‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमामध्ये सचिन पिळगांवकर, मृणमयी देशपांडे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका होत्या. २०१५ मधल्या सुपरहिट सिनेमातले हे त्रयी पुन्हा एकदा २०१६मध्ये एकत्र येतायत. मागचा सिनेमा सुबोध भावेने दिग्दर्शित केला होता. तर हा सिनेमा मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित करतेय. दिग्दर्शनासोबतच निर्मितीचीही धुराही ती सांभाळणार आहे. त्यासोबतच ह्या सिनेमात अभिनय करतानाही ती दिसणार आहे. ह्या सिनेमाचं नाव असणार आहे, ‘अठरावा उंट’
सिनेमाविषयी सांगताना मृण्मयी देशपांडे म्हणते, “अनुराग सिनेमाव्दारे मी निर्मितीत पाऊल ठेवल्यावर आता दिग्दर्शनात पाऊल ठेवतेय. दिग्दर्शनाकडे वळण्याची इच्छा गेल्या काही वर्षांपासून मनात होती. आता ‘अठरावा उंट’ ह्या सिनेमाव्दारे माझं दिग्दर्शक व्हायचं स्वप्न मी पूर्ण करतेय. ‘मृण्मयी देशपांडे क्रिएशन्स’ आणि ‘आरआरपी कॉर्पोरेशन’ची ही निर्मिती असणार आहे. कर्मिशअल सिनेमातली सध्याच्या घडीची सुबोध भावे आणि सचिन पिळगांवकर ही दोन नावं जरी ह्या सिनेमात असली तरीही टिपीकल कमर्शिअल धाटणीचा हा सिनेमा नसेल. मानवी भावभावना आणि नातेसंबंधावर आधारित ही फिल्म आहे. लवकरच पुण्यात सिनेमाचं शुटिंग सुरू होईल. ”
‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट’ ह्या सिनेमाव्दारे मृण्मयी देशपांडे सध्या यशाच्या शिखरावर पाहोचलीय. त्यामुळे तिला अभिनयासाठी भरपूर ऑफर्स येतायत. पण मृण्मयी ते यश एन्कॅश करण्याच्या गडबडीत नाहीये. ती म्हणते, “मला ऑफर्स येत असल्यातरीही उगीच भारंभार सिनेमे करण्याच्या मागे मी लागणा-यातली नाहीय. मला आता फक्त सिलेक्टिव्ह आणि चांगलं काम करण्याची इच्छा आहे. अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन सगळ्याच पातळीवर काम करताना त्यात पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करायचंय.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कट्यारसाठी कसे आले होते, सुबोध सचिन, मृण्मयी एकत्र