आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Marathi Television Serial Nanda Saukhya Bhare

नवी मालिका ‘नांदा सौख्य भरे’,आदेश भाऊजी लावणार सासू-सुनेत भांडणं.कसे? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सुहास परांजपें आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे
झी मराठी वाहिनीवरील ‘असे हे कन्यादान’ ही मालिका संपून आता त्याऐवजी नांदा सौख्य भरे ही नवी मालिका सुरू होतेय. २० जुलैपासून या मालिकेची सुरूवात होईल. ‘असे हे कन्यादान’ ही मालिका वडिल-मुलीच्या नात्यावर आधारित होती. तर आता झी मराठीच्या या नव्या मालिकेत आपल्याला सासू-सूनेची जोडी दिसणार आहे.
महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंट या निर्मितीसंस्थेची ही मालिका आहे. ललिता जहागिरदार ही श्रीमंतीचा मिजास असलेली सासू आणि तिची स्वानंदी ही मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेली सून आत्तापर्यंत प्रोमोमधून आपल्या समोर आलीय. आणि आता निर्माते या सासू-सुनेची तिखट शाब्दिक जुगलबंदी दाखवणार असंच प्रोमोमधून दिसतंय.
मालिकेच्या निर्मात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबियांची ही कथा आहे. कधी काळी आपल्या पूर्वजांकडे असलेलं ऐश्वर्य आणि जमिन जुमला पुढच्या पिढीच्या नाकर्तेपणामुळे गमावून बसलेलं जहागिरदार कुटुंब. मात्र त्यावेळच्या श्रीमंतीची हवा सासूबाई ललिताच्या डोक्यात अजूनही आहे. एवढंच कशाला तो रूबाब, ऐट, मिजास वैभव गेलं, तरी तिच्या बोलण्या-वागण्यात असल्याचं जाणवतं. तिचा मुलगा नील परदेशात शिकून भारतात आलाय. त्याच्या वधू संशोधनाची जबाबदारी ललिताने वच्छी आत्याकडे दिलीये. आणि वच्छी आत्या नेमकी स्वानंदी देशपांडेचं स्थळ नीलसाठी आणते. स्वानंदी सरळमार्गी आणि त्तवनिष्ठ.
खरं तर, वच्छी आत्याने स्वानंदीचंच स्थळ नीलसाठी आणण्यामागेही एक चाल असते. ललिताकडे नीलच्या लग्नासाठी अनेक प्रस्ताव घेऊन गेलेल्या वच्छी आत्याचा ललिताबाई प्रचंड अपमान करतात. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि ललिताबाईच्या खोट्या वैभवाची मिजास उतरविण्यासाठी वच्छी आत्या नियोजित पद्धतीने स्वानंदीचं स्थळ ललिताबाईकडे नेते. ललिताही स्वानंदीसाठी पसंती देते आणि इथूनच सुरुवात होते, सासू-सुनेच्या आबंट-गोड नात्याची. बडेजाव मिरवणा-या ललिताला तिच्या अगदी विरूध्द स्वभावाची सून मिळते.
ललिताच्या भूमिकेत आपण अभिनेत्री सुहास परांजपेंना पाहणार आहोत. तर त्यांची सुन बनलीय, अभिनेत्री ऋतुजा बागवे. आणि या सासू-सुनेत भरडला जाणारा ललिताचा मुलगा नील आहे, चिन्मय उदगीरकर.
मालिकेची कथा संपदा जोगळेकरने लिहीली आहे. तर पटकथा अर्चना जोशीची आहे. संवाद मिथिला सुभाष यांचे असतील. तर दिग्दर्शन करतायत, वैभव चिंचाळकर.
आत्तापर्यंत सासू-सुनांना पैठणी देऊन घरात आनंदी-आनंद आणणारे आदेश भाऊजी, आता त्यांच्या मालिकेतल्या सासू-सुनांमध्ये मात्र भाडणं लावणार असंच दिसतंय. हे पाहणं मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.
पूढील स्लाइडवर पाहा, मालिका 'नांदा सौख्य भरे'मधल्या कुटूंबाचे फोटो