शीर्षकापासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या सोनाली बंगेरा निर्मित व दिग्दर्शित‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी सिनेमाचा संगीत प्रकाशनाचा रंगतदार सोहळा नुकताच कलाकार तंत्रज्ञ आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. ख्यातनाम संगीतकार गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते सीडीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सिद्धार्थ महादेवन वशिवम महादेवन यांनी
आपल्या मधाळ आवाजात गीतांचे सादरीकरण केले.
मैत्री, प्रेम या भावनाया सिनेमा संगीतातून खास वेगळ्या शैलीत फुलवल्या आहेत. गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या या गीतरचनांना सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे यायुवा संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. शंकर महादेवन यांच्या दोन्ही मुलांच्या सुरांची जादू या सिनेमातून अनुभवता येणार आहे.
सिद्धार्थ महादेवन व आकृती कक्कड यांच्या स्वरसाजातले ‘दिशा मिळाली आज नवी जिंदगीला’ हे पार्टी साँग धमाकेदार झालं आहे. या गाण्याचा ताल मूडफ्रेश करणारा आहे. निहिरा जोशी देशपांडे यांनी गायलेले ‘मन माझे’ हे आर्त स्वरातील गाणं मनाला स्पर्शून जाणारं आहे. ‘सांगतो गोष्ट एका छोट्या पिल्लाची’हेमनाचा ठाव घेणारं गाणं शिवम महादेवन याने तितक्याचं भावपूर्णतेने गायलं आहे. अतिशय चपखल संगीत आणि शब्दांनी सजलेली सिनेमातील गाणी गुणगुणावीत अशी आहेत.
अभिषेक जावकर व गुरुनाथ मिठबावकर प्रस्तुत व आरात्रिका एंटरटेनमेंट प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमानेया सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. नात्यांच्या पलीकडच्या मैत्रीची गोष्ट यात पाहायला मिळेल. तीन मैत्रीणी नात्याचा गोडवा जपत प्रत्येक प्रसंगाला कशा सामोऱ्या जातात याची कथा म्हणजे ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’. अजिंक्य देव, समीर धर्माधिकारी, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर, क्रांती रेडकर, यतीन कार्येकर अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये आहे. येत्या १२ जूनला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे.