आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या पत्नीचे पहिल्यांदा मराठीत पार्श्वगायन, व्हिडिओत झळकले आर्ची-परशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी अभिनेता आमिर खानने महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाशी हातमिळवणी करून एक ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन केले होते. आता त्याच्या दुस-या पर्वाचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. आधीच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील अनेक गावं दुष्काळमुक्त झाली. या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात म्युझिक व्हिडिओ लाँच केला. ‘एकजुटीने पेटलं रान तुफान आलंया..’ असे बोल असणाऱ्या या गीताला अजय-अतुल या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केले असून स्वत: किरण रावने हे गीत गायले आहे. गुरु ठाकूरने हे गाणे लिहिले आहे. अजय गोगावले आणि किरण राव यांनी गायलेले हे गाणे अतिशय प्रत्ययकारीपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न आहे असे म्हणायला हरकत नाही. 
 
या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात महाराष्ट्रातील 30 तालुक्यांचा यात सहभाग होणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन केले असून ‘सैराट’ फेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या व्हिडिओत दिसत आहेत. इतकेच नाहीतर या दोघांसोबत खुद्द आमिर खानही दिसतोय. लक्ष वेधून घेणा-या या गाण्याच्या व्हिडिओमध्ये आमिर आणि 'सैराट'च्या कलाकारांसोबत नागराज मंजुळे, फातिमा सना शेख, सई ताम्हणकर, अजय-अतुल, सल्या-लंगड्या, जितेंद्र जोशी, सुनिल बर्वे ही कलाकार मंडळी सुद्धा दिसत आहेत. 

गेल्या वर्षीपासून आमिर आणि त्याची पत्नी किरण, महाराष्ट्र राज्य जलयुक्त शिबिराच्या निमित्ताने कार्यरत आहेत. या अभियानाअंतर्गत पाण्याच्या आणि अवर्षणाच्या अभावी दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवलेल्या गावांमध्ये पाण्याचा साठा आणि त्याचा योग्य तो वापर कसा करण्यात यावा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या उपक्रमांअंतर्गत जनसामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी अनोखी शक्कल लढवत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.  सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या पर्वात साताऱ्यातील वेळू या गावाला पहिला क्रमांक मिळाला होता.  
 
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि बघा,  ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानासंदर्भात जनजागृती करणारा व्हिडिओ आणि सोबतच म्युझिक व्हिडिओ लाँचची छायाचित्रे... या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव, संगीतकार जोडी अजय-अतुल, दिग्दर्शक नागराज मंजुळे, गीतकार गुरु ठाकूर यांची हजेरी होती. 
बातम्या आणखी आहेत...