आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांचे पहिल्यांदाच जुळले सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटाच्या यशाकरिता त्यातील गाण्यांचा देखील महत्वाचा हातभार असतो. काही सिनेमे तर केवळ गाण्यांमुळेच अधिक लक्षात राहतात, त्यामुळेच तर सिनेमाचा विषय आणि त्याच्या हाताळणीसोबतच चित्रपटातील दर्जेदार गाण्यांवर देखील अधिक मेहनत घेतली जाताना दिसून येत आहे. 'राजना साजणा' हे गाणेदेखील याच धाटणीचे म्हणता येईल.
 
सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर या दाम्पत्यांच्या आवाजातले हे गाणे 'पाठशाला' फेम दिग्दर्शक मिलिंद ऊके यांच्या आगामी चित्रपटातील आहे. नुकत्याच या गाण्याचे आजीवासन स्टुडियोमध्ये सॉंग रेकॉर्डिंग करण्यात आले. रवी त्रिपाठी यांनी संगीत दिग्दर्शन केलेले हे गाणे प्रेमीजणांच्या हृदयात घर करणारे आहे.
 
या गाण्याविषयी बोलताना सुरेश वाडकर यांनी अनेक वर्षांनी असे सुमधुर गाणे गाण्याची संधी मला लाभली असल्याचे सांगितले. 'हे गाणे वारंवार गाण्याचा मोह मला होत असून, असे प्रेमगीत मी अनेक वर्षानंतर गायले असल्यामुळे मी खुश आहे', असे सुरेश वाडकर यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच या गाण्याचे संगीत दिग्दर्शक रवी त्रिपाठी हा सुरेश वाडकर यांचा शिष्य असल्यामुळे, माझ्या घराण्याची झलक या गाण्यांमधून दिसून येत असल्याचे सुरेश वाडकर पुढे सांगतात.  
 
विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर मराठीत पहिल्यांदाच ड्युएट गाताना दिसतील. सिद्धी फिल्म प्रस्तुत आणि संदीप इंगळे तसेच इनायत शर्मा यांची निर्मिती असलेल्या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणे असून, या गाण्यासोबतच सदर चित्रपटाचा मुहूर्त देखील यावेळी करण्यात आला. वाडकर दाम्पत्यांच्या हस्ते पार पाडण्यात आलेल्या या फिल्मच्या मुहूर्त लॉचवेळी सिनेमाचे लेखक प्रकाश भागवत यांनी देखील उपस्थिती लावली होती.
 
'राजना साजणा' या गाण्याबरोबरच आणखी ५ गाणी या सिनेमात असून, आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, वैशाली म्हाडे यांसारख्या गायकांचा आवाज या गाण्यांना लाभणार आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि कलाकारांची नावे तुर्तास गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून, लवकरच त्याची अधिकृत माहिती लोकांसमोर येईल, अशी माहिती निर्माते संदीप इंगळे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...