आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती कला दर्पणची सर्वाधिक नामांकने 'गोष्ट तशी गमतीची' आणि 'क्लासमेट्स'ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी सिनेसृष्टीतील नवोदीत तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणारी संस्कृती कला दर्पण संस्था अल्पशा वेळेतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. गेली १५ वर्ष सातत्याने होत असलेल्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराने सगळ्यांच्याच मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
चित्रपट, व्यावसायिक नाटक, टीव्ही मालिका आणि वृत्त वाहिनी अशा एकूण चार विभागातील पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. नाटक विभागात नामांकित झालेल्या 'त्या तिघांची गोष्ट', 'गोष्ट तशी गमतीची', 'काळात नकळत', 'समुद्र' या नाटकांनी अनेक पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. त्यापैकी सर्वोत्कृष्ट नेपथ्य, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, लक्षवेधी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नाटक या विभागातील पुरस्काराकरिता चुरशीची स्पर्धा रंगली आहे. चित्रपट विभागातील पुरस्कारांवर यंदाच्या सुपरहिट सिनेमांनी मोहोर लावली आहे. त्यात 'क्लासमेट्स' आणि 'लोकमान्य-एक युग पुरुष' आघाडीवर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट अभिनेता, पार्श्वसंगीत, संगीत, पार्श्वगायिका, पार्श्वगायक, छायांकन, संकलन, संवाद, पटकथा, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता अशा एकूण ११ पुरस्कारांसाठी क्लासमेट्स सिनेमाला नामांकन प्राप्त झाली आहेत. त्याचबरोबर मालिका विभागातील कलर्स मराठीवरील 'कमला', गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकांना सर्वोत्कृष्ट मालिकेचे नामांकन मिळाल्याने मालिकेतील कलाकारांची आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ६ ते ९ एप्रिल दरम्यान झालेल्या नाट्य आणि चित्रपट महोत्सवात एकूण ५ नाटक आणि ११ सिनेमे दाखवले गेले. त्याकरिता १९ नाटक, १२ मालिका आणि ५३ चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या.

नाट्य विभागातील पुरस्कारांसाठी एकूण पाच नाटकांची निवड झाली असून त्यात 'समुद्र', 'मदर्स डे', 'गोष्ट तशी गमतीची', 'त्या तिघांची गोष्ट', 'कळत नकळत' या नाटकांचा समावेश होता. यंदाच्या वर्षी चित्रपट विभागात तब्बल ५३ चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 'विटी दांडू', 'शटर', 'रमा माधव', 'लोकमान्य-एक युग पुरुष', 'काकण', 'एलिझाबेथ एकादशी', 'कॅंडलमार्च', 'गुरुपोर्णिमा', 'तिचा उंबरठा' आणि 'लय भारी' या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली होती. चित्रपट विभागातील परीक्षक मंडळात असलेल्या अभिजीत पानसे, अमृता राव , अमित भंडारी, रेखा सहाय आणि स्मिता जयकर यांनी निवड झालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे. तसेच नाट्य परीक्षण विभागात प्रमोद पवार शकुंतला नरे, अर्चना पाटकर यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.
मराठी सिनेक्षेत्रात निर्माण होणाऱ्या अप्रतिम कलाकृतीचा सन्मान करण्याचा एक प्रकारे संधीच आम्हाला या निमित्ताने मिळत आहे. यंदाच्या वर्षीचा मराठी चित्रपट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार मानचिन्ह असणार आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांना देण्यात आल्याची माहिती संस्कृती कला दर्पण संस्थेच्या अध्यक्ष अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवेयांनी नुकत्याच झालेल्या नामांकन सोहळ्यात दिली. अंधेरीतील कोहिनूर कॉन्टीनेन्टल पंचतारांकित हॉटेल मध्ये हा सोहळा पार पडला. याप्रसंगी कलर्स मराठी वाहिनीचे हेड अनुज पोदार, संस्कृती कला दर्पण संस्थेच्या संचालिका स्मिता जयकर, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता रमेश भाटकर, अभिनेता विजय कदम अशी अनेक मंडळी उपस्थित होती.
२६ एप्रिल रोजी सायंकाळी ६. ३० वाजता शहाजीराजे क्रिडा संकुल(अंधेरीच्या स्पोर्टस कॉम्प्लेक्स) येथे अंतिम पुरस्कार सोहळा होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या सिनेमांना, मालिकांना आणि नाटाकांना मिळाली नामांकने...