आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च महिन्यात \'आर्ची\'च्या 2 परीक्षा, दहावीसाठी 40 दिवसांत उरकले फिल्मचे शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सैराट' या सिनेमामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्यासाठी मार्च महिना फार महत्त्वाचा आहे. त्याचे कारण म्हणजे मार्च महिन्यात तिला एक नव्हे तर दोन परीक्षांना सामोरे जायचे आहे. रिंकूचे हे दहावीचे वर्ष असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. 'सैराट' सिनेमा रिलीज झाला तेव्हा रिंकूने नववीची परीक्षा उत्तीर्ण करुन दहावीत प्रवेश मिळवला होता. या सिनेमामुळे तिची लोकप्रियता एवढी वाढली, की तिला शाळेत जाऊन दहावीचे क्लास अटेंड करता आले नाहीत. खरं तर प्रचंड प्रसिद्धीमुळेच तिला शाळेला रामराम ठोकावा लागला. त्यानंतर तिने 17 नंबरचा फॉर्म भरुन बाहेरुन दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
 
रिंकू जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झालं होतं. त्यामुळे घरी अभ्यास करुन बाहेर परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला. रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकत होती. नववीत तिला 84 टक्के गुण मिळाले होते. आता दहावीच्या परीक्षेला फारसा वेळ राहिलेला नाहीये. येत्या 7 मार्चपासून रिंकूची दहावीची परीक्षा सुरु होतेय. त्यामुळे सध्या ती जोमाने अभ्यासाला लागली आहे. पण या परीक्षेसोबतच रिंकुला आणखी एका मोठ्या परीक्षेला सामोरे जायचे आहे. ती परीक्षा आहे बॉक्स ऑफिसवरची. 
 
मार्चमध्येच रिलीज होतोय रिंकूचा नवा सिनेमा...
मार्च महिन्याच्या अखेरीस रिंकूचा नवा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय. 'सैराट'च्या कन्नड रिमेकमध्ये रिंकूने मुख्य भूमिका साकारली आहे. खरं तर 9 फेब्रुवारी ही सिनेमाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली होती. पण दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासात रिंकू बिझी असल्याने निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे रिंकूची आई आशा राजगुरु यांनी divyamarathi.com सोबत बोलताना सांगितले. 7 मार्च ते 25 मार्च या काळात दहावीची परीक्षा आहे. ही परीक्षा संपली की 'सैराट'चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. 'सैराट'सारखेच यश या सिनेमाला मिळणार की नाही, हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर समजेल. 

सिनेमाच्या म्युझिक लाँचला रिंकूची अनुपस्थिती... 
‘मनसु मल्लिगे’ या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी बंगळूरुमध्ये पार पडला. पण सध्या रिंकू अभ्यासात बिझी असल्याने ती या म्युझिक लाँचला उपस्थित राहू शकली नाही. 

40 दिवसांत उरकले सिनेमाचे शूटिंग... 
मागील वर्षी दिवाळीपूर्वी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले. 40 दिवस या सिनेमाचे शूटिंग चालले. मैसूर, बंगळूरु, हैदराबाद याठिकाणी सिनेमाचे शूटिंग पार पडले. सिनेमाच्या शूटिंगच्या फावल्या वेळेत रिंकू अभ्यास करत असल्याचे आशा राजगुरु यांनी सांगितले. 

पाच दिवसांचे डबिंग दोन दिवसांत केले पूर्ण 
आशा राजगुरु यांच्याशी बातचित केली असता, या सिनेमासाठी रिंकूने कन्नड भाषा आत्मसात केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या सिनेमासाठी रिंकू स्वतः डबिंग केले आहे. या सिनेमाच्या डबिंगसाठी साधारण पाच दिवसांचा कालावधी लागणार होता. पण रिंकूने अवघ्या दोन दिवसांत डबिंग पूर्ण केले. यासाठी सिनेमाचे दिग्दर्शक एस. नारायण यांच्यासह संपूर्ण क्रूने रिंकूचे कौतुक केले.   

दोन महिन्यांत पूर्ण केला अभ्यास... 
रिंकूने शूटिंगसोबतच अभ्यासाकडेही पूर्ण लक्ष दिले आहे. शूटिंग संपल्यानंतर मागील दोन महिन्यांत तिने दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम संपवला आहे. तसं पाहता रिंकू मुळातच अभ्यासात खूप हुशार आहे. ती नववीत असताना सैराट सिनेमाचे शूटिंग सुरु होते. त्यावेळीसुद्धा तिने शूटिंग आणि अभ्यास यांच्यात समतोल साधत नववीत 84 टक्के गुण प्राप्त केले होते. त्यामुळे आता दहावीतही रिंकू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, या शुभेच्छा आपण तिला देऊयात.   
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, नवीन सिनेमातील रिंकूची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...