Home »Bollywood »Marathi Cinekatta» Struggle Story Of Marathi Film Producer Navneet Phondake

नारळ विक्रेता बनला चित्रपट निर्माता... स्वकष्टाच्या पाण्याने भरला ‘तलाव’

अविनाश द. राऊत | Mar 18, 2017, 05:00 AM IST

चित्रपटसृष्टीचा विचार केला तर ऑडिशन, रोलसाठी भटकंती, रिजेक्शन, डिप्रेशन अशा अनेक नकारात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. मित्राने लिहलेल्या पटकथेला अनेकांकडून नकार मिळाल्यानंतर त्याच्यातील निर्माता जागा झाला आणि पैसे कमी पडल्यावर त्याने बायकोचे दागिनेही गहाण ठेवत, चित्रपटनिर्मितीचे स्वप्न पूर्ण केलेच... गॉडफादर नसतानाही या अवलियाने आपल्या जिद्दीचा ‘तलाव’ स्वकष्टाच्या पाण्याने भरलाच...
अभिनयाचे वेड त्याला तसे लहानपणापासून. रंगभूमीवरची ती लखलखती दुनिया त्याला शालेय जीवनापासूनच खुणावत होती. कॉलेजमध्ये आल्यावर नाटक, सिनेमात काम केल्यावरही तो स्वस्थ नव्हता. मित्राने लिहिलेल्या एका पटकथेवर चित्रपट बनवायला दिग्गजांनी नकार दिल्यानंतर त्याचे पित्त खवळले आणि त्याने स्वत: निर्माता होण्याचा ध्यास घेतला... अवघ्या तिसाव्या वर्षी हा नारळ विक्रेता निर्माता बनला. नवनीत फोंडके हाच तो अवलिया तरुण... त्याचा हा वेडावाकडा प्रवासही ‘तलावा’तील पाण्याप्रमाणे संथ आणि स्वच्छ आहे.
अभिनयाचं पॅशन घेऊन सिनेसृष्टीत नशीब आजमावायला सगळेच येतात. संधी मिळेल तशी आणि मिळेल तिथे आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊन मिळालेल्या संधीचं सोनंही करतात. नवनीतनेही ‘भूताची शाळा’ हा सिनेमा आणि ‘नेता आला रे’ हे नाटक केलं. तो मूळचा कनकवलीचा असल्यामुळे चिकाटी आणि जिद्द ही त्याच्या रक्तातच होती. मुंबईत नारळ विक्रीचा व्यवसाय करून त्याचे कुटुंब गुजराण करतंय. आपल्या मित्राने लिहिलेली पटकथा घेऊन नवनीत चित्रटसृष्टीतील नावाजलेल्या निर्माता- दिग्दर्शकांकडे फिरला, मात्र ‘पाहू.. ठरवू.. नंतर या...’ यापेक्षा जास्त त्यांच्या हाती काही लागले नाही. शेवटी त्यानेच मित्राच्या पटकथेला मोठ्या पडद्यावर आणण्याचे ठरवले. प्रवास सोपा नव्हता, मात्र नवनीतची जिद्दही साधीसुधी नव्हती. घरच्यांना समजावून सांगितले आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यावर नवनीतने निर्मितीचे हे ‘शिवधनुष्य’ उचलण्याचे ठरवले.
इतरांना येतात तशा अनंत अडचणी त्याला आल्या. प्रसंगी पत्नीचे लग्नातील दागिनेही त्याने चित्रपटासाठी गहाण ठेवावे लागले. नव्या व जुन्या कलाकारांची सांगड घालताना नव्या अभिनेत्यांनी दिलेली मानधनाची ‘सूट किंवा उधारी’ही त्याला बळ देत गेली. गेल्या १० मार्चला त्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्याच्या कष्टाच्या ‘तलावा’त पाणी साचले. सौरभ गोखले, संजय खापरे या अनुभवी कलाकारांसोबत प्रियंका राऊत, वर्षा पवार, ऐश्वर्या बडदे, हृषीकेश बांबूरकर यांच्यासारख्या नवख्या कलाकारांना घेऊन त्याने आपला पहिला ‘तलाव’ पूर्ण केला.
याविषयी नवनीत म्हणतो, ''गॉडफादर नसताना केवळ आई- वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि नातलगांच्या प्रोत्साहनामुळे मी हा चित्रपट दीड वर्षांत पूर्ण करू शकलो. मी सर्वस्व पणाला लावले होते. सिनेमा निर्मितीचे काम चालू असताना मध्येच थांबवावं किंवा कुठे तरी पळून निघून जावं, असं अनेकदा वाटलं, पण आई बाबांकडे पाहून "तलाव" पूर्ण केला.''

पुढील स्लाईड्सवर बघा, 'तलाव' या सिनेमाचे ऑन लोकेशन फोटोज...

Next Article

Recommended