आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोमोबाईल इंजिनीअर आहे 'छंद्र प्रितीचा' मधील 'चंद्रीका', चित्रपटात येण्यासाठी केला इतका स्ट्रगल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेनमेंट डेस्क - तमाशाप्रधान चित्रपटांना नेहमीच मराठी प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. पिंजरा, नटरंग यांसारख्या चित्रपटांचे प्रेक्षकांच्या मनात केलेले घर आजही कायम आहे. मराठी रसिकांचे हे कलाप्रेम लक्षात घेता. दिग्दर्शक एन. रेळेकर आपल्यासाठी असाच एक तमाशाप्रधान चित्रपट घेऊन आले आहेत तो म्हणजे 'छंद्र प्रीतीचा'. या चित्रपटातून एक नवा चेहरा तसे पाहिले असता पूर्णपणे नवा नसला तरी अनेक दिवसांनी आपल्यासमोर येत आहे तो म्हणजे सुवर्णा काळेचा. सुवर्णा काळेला लावणी नृत्यांगना म्हणून प्रेक्षकांचे फार प्रेम मिळाले. आता या चित्रपटामधून सुवर्णा चंद्रीकाच्या रुपाने आपल्याला भेटायला येणार आहे. 
 
यानिमित्त सुवर्णाने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तिचा आतापर्यंतचा प्रवास आमच्यासोबत शेअर केला.  
 
चित्रपटातील भूमिकेबद्दल काय सांगशील?
मी साकारलेली चंद्रीका फार चंचल आहे. नृत्याची तिला आवड आहे. या नृत्यातूनच लोकांच्या मनावर तिला राज्य करायचे आहे. तिच्या या प्रवासात अभिनेता हर्ष कुलकर्णी (शाहीर) कसा येतो. सुबोध भावेने आंधळ्या ढोलकीवादाची भूमिका केली आहे. प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी इतके सांगू शकते की या चित्रपटानिमित्त माझ्या अभिनयातील बदल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक कलाकाराला त्याचे सर्व गुण दाखवता येतील अशा एका संधीची गरज असते. या चित्रपटानिमित्त मला अभिनय आणि नृत्य करायला मिळाले. लोकांचा चित्रपटाच्या ट्रेलरला पाहिलेला प्रतिसाद आणि माझ्या अभिनयाला दिलेली दाद सुखावून जाते. 
 
२०१३ साली तु २ मराठी चित्रपट केलेस (या टोपीखाली दादले, दणक्यावर दणका) त्यानंतर ते आतापर्यंत मोठा ब्रेक घेतलास, त्यादरम्यान काय करत होतीस?
- 2013 नंतर बरेचसे चित्रपट आले पण ते रिलीज झाले नाही. चित्रपट शूट होऊन रिलीजपर्यंत जाण्यास खूप वेळ असतो. त्यादरम्यान बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. पण सुदैवाने या चित्रपटाचे शूटिंग ते रिलीजपर्यंतचा प्रवास मी अनुभवतेय. निर्मात्यांनी या चित्रपटावर फार मेहनत घेतली आहे. चित्रपटाचे प्रमोशनही खूप चांगल्याप्रकारे केले जात आहे याचा आनंद आहे. यादरम्यान मी घाशीराम कोतवाल, प्रायोगिक केले. यादरम्यान स्वतःतील अभिनयक्षमता वाढवण्यासाठी या सर्वांचा उपयोग झाला. माझे आईवडील दोघेही याच काळात खूप आजारी होते. त्यांच्याकडेही मी याकाळात पूर्ण लक्ष दिले. 
 
कोणीही गॉडफादर नसताना इथपर्यंतचा प्रवास कसा केलास?
"खूप जास्त संघर्ष करावा लागला. माझ्या घरी एकदम शैक्षणिक वातावरण आहे. दोन बहिणींनी पीएचडी केले आहे. पण माझा अगोदरपासून शिक्षणाकडे फारसा कल नव्हता त्यामुळे मी कसेबसे ऑटोमोबाईल इंजिनीअरींग पूर्ण केले. त्यानंतर जॉबही केला आणि तिथे 15 दिवसातच मला कंटाळा येऊ लागला. इतके नॉर्मल लाईफ मी जगू शकत नाही असे घरच्यांना सांगून त्यांची संमती मी मिळवली. कोणाचेही मार्गदर्शन नसताना नेमके काय आणि कसे करायचे असा विचार करु लागले आणि माझ्या स्ट्रगलला सुरुवात झाली. त्यावेळी डान्स शोज् किंवा इतर काही माध्यमे नव्हती. तेव्हा लोकधारामधून आम्ही नृत्याचे कार्यक्रम करत असू. त्यादरम्यान मेघराज राजभोसले यांच्या डान्स बॅनरखाली सुवर्णरंग तर्फे अनेक गाणे परफॉर्म केले. तेथे नटरंगमधील अप्सरा आली आणि वाजले की बारा या गाण्यांच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांची दाद मिळाली. लावणी आणि कथ्थक यांतील फरक मला येथे समजला. माझे खास लावणीचे कार्यक्रम फार गाजले आणि 2011 साली मला बालगंधर्व पुरस्कार मिळाला. पण लावणी नर्तिका यापुढेही मला ओळख हवी होती. कोल्हापूरचे सुरेंद्र पन्हाळकर यांनी माझा कार्यक्रम पाहिला आणि त्यांनी मला माझा पहिला चित्रपट 'या टोपीखाली दडलय काय' याची ऑफर दिली. त्यांच्यातील विश्वासामुळे मी चित्रपटात अभिनय केला."  

शुक्राची चांदणी हा तुझा लावणी कार्यक्रम खूप गाजला, तिथून चित्रपटात एन्ट्री कशी झाली, लावणी नृत्यांगना ते अभिनेत्री प्रवास कसा केलास?
"शुक्राची चांदणी या कार्यक्रमाने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. प्रत्येत लावणी कलाकारांच्या मागे त्यांची पार्श्वभूमी असते पण चित्रपटच काय कलाक्षेत्रातही माझ्या घरातील कोणीच नाही. माझ्या घरातील लोकांचा मला अजिबात विरोध नव्हता. अभिनयात जायचे असेल तर लावणी करु नकोस असा सल्लाही मला अनेकांनी दिला. त्या कार्यक्रमाला लोकांची तुफान गर्दी व्हायची. त्यामुळे सलग प्रयोग करत असल्याने माझ्या हातातून काही चित्रपटांच्या ऑफरही गेल्या. "

लावणी नृत्यांगणा की अभिनेत्री काय सर्वात जास्त एन्जॉय करतेस?
"प्रत्येक अभिनेत्रीला अभिनयासोबतच मग तो कोणताही डान्स असो लावणी असो अथवा बॉलिवूड डान्स सर्वच यायला हवे असे मला वाटते. मला केवळ नृत्यांगना किंवा अभिनेत्री बनायचे नसून एक बेस्ट अभिनेत्री जी सर्वच गोष्टीत पारंगत आहे, असे बनायचे आहे. "
 
सुबोध भावे, एन, रेळेकर यांसारख्या मराठीतील मातब्बर मंडळींसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? 
"सर्वासोबत काम करताना खूप मजा आली. सर्वप्रथम सुबोध भावे यांच्यासोबत काम करताना थोडे दडपण आले होते पण ज्यापद्धतीने ते सेटवर वावरतात, बोलतात त्यातून त्यांच्यारुपाने एक चांगला मित्र भेटला असे वाटते. त्यांचा प्रत्येक सल्ला मी आता अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. दिग्दर्शक एन. रेळेकर हे फार मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. सेटवरही ते मला चंद्रिका म्हणूनच बोलवायचे. एका गावात शूटिंग करत असताना मला इच्छा झाली म्हणून रेळेकर माझ्यासाठी खास पाणीपुरी घेऊन आले होते. इतकी काळजी घेणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला याबद्दल मी खूप समाधानी आहे. "

'नटरंग'सारख्या चित्रपटांमुळे तमाशाप्रधान चित्रपटांकडून लोकांच्या फार अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी खास काही मेहनत घेतलीस का?
"चित्रपटातील चंद्रीका आणि माझ्या स्वभावात अजिबात साम्य नाही. चंद्रीका जेवढी नखरेल तेवढीच माझी साधीसुधी राहणी आहे. त्यासाठी मी चंद्रीकाचे नखरे, हावभाव, तिची बोलण्याची पद्धत यावर मेहनत घेण्यास सुरुवात केली. मी घरातही चंद्रीकाप्रमाणेच बोलायला सुरुवात केली होती. चित्रपटात मातब्बर कलाकार, दिग्दर्शकाची टीम आहे आणि त्यामुळे मला माझ्या रोलमध्ये कुठेही कमी पडायचे नव्हते. चित्रपट आपण जसा पाहतो तसा शूट कधीच होत नाही. शेवटचा सीन पहिले तर पहिले प्रेमगाणे शेवटी असे सर्व बदल होत होते. सुबोध अॅक्शन म्हटले की त्या चित्रपटातील रोलमध्ये अक्षरशः डुबून जायचे पण मला त्या सीन्सची जुळबाजुळव करणे अवघड वाटत होते. अशावेळी मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून पुन्हापुन्हा ते सीन वाचायचे आणि मग शूटिंगला जायचे. रेळेकर यांनी माझ्या या चित्रपटावर फार मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी मला वजनही वाढवायला लावले होते."  
 
आगामी प्रोजेक्ट काय आहेत, अभिनेत्री म्हणून पुढे जाण्याची इच्छा आहे का?
"मला कधीही थांबुन राहायला आवडत नाही. आयुष्यातील चढउतारातही मी केवळ चालत राहण्याचे काम करते. त्यामुळे मला एकाच प्रकारच्या साच्यात राहायला आवडत नाही. मला आता यापुढे प्रत्येक प्रकारचा रोल करायचा आहे. खासकरुन चॅलेंजिंग भूमिका करायला नक्की आवडेल."
 
ड्रीम प्रोजेक्ट काय आहे? कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल?
"मला ऐतिहासिक भूमिका साकारायला फार आवडेल. नाना पाटेकर आणि अजय देवगण हे माझे आवडते कलाकार आहेत.यांसोबत काम करण्याचा अनुभवही घेण्याची फार इच्छा आहे." 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुवर्णा काळेचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...