदे शाही गाजवणारा आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, \'ढिनच्यॅक एंटरप्राइज\' या सिनेमाची छायाचित्रे...