आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक बघायला गेला आणि बनला सिनेमाचा हिरो, असा सापडला केदार शिंदेंना ‘रंगीला रायबा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खोटं वाटतय ना?... पण गोष्ट शंभर टक्के खरी गोष्ट आहे. सोलापुरचा एक युवक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नाटक पाहण्यासाठी पुण्याला जातो...नाटक सुरू होण्यापूर्वी तो नेहमीच्या सवयीप्रमाणे डबस्मॅशवर एक व्हीडीयो शुट करून फेसबुकवर अपलोड करतो आणि नाटक पाहून झाल्यावर त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो....आणि तो चक्क एका सिनेमासाठी हिरो म्हणून सिलेक्ट होतो...आहे ना अचंबित करणारी गोष्ट?
 
तर सीन आहे असा की, 'गेला उडत' या नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. सोलापूरचा युवा नाट्यअभिनेता आल्हाद अंदोरे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सिद्धार्थ जाधव आणि अमीर तडवळकर यांची भुमिका असलेला 'गेला उडत' चा प्रयोग पाहण्यासाठी तो पुण्याला गेला होता. नाटक सुरू व्हायला थोडा अवकाश असल्याने ॲक्टींगचं वेड असलेल्या आल्हादने नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रेक्षागृहाच्या संकुलात डबस्मॅशवर नक्कल करणारे व्हीडीयो काढणं सुरू झालं. त्यातील एक डबस्मॅश व्हीडीयो आणि इन्स्टाग्रामवरील बुमरँग व्हिडीयो मित्र अमीर तडवळकर यांना टॅग करून फेसबुकवर अपलोड केला. संपूर्ण नाटक पाहून बाहेर पडतो तोच त्याला एक फोन आला. फोन अमीर तडवळकरचा होता. अमीरने त्याला तात्काळ नाटकाच्या गाडीजवळ बोलावलं. तो गेला...भेटला. अमीरने स्वत:च्या फोनवरून एक फोन लावला आणि आल्हादच्या हातात दिला आणि म्हणाला बोल. फोनवर समोरची व्यक्ती होती...दिग्दर्शक केदार शिंदे. तो शॉक! 
 
फेसबुकवर टॅग केलेले डबस्मॅश आणि बुमरँग व्हीडीयो केदार शिंदेनी पाहिले आणि अमीर तडवळकरला कॉल करून आल्हादबद्दल विचारणा केली. सोलापूरच्या एकाच नाट्यवलयातील असल्याने अमीर आल्हादला चांगला ओळखत होता. त्याने आल्हादच्या एकांकिका आणि नाटकातील कारकिर्दीबद्दल सांगितलं. केदार शिंदेंनी आल्हादला फोनवरून ऑडीशन पाठवायला सांगितली. आल्हादसाठी हे सारं स्वप्नवतच होतं.
 
वेगवेगळ्या शैलीत आल्हादने आपल्या अभिनयाचे व्हीडीयो शूट केले आणि अमीरच्या माध्यमातून केदार शिंदेना व्हॉट्स ॲपवर धाडले. मग काय! काहीवेळाने आल्हादचा मोबाईल खणाणला... 'हॅलो... आल्हाद!  केदार शिंदे बोलतोय… लगेच बॅग पॅक करायची आणि मुंबई ला यायचं. तुच आहेस माझा रंगीला रायबा. तुला लीड रोल देतोय. घरी सांग आता हीरो बनुनच सोलापूरला परतेन! आल्हादच्या पायाखालची जमीन सरकून तो हवेत उडाला होता. मग काय...केदार शिंदेच्या बोलण्याप्रमाणे बॅग पॅक झाली आणि आल्हाद मुंबईत हजर झाला.
 
आल्हाद... दिसायला हॅण्डसम...उत्तम भाषाशैली...विनम्र...अभिनयाची उत्तम जाण...सोलापूरच्या कॉलेज रंगभूमीवरचा हिरो आणि व्यवसायाने अॅडव्होकेट! आतापर्यंत त्याने अनेक एकांकिका केल्या. त्यात ‘अस्वल’ आणि ‘दे धक्का’ या एकांकिका गाजल्या. ‘इस्केलॅवो’ आणि ‘हिल टॉप व्हीला’ या व्यावसायिक नाटकांनी त्याला ओळख मिळवून दिली.
 
लहानपणापासुन बालनाट्यात काम करणा-या आल्हादचं सिनेमात हिरो बनण्याच स्वप्न ‘गेला उडत’ हे नाटक पाहून साकार झालंय. रंगीला रायबा एकदम जबरदस्त ताजेपणा, रंगीत-विनोदी मनोरंजन करणारा,  केदार शिंदे दिग्दर्शित, श्री विजयसाई प्रॉडक्शन निर्मित रंगीला रायबा येत्या १० नोव्हेंबर ला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतोय. अतुल कुलकर्णी नंतर सोलापूरच्या मातीतला अॅड. आल्हाद अंदोरे हा युवा अभिनेता रंगीला रायबा बनून मराठी चित्रपटसृष्टी गाजवायला सज्ज झालाय.
                                                                         
पुढच्या स्लाईडवर पाहा, आल्हाद अंबोरेचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...