‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत जान्हवीच्या बाळाच्या जन्मानंतर दोन भागांमध्ये बाळाच्या बारशाची तयारी चालू असलेली दिसणार आहे. आई आजी, बेबी आत्या, छोटी आई सगळ्याजणी एकिकडे बारशाला कोणाकोणाला बोलवायचं, ह्याच्या तयारीत गुंतलेल्या दिसतील. तर कांता काका बाळासाठी पाळणा आणणं, बाळासाठी श्री-जान्हवीची रूम सजवणं ह्यात गुंतलेला दिसेल. सरू मावशीने बाळाची पत्रिकाही बनवलेली पाहायला मिळणार आहे. थोडक्यात गोखलेंच्या घरात श्री-जान्हवीच्या बाळाचा पहिला सोहळा छान थाटात करण्याची तयारी चालू असलेली दिसणार आहे.
ह्या तयारीविषयी सांगताना छोटी आई म्हणजेच अभिनेत्री लीना भागवत सांगतात, “ आता आम्ही सगळ्याजणीच बारशावेळी नटलेल्या तुम्हांला दिसू. बाळाच्या आगमनामूळे आता घरीही खूप छान वातावरण दिसेल. आम्ही सहा-सात बायका घरात राहतो. पण आमच्यात कधी हेवेदावे लोकांनी पाहिले नाहीत. एकमेकींना विचारून दागिने घालणं, एकमेकींना विचारून घरात काही गोष्टी करणं, हे आम्हां सगळ्याजणींमध्येच आहे. आणि हेच लोकांना पाहायला आवडतं. मला असं वाटतं, आज अत्संगत चाललेली एकत्र कुटूंब पध्दती ह्या मालिकेच्याविषयी लोकांच्या मनात असलेल्या उत्सुकतेच्या मागे दडलीय. आत्या, मावशी, काकू, आजी सगळ्या एकत्र राहतात, हे पाहायला लोकांना आवडलं. त्यामूळेच ही मालिका गेली अडीच-तीन वर्ष चाललीय.”
रोहिणी हट्टंगडी ह्यावेळी नॉस्टेलजिक होत म्हणाल्या,”जेव्हा मला मंदारने ह्या मालिकेबद्दल सांगितलं तेव्हा एवढंच सांगितलं की, ह्या सासूला तीन सूना आहेत. एक मुलगी आहे. आणि एका सूनेची बहिण ह्या घरात राहते. आणि एकच नातू आहे. मला मालिकेत आईआजी म्हणायचं सूध्दा ठरलं नव्हतं. सेटवर आल्यावर ते आम्ही उत्सफुर्तपणे ठेवलं होतं. त्यानंतर आईआजी खूप प्रसिध्द झाली. हळूहळू माझी भुमिका खुलतं गेली. आणि गेली अडीच वर्ष मी जिथे जाईन तिथे भूमिकेविषयी लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या. आईआजी लोकांना किती जवळची आहे, हे मला उमगलं.”
लीना भागवत म्हणाल्या, “हो ना, जेव्हा आपण कोणतीही मालिका करतो. तेव्हा त्या मालिकेतलं पात्र आपली ओळख झालेली असते. त्यामूळे माझी गेल्या दोन अडीच वर्षांतली ओळख छोटी आई अशी आहे. खरं तर, कोणी सेटवर येऊन म्हणालं की अडीच वर्ष झालीयत. तरच आम्हांला एवढी वर्ष ही मालिका चालली असल्याचं लक्षात येतं. नाही तर, मला अगदी काल ही मालिका सुरू झाल्यासारखी वाटते. आम्हांला एकमेकांची एवढी सवय झालीय. सेटवर आम्ही एवढे मस्ती करत असतो की, अडीच वर्ष झालीयत, हे खरंच वाटतं नाहीये ह्या मालिकेने मला खूप काही दिलं. खूप अनुभव, खूप माणसं दिली. कलाकाराला चांगला प्रेक्षकवर्ग असावा, असं नेहमी वाटतं. तर ती ही इच्छा मालिकेने पूर्ण केली.”
प्रेक्षकांची मालिकेविषयी उत्सुकता आजही किती टिकून आहे हे सांगताना त्या म्हणाल्या, “प्रेक्षकांना नेहमी पूढे काय होणार ह्याची उत्सुकता असते. बाकी प्रेक्षकच नाही तर, माझी आई एवढी ह्या मालिकेत गुंतून गेली होती, की ती मला शुटिंग संपवून मी घरी परतल्यावर आता पूढे काय होणार, हे गेली अडीच वर्ष नेहमी विचारत होती. मी तिला मालिकेत काय होणार हे सांगितलं की आमच्या घरी कामाला येणा-या बाईंनाही कळायचं. ब-याचवेळा नाटकाच्या दौ-यानिमीत्त किंवा काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्यावर हिच उत्सुकता मला लोकांच्याही बोलण्यात सतत जाणवली. “
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गोखलेंच्या घरी चाललेली बारशाची लगबग