27 जुलै रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमा 'चला हवा येऊ द्या'ने यशस्वी शंभर भाग पूर्ण केले. या शोचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख या शोच्या मंचावर अवतरला होता. विशेष म्हणजे 'चला हवा येऊ द्या' या शोचा पहिला एपिसोडसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशीच ऑन एअर गेला होता आणि या पहिल्या एपिसोडमध्ये रितेश देशमुख त्याच्या 'लय भारी' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आला होता. आता या शोची शंभरी साजरी करण्यासाठीसुद्धा रितेशच आला होता.
'माऊली माऊली..' या गाण्यावर रितेशची धमाकेदार एन्ट्री शोमध्ये झाली. या स्पेशल एपिसोडमध्ये रितेशने त्याच्या आगामी 'बँगिस्तान' या सिनेमाचे प्रमोशन केले. आता रितेश आणि तोही मराठी शोमध्ये आला आहे म्हटल्यावर त्याच्या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमाचा उल्लेख झाला नाही तरच नवल. 'चला हवा येऊ द्या' या शोच्या मॅड फॅमिलीतील कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे या कलाकारांनी 'लय भारी'वर आधारित 'जाम भारी' हे धमाकेदार आणि हसूनहसून लोटपोट करणारे स्किट सादर केले. स्वतः रितेशसुद्धा हे स्किट बघून हसूनहसून पुरता लोटपोट झाला. या कलाकारांचे कॉमिक टायमिंग बघून रितेश स्वतःला शिटी वाजवण्यापासून थांबवू शकला नाही. इतकेच नाही तर सिनेमातील 'चल होळीचा सण...' या गाण्यावर त्याने श्रेया बुगडे आणि इतर कलाकारांसोबत मस्त तालही धरला.
शोच्या शेवटचा टप्पा थोडा भावनिक होता. थुकरटवाडीत एक पोस्टमन रितेशसाठी एक खास पत्र घेऊन आला होता. हे पत्र होते रितेशचे वडील दिवंगत विलासराव देशमुखांचे. सागर कारंडेने केलेले पत्रवाचन ऐकून रितेश भावूक झाला. त्याचे डोळेही पाणावले. अरविंद जगताप यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पत्राने रितेशलाच नव्हे तर सर्व प्रेक्षकांनाही भावूक करुन सोडले.
एकंदरीतच धमालमस्ती आणि भावूक करणा-या क्षणांनी 'चला हवा येऊ द्या'चा सोमवारचा भाग खूप गाजला. विशेष म्हणजे मंगळवारच्या भागातसुद्धा रितेश या शोमध्ये हजर राहणार असून या एपिसोडमध्ये या शोच्या टीमकडून त्याला एक सरप्राईज मिळणार आहे. आता हे सरप्राईज काय असणार, हे जाणून घेण्यासाठी 'चला हवा येऊ दे'चा मंगळवारचा भाग बघायलाच हवा, नाही का...
रितेशच्या उपस्थितीत 'चला हवा येऊ द्या'च्या शंभरावा भाग कसा रंगला याची एक छोटीशी झलक आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत... चला तर मग पाहुयात शोची ही खास झलक...
(फोटो सौजन्यः झी मराठी)