आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tejashri Pradhan Becomes Nostalgic, Shares Her Memories About \'Honar Sun\'

दिव्यमराठीसाठी जान्हवीने केलं शेवटच्या दिवशी फोटोशूट, वाचा तेजश्रीच्या जान्हवीविषयीच्या आठवणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ जुलै २०१३ ला तेजश्री प्रधान जान्हवी बनली. आणि तिच्यावर गेली अडीच वर्ष तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना तेजश्री प्रधानच्या मनात अडीच वर्षात चाहत्यांनी वेगवेगळ्या पध्दतीने कसं प्रेम व्यक्त केलं ह्याच्या भरपूर आठवणी आहेत.
नेहमी सहा सासवांच्या गोतावळ्यात वावरणा-या जान्हवीची भुमिका करणा-या तेजश्रीने मात्र शेवटच्या दिवशी म्हणजेच जान्हवीच्या बाळाच्या बारशाच्या दिवशी आपल्या सहस्रबुध्दे कुटूंबासोबत divyamarathi.comसाठी छान फोटोशुट केलं.
आपल्या मालिकेतल्या आईवडिल भावासोबत वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देऊन फोटो काढून झाल्यावर तेजश्री भूतकाळात रमत गप्पा मारू लागली. ती म्हणाली, “मी गेली आठ वर्ष ह्या क्षेत्रात काम करतेय. ह्या अगोदर मी खूप प्रोजेक्ट्स केले. मात्र ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेने मला ओळख आणि प्रसिध्दी मिळवून दिली. त्यामुळे हा प्रवास मला कायमचा लक्षात राहणारा आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका मी आयुष्यभरासाठी माझ्या मनाच्या कोप-यात जपून ठेवणार आहे.”
‘होणार सून…’ वर जसा चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव झाला. तसाच काही लोकांनी ‘आता पूरे’ म्हणत मालिका कंटाळवाणी होत असल्याची टीकाही केली. ते आठवताना तेजश्री म्हणाली, “कलाकाराला यशाची पायरी चढताना, समीक्षांनाही सामोरं जावं लागतं. अनेकांनी ह्या मालिकेविषयी बरं-वाईट बोललं. पण म्हणून मी ह्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहत नाही. कारण एखाद्याने तुमच्याविषयी वाईट बोलतानाही त्या व्यक्तिला स्वत:ची एनर्जी तुमच्यासाठी वापरावी लागतेच ना.”
“आणि आपण त्यांनाच दुषणं देतो, किंवा वाईट बोलताना त्यांच्यासाठीच वेळ,आणि एनर्जी खर्च करतो, जेव्हा त्या व्यक्तिविषयी मनापासून वाटतं. त्यामुळे आमच्याविषयी समीक्षा करण्यासाठीही लोकांनी आमच्यावर प्रेम केलंच असणार. आपल्या आवडत्या मालिकेकडून आणि कलाकाराकडून चाहत्यांच्या काही अपेक्षा असतील, आणि त्या पूर्ण झाल्या नसतील. तर ती खदखद त्यांनी व्यक्त केली, तर बिघडलं कुठे.”
मालिका बंद होणार म्हटल्यावर अनेक चाहते अस्वस्थही झाले. ती म्हणते, “नुकताच एका व्यक्तिने मला फोन केला, आणि म्हणाला, मॅडम तुम्ही मालिका बंद करतायत म्हणून माझी बायको खूप डिस्टर्ब झालीय. तिने त्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलंय. तर तुम्ही प्लिज तिच्याशी बोलाल का? लोकं आमच्या मालिकेशी इतकी एकरूप झाली होती. नाटकाच्या प्रयोगाच्या निमीत्ताने सुध्दा लोकं जेव्हा भेटतात. तेव्हा मालिका बंद होण्याविषयी नाराजी व्यक्त करतात. आपल्या असण्याने फरक पडण्यापेक्षा आपल्या नसण्याने लोकांना फरक पडतोय. ह्याचा अर्थ आपण त्यांचं मन जिंकलं होतं, हे जाणून बरं वाटतं.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, तेजश्री देतेय आपल्या चाहत्यांना सल्ला