आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा `पठार'सह पाच मराठी लघुपटांची निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पठार'चे दिग्दर्शक निखिलेश चित्रे - Divya Marathi
'पठार'चे दिग्दर्शक निखिलेश चित्रे
 
मुंबईः यंदा 18 मे ते 29 मे या कालावधीत आयोजिलेल्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये प्रख्यात साहित्यिक सतीश तांबे यांच्या पठारावर अमर या कथेवर आधारित व निखिलेश चित्रे दिग्दर्शित `पठार' या लघुपटासह एकुण पाच मराठी लघुपटांची प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये ओंकार कुलकर्णी दिग्दर्शित 'उकळी', उमेश बगाडे दिग्दर्शित 'चौकट' आदी लघुपटांचा समावेश आहे. भारतातील एकुण 31 लघुपटांची यंदा कान फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. प्रख्यात साहित्यिक सतीश तांबे यांची `पठारावर अमर' ही कथा 1987 साली 'नंतर' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. 
 
दोन मित्र बऱ्याच वर्षांनी भेटतात व एका पठारावर जातात. त्यातील एकाने व्यसने सोडलेली असतात. तो काव्यात्मक भाषेत आपल्या मित्राशी बोलत राहातो. दुसरा मित्र चळवळीतील कार्यकर्ता असतो. तो रोखठोक व्यावहारिक भाषेत बोलत असतो. ते दोघे एकमेकांशी बोलतात पण त्यांचा संवाद खऱ्या अर्थाने होतच नाही... या कथेवर आधारित `पठार' या लघुपटाचे दिग्दर्शक निखिलेश चित्रे यांनी सांगितले, की कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये लघुपटांसाठी स्पर्धा व स्पर्धा बाह्य असे दोन विभाग आहेत. त्यातील स्पर्धा बाह्य विभागात म्हणजेच शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये आमच्या लघुपटाची निवड झाली आहे.
 
'पठार' हा लघुपट 24 मिनिटांचा असून आहे. `पठार' लघुपट संथ लयीतला आहे. तो मला तसाच बनवायचा होता. तिच्यामध्ये काळ व अवकाशाला महत्व आहे. मला गोष्ट सांगण्यापेक्षा त्या दोन मित्रांना जो पठाराचा अवकाश मिळाला तो दाखविण्यात अधिक रस आहे. या लघुपटाचे छायाचित्रण व संकलन स्वप्नील शेटे यांनी केले आहे. निखिलेश चित्रे व स्वप्नील शेटे हे कान फिल्म फेस्टिव्हलसाठी लवकरच फ्रान्सला रवाना होत आहे. कान फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपट, लघुपटांना पुरस्कार मिळणे हे चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचे मानले जाते.
 
100 देशांतील लघुपटांचे प्रदर्शन
कान फिल्म फेस्टिव्हलमधील शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये दरवर्षी सुमारे 100 देशांतून लघुपट प्रदर्शनासाठी निवडण्यात येतात. 2016 साली या फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये मोठ्या प्रमाणावर लघुपटांची नोंदणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षीही साधारण असेच चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...