आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#1YearOfSairat: वाचा, \'सैराट\'च्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने काय म्हणताहेत आर्ची-परशा, सल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा पायंडा पडलेला चित्रपट म्हणजे  नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' होय. मागील वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 29 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज सैराट चित्रपटाची वर्षपूर्ती. अजय-अतुलचे संगीत, झी टॉकीजची निर्मिती, भन्नाट प्रयोजन, नागराजचे उत्कृष्ट नियोजन आणि कलाकारांचा उत्तम अभिनय जमून आल्यानं 'सैराट'ला इतिहास रचता आला. जातीव्यवस्था, प्रेम आणि त्यामुळे समोर येणारी परिस्थिती यावर भाष्य करणारा कथानक करत नागराज  यांनी चित्रपट बनविला. सैराटच्या निमित्ताने महाराष्ट्रात आणि चित्रपटसृष्टीत चांगल्या-वाईट चर्चा घडवून आणल्या.

मूळचे जेऊर तालुका करमाळा येथील असलेले नागराज मंजुळे यांनी वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनविला. त्यांनी या अगोदर 'पिस्तुल्या' हा लघुपट तर 'फँड्री' हा चित्रपट बनविला. या दोन्हीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'सैराट' साठीही रिंकू राजगुरू हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'सैराट'चे बहुतांश चित्रीकरण करमाळा, कंदर, केम, वांगी, चिकलठाण, जेऊर, कुगाव या ग्रामीण भागात झाले आहे. यामुळे ग्रामीण भाग जगासमोर आला. चित्रपट तयार करताना कृत्रीम सेटचा वापर  न करता उपलब्ध स्थळांचा चांगला वापर करून घेण्यात आला. आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, अरबाज शेख, तानाजी गळगुंडे, सुरेश विश्वकर्मा, छाया कदम, भक्ती चव्हाण, अनुजा मुळ्ये, सूरज पवार, धनंजय ननवरे यांच्या अभिनयाने आणि अजय-अतुल यांच्या झिंगाट गाण्यांनी सर्वाना याडं लावत 'सैराट' कमालीचा यशस्वी ठरला.
 
सामान्य कुटुंबातून आलेल्या या सर्व कलाकारांना 'सैराट'ने बरेच काही दिले आहे. या चित्रीकरण झालेल्या ठिकाणांना कधीच नव्हे ती गर्दी होऊ लागली. या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी तरुणाईने अक्षरशः गर्दी केली होती. या चित्रपटाने शहरी लोक खरोखरच खेड्याकडे खेचले गेले. या ठिकाणी आजपर्यंत लाखो प्रेक्षकांनी भेटी दिल्या आहेत. जम्मू-काश्मीर ते पाँडीचेरी येथीलही प्रेक्षकांना ही ठिकाणे पाहण्याचा मोह आवरला नाही. 'सैराट'ने आपल्या लोकप्रियतेची झलक सातासमुद्रापार फडकवली. 'सैराट'मुळे करमाळा तालुका जगाच्या नकाशावर कोरला गेला.

कमाईच्या बाबतीतही 'सैराट'ने इतिहास रचला. आजवर मराठी चित्रपटांची कमाई जेमतेम 15-20 कोटी असायची.पण दुनियादारी-नटसम्राट यांनी ती 35-40 च्या घरात नेली आणि सैराटने तर न भूतो न भविष्यती अशी कमाई केली. या चित्रपटाने 100 कोटींच्या जवळपास कमाई केली. मराठी चित्रपटसृष्टीत हे सर्व प्रथमच घडले. आज वर्षभारनंतरही या चित्रपटाचा जोश तरुणातून कमी झालेला नाही. तरुणाईला सैराटने खरोखरच झिंगायला लावलं. यातील कलाकार हे नवखे असतानाही त्यांनी दमदार अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 
 
या ठिकाणी झाली वर्षभर गर्दी 
करमाळा शहरातील कमलाभवानी माता मंदिर आणि शेजारीलच 96 पायऱ्याची विहीर तसेच लोकप्रिय झालेलं  झाड,  देवळाली येथील राखुंडे यांची विहीर  या ठिकाणांना लोकांनी भेटी दिल्या. तर सर्वात जास्त गर्दी झालेले ठिकाण म्हणजे आर्चिचा बंगला. भास्कर भांगे यांच्या मालकीच्या असणाऱ्या या ठिकाणाला देशभरातून लाखो प्रेक्षकांनी गर्दी केली. हे सर्व ग्रामीण भागाला नवे होते. गावातील लोकांना यामुळं वेगळेपण जाणवलं. आजही या ठिकाणी गर्दी होते तर आजवर शाळेतील सहलीही या ठिकाणी भेट देऊन गेल्या आहेत.
 
एकंदरीतच काय तर 'सैराट'ने फक्त नवोदित कलाकारांना नावारूपास आणण्याचे कामच केले नाही तर या गावांनाही एक नवी ओळख मिळवून दिली.  
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, 'सैराट'च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु आणि अरबाज शेख काय म्हणाताहेत...
बातम्या आणखी आहेत...