मुक्ता बर्वे, दिनु पेडणेकर, भरत ठक्कर निर्मित ‘Code मंत्र’ ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १८ जुनला मुंबईत होत आहे. पण त्याअगोदर ह्या नाटकाच्या First Lookचे फोटो divyamarathi.com तुम्हांला दाखवत आहे. विक्रम गायकवाड, अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे ह्यांच्या ह्या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.
आर्मीची पार्श्वभुमी असलेल्या ह्या नाटकात अजय पुरकर, कॅप्टन निंबाळकर तर मुक्ता बर्वे, आर्मी वकिल अहिल्या निंबाळकरच्या भुमिकेत आहे.
अजय पुरकर आपल्या भुमिकेविषयी सांगतात, “आर्मीत जायची सुप्त इच्छा लहानपणापासून मनात होती. पण ते कधी जमलं नाही. मी लॉ विषयात पदवीधर झालो. आणि नंतर कलाक्षेत्रात आलो. त्यातच सध्या आर्मीत असलेल्या बालमित्राकडून आर्मीविषयक अनेक गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्यामुळे मुक्ताने कर्नल निंबाळकरांची भूमिका ऑफर केल्यावर अनेक वर्षांचं राहून गेलेलं स्वप्न पूर्ण झालं. आर्मीतल्या लोकांचं विश्व हा सामान्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. आर्मीचे वेगळे नियम, तिथल्या लोकांचं वेगळे विचार, जीवनशैली, कोर्टमार्शल असं सगळं ह्या नाटकातून उलगडणार आहे.”
गुजराती रंगभूमीवर गाजलेल्या ह्या नाटकाला आता मराठी रंगभूमीवर साकारताना त्यात मराठी भाषेशिवायही काही बदल झालेत. ह्याविषयी नाटकाचे दिग्दर्शक राजेश जोशी म्हणाले, “आर्मीची भाषा, उठण्या-बसण्याची पध्दत ही कोणत्याही भाषेत सारखीच असते. त्यामुळे गुजरातीचं मराठीत रूपांतर होताना कथानकात किंवा ह्या आर्मीच्या नियमांमध्ये अर्थातच काहीच बदल झाला नाही. फक्त गुजरातीत राजपूत रेजिमेंटचा उल्लेख होता, तर आता मराठीत मराठा बटालियनचा उल्लेख केला जातोय.”
नाटकाची निर्माती-अभिनेत्री मुक्ता बर्वे सांगते, “आजकाल नाटकातली टेक्नॉलॉजी एवढी बदललीय की, आता नेपथ्यामध्ये स्क्रिन आणून किंवा तत्सम काही गोष्टींमूळे ब-याचदा एक वेगळा इफेक्ट नाटकाला देता येतो. मात्र कोणतंही गिमीक न वापरता, फक्त नाटकातल्या व्यक्तिरेखांकडून एक वेगळाच नाट्यानुभव देणारी ही कथा मी गुजराती रंगभूमीवर पाहिली आणि नाटकाच्या प्रेमात पडले. ह्या नाटकात आम्ही एक नवा प्रयोगही केलाय. एकही ब्लॅकआउट नसलेलं हे मराठीतलं पहिलं नाटक आहे. ह्यात ६५ सीन आहेत. प्रत्येकांनंतर ब्लॅकआऊट झाला असता. तर नाटक कदाचित कंटाळवाणं आणि उगाच लांबलं असतं. वेगळ्या धाटणीचं हे नाटक गुजराती रंगभूमीवर यशस्वी झाल्यावर आता मराठीतही यशस्वी होईल ह्याची मला खात्री आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुक्ता बर्वेच्या कोडमंत्र नाटकाचे फोटो