आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अर्धवटराव\' झाले 100 वर्षांचे, जाणून घ्या कसा झाला त्यांचा जन्म?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अपर्णा, अमिताभ बच्चन आणि बोलके बाहुले अर्धवटरावसोबत रामदास पाध्ये - Divya Marathi
पत्नी अपर्णा, अमिताभ बच्चन आणि बोलके बाहुले अर्धवटरावसोबत रामदास पाध्ये

चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणार्‍या शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्या 'अर्धवटरावा'ने नुकताच आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला. हिंदुस्थानच्या इतिहासात एखाद्या कळसूत्री बाहुलीचा वाढदिवस साजरा होण्याची ही पहिलीच वेळ होती. रामदास पाध्ये गेली 49 वर्षे वडिलांच्या या कलेचा वारसा पुढे नेत आहेत. अर्धवटराव आणि आवडाबाई हे आमच्या कुटुंबातील एक सदस्य असल्याने त्यांचा वाढदिवस आम्ही थाटामाटात साजरा केल्याचे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी सांगितले.
असा झाला अर्धवटरावांचा जन्म
रामदास पाध्ये यांचे वडील प्रा. वाय. के. पाध्ये हे प्रसिद्ध शब्दभ्रमकार-जादूगार होते. त्या वेळी इंग्लंडहून आलेल्या शब्दभ्रमकाराच्या खेळामुळे ते खूपच प्रभावित झाले होते. आपणही हा खेळ करावा, असे त्यांना वाटले. त्यांनी कागदावरच एका बाहुल्याचे पात्र साकारले. ते वर्ष होते 1916. अशा रीतीने अर्धवटराव या पात्राचा जन्म झाला. त्याला त्या वेळी गप्पीदास -मि.क्रेझी अशीही नावे होती; मात्र त्या वेळी शब्दभ्रमकारासाठी आवश्‍यक अशी साधने नव्हती. त्यामुळे त्यांनी कागदाच्या बाहुल्यांचे प्रयोग सुरू केले. कालानंतराने इंग्लंडहून सामान आणून अखेर या बाहुल्याचे प्रयोग सुरू झाले. त्यानंतर अर्धवटरावाबरोबरच त्याची बायको आवडाबाई, त्यांची व्रात्य मुले शामू आणि गंपू यांचाही जन्म झाला. रामदास पाध्ये यांनी याची सूत्रे हाती घेतल्यानंतर एन.बी.सी., ए.बी.सी., हॉंगकॉंग टीव्ही, अशा परदेशी वाहिन्यांप्रमाणेच देशा-परदेशात आत्तापर्यंत या बोलक्‍या बाहुल्यांचे तब्बल 9800 प्रयोग झाले.
पुढच्या पिढीसाठी पुन्हा अर्धवटराव अवतरणार
पुढच्या पिढीला अर्धवटरावाची माहिती व्हावी याकरिता 'कॅरी ऑन एंटरटेन्मेंट-रामदास पाध्ये लाइव्ह' या कार्यक्रमातून अर्धवटराव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाध्ये यांचे संपूर्ण कुटुंब मिळून हा कार्यक्रम सादर करणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रामदास पाध्ये यांची अर्धवटरावांसोबतची काही जुनी छायाचित्रे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...