आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा मुलगा अमितला \'एफयू\' चित्रपटाचा नायक करणार होतो- महेश मांजरेकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'एफयू' म्हणजेच फ्रेंडस् अनलिमिटेड हा मराठी चित्रपट बनवायचे ठरविले तेव्हा माझ्या डो‌ळ्यासमोर नायक म्हणून एकच जण होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित. मात्र माझी ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही असे या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले.

महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, अमित ठाकरे याच्याकडे नायकाचे व्यक्तिमत्व आहे. तोच 'एफयू'चा नायक व्हावा, अशी इच्छा मी राज ठाकरे यांच्याकडे बोलूनही दाखविली होती. पण ते माझे स्वप्न पूर्ण झाले नाही. आता मी दुसऱ्या चित्रपटाची कथा तयार केली असून त्या चित्रपटात नायक म्हणून अमित ठाकरेयांनी काम करावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

'एफयू'तील गाण्यांचा अनावरण सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत एका समारंभात पार पडला. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी अमित ठाकरे यांच्याबद्दल दिलेल्या माहितीमुळे उपस्थितांना सुखद धक्का बसला. महेश मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले, महेश मांजरेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतला यश चोप्राच आहे. त्याने आजवर इतके विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत की थक्क व्हावे.

ही गोष्ट खरी आहे की, 'एफयू'चा नायक म्हणून अमितने काम करावे अशी महेशची इच्छा होती. त्यासाठी तो चित्रपटाची पटकथाही माझ्याकडे घेऊन आला होता. त्यावर मी त्याला म्हटले तू माझी पत्नी शर्मिला हिला ही पटकथा दे. शर्मिलालाही ही पटकथा आवडली होती. राज ठाकरे यांच्या या उद्गारावर महेश मांजरेकर लगेचच माईक हातात घेऊन म्हणाले 'एफयू'च्या वेळी जमले नाही पण माझ्या पुढच्या चित्रपटात अमित हाच नायक असावा असा माझा प्रयत्न राहिल. या उद्गारांवर राज ठाकरे प्रसन्न मुद्रेने हसले.

सैराटमध्ये परश्या भूमिका केलेला आकाश ठोसर हा 'एफयू'मध्ये रॉकिंग नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, सत्या मांजरेकर, मयुरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के इत्यादी कलाकार आहेत. हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी केलेल्या ट्विटमुळे 'एफयू' हा मराठी चित्रपट आधीच चर्चेत आलेला आहे. त्यातच आता राज ठाकरे यांचा मुलगा अमित याला या चित्रपटाचा नायक करायचे महेश मांजरेकरच्या मनात होते ही माहिती उघड झाल्याने आता चित्रपटाविषयीच्या चर्चेला आणखी उधाण येईल.

अमित पुन्हा चर्चेत आला
राज ठाकरे यांचा मुलगा अमितची प्रकृती बरी नसल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत प्रचाराकडे मला नीटसे लक्ष देता आले नाही असेही त्यांनी सांगितले होते. त्या घटनेनंतर महेश मांजरेकर यांनी 'एफयू'च्या निमित्ताने अमित ठाकरेंचा जो उल्लेख केला त्यामुळे पुन्हा एकदा अमितकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

'एफयू'मध्ये आहेत तब्बल 14 गाणी!
'एफयू' चित्रपटात आजच्या युवापिढीला आवडतील अशी 14 गाणी आहेत. याआधी गाजलेल्या `कट्यार काळजात घुसली' या चित्रपटात 11 हून जास्त गाणी होती. इतकी गाणी असूनही प्रेक्षकांना तो चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटला नव्हता. हा ट्रेंड लक्षात घेऊन 'एफयू'मध्येही त्याहून जास्त गाणी समाविष्ट करण्यात आली. ती मराठी, हिंदी, इंग्रजी व हिंदी मिक्स अशी गाणी आहेत. 'एफयू' हा मराठी चित्रपट खूप चालला व त्याचा हिंदी रिमेक बनवायचे ठरले तर या गाण्यांतील हिंदी, इंग्रजी गाणी त्या चित्रपटासाठी उपयोगी पडतील असाही निर्मात्यांचा दृष्टिकोन आहे.

'एफयू'; या चित्रपटात ही चौदा गाणी असतील व सीडी, डीव्हीडीमध्ये त्याहूनही अधिक म्हणजे 20 गाणी असतील. 'एफयू'ला नव्या दमाच्या समीर सप्तीसकर व विशाल मिश्रा यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे. सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, प्राजक्ता शुक्रे, बेनी दयाल, सुखविंदर सिंग, नीती मोहन, जोनिता गांधी अशा अनेक गायकांनी गाणी गायली आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात सलमान खानची मैत्रीण युलीया वन्तूर हिने देखील एक गाणे गायले आहे.
बातम्या आणखी आहेत...