आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरूख खान, रितेश देशमुखचं अनुकरण करतोय सिध्दार्थ जाधव.. कसे ते जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः शाहरुख खान, रितेश देशमुख आणि सिद्धार्थ जाधव)
सुरज मुळेकर दिग्दर्शित ‘ड्रीममॉल’ हा चित्रपट येत्या 26 जूनला सिनेमागृहांमध्ये झळकतो आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता सिध्दार्थ जाधव खलनायकाची भूमिका साकारतो आहे. खरं तर, हिंदी सिनेसृष्टीत नायकाने खलनायक साकारणे हे काही नवीन राहिलेले नाही. शाहरूख खानपासून रितेश देशमुखपर्यंत अनेक अभिनेत्यांनी खलनायकाची भूमिका उत्कृष्टपणे करून दाखवली आणि त्यांना प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. मात्र ‘ड्रीममॉल’मध्ये अशा पध्दतीने सिध्दार्थला निगेटीव्ह भूमिका द्यायची सूरजने ठरवली खरी, पण त्यासाठी अगदी जवळच्या मित्रांपासून ते वितरकांपर्यंत सगळ्यांनी विरोध केला.
याबद्दल सांगताना सूरज म्हणतो, “मी सिनेमामध्ये सिध्दार्थचा विचार केल्यावर मला धाकधूक होती, की सिध्दार्थ मला ह्यासाठी होकार देईल का?.. पण सिध्दार्थला भूमिका आवडली आणि तो लगेच तयार झाला. पण मला निर्माताच मिळत नव्हता. सिध्दार्थला खलनायकाची भूमिका देतोय, हे कळताच सगळेच मुर्खात काढत होते. पण नंतर रेखा पेंटर यांनी या चित्रपटाला पाठबळ द्यायचे निश्चित केले. अगदी चित्रपट बनल्यावर मला वितरक मिळेना. शेवटी आमच्या निर्माती रेखा पेंटर स्वत: फिल्म रिलीज करत आहेत.”
चित्रपटात सिध्दार्थ जाधव एका विकृत सुरक्षारक्षकाच्या भूमिकेत आहे. हा सुरक्षारक्षक एका मॉलचा सिक्युरिटी गार्ड आहे. तर त्या मॉलमध्ये एका फिल्म प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये काम करणा-या एका मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा जोशी आहे. हा सिक्युरिटी गार्ड त्या मुलीला रात्री एकटी गाठून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती मुलगी काय करते, ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सिध्दार्थ आणि नेहामधला थरार चित्रपटात अनुभवयला मिळणार आहे.
चित्रीकरणाविषयी सुरज सांगतो, ”सिध्दार्थ आणि नेहाला मी सेटवर एकमेकांशी बोलू दिलं नाही. ते दोघे सीनचीसुध्दा माझ्यासोबत चर्चा करत आणि रिहर्सलसुध्दा दोघंही वेगवेगळे माझ्याचसोबत करत असतं. एकमेकांपासून सिध्दार्थ आणि नेहा जेवढे अनोळखी राहतील, तेवढे यातले सीन्स जास्त प्रखरपणे मांडू शकतील असं मला वाटत होते. कॅमेरासमोर ते दोघे काय करणार याची आम्ही आखणी करायचो नाही. त्यांना मी सिच्युएशन समजावून सांगायचो आणि बरेचदा ते त्यावर उत्स्फुर्तपणे कॅमेरावर अभिनय करायचे. यात चेज सिक्वेन्स जास्त आहेत. त्यामुळे यातले 90 टक्के सिन्स हे मी एकाच टेकमध्ये चित्रीत केले आहेत. अशी क्वचितच एखादी फिल्म असते, जी 90 टक्के वनटेक चित्रीत होते. पण मी ते शिवधनुष्य उचलायचे ठरवले आणि मला कलाकारांनीही साथ दिली. यातल्या एक-दोन सीनमध्ये तर सिध्दार्थ आणि नेहाच्या अंगाला रिग लावून त्याला कॅमेरा लावून चित्रीकरण केले आहे. पण हे मात्र मी नक्की सांगेन की, सिध्दार्थ, नेहासह युनिटमधल्या प्रत्येकाने घेतलेली मेहनत चित्रपटात दिसते आहे.”
नोटः अलीकडेच या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत क्लिक झालेली कलाकारांची आणि सिनेमाच्या टीमची छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता.