एन्टरटेन्मेंट डेस्कः केतकी माटेगावर हिने गायनाबरोबरच अभिनयातही मोठी मजल मारली आहे. अनेक चित्रपटांत तिच्या भूमिका गाजल्या. तिच्याचप्रमाणे आणखी एक तरुण चेहरा मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला आला. हा तरुण चेहरा म्हणजे, आर्या आंबेकर. 16 जून 1994 रोजी नागपुरात जन्मलेल्या आर्याचा आज वाढदिवस असून तिने वयाची 23 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आर्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जुलै 2008 ते फेब्रुवारी 2009 या काळात झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या पर्वातून ती घराघरांत पोहोचली होती. आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर आर्याने सारेगमपच्या अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. पण त्यावेळी तिची ओळख एक लहानगी गायिका अशी होती.
आता 23 वर्षांची झालेल्या आर्याचे याचवर्षी 'ती सध्या काय करतेय' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले आहे. आर्याचा हा पहिलाच मराठी सिनेमा हिटच्या यादीत सामील झाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. शिवाय अलीकडेच आर्याचा अलवार मन हे माझे नावाचा व्हिडिओ अल्बमही रिलीज झाला.
आईकडून मिळाले संगीताचे बाळकडू...
आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दाम्पत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आपल्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे. आर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. त्यांनी आर्या जेमतेम 2 वर्षांची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षांची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली होती.
मालिका-फिल्मसाठी केले पार्श्वगायन...
आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी सिनेमे आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्ती मिळवणारी आर्या सर्वात लहान गायिका आहे. स्टार प्रवाहवरील 'सुवासिनी' आणि झी मराठीवरील 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकांसाठी आर्याने पार्श्वगायन केले आहे. शिवाय 'ती सध्या काय करतेय' या सिनेमासाठीही आर्याने गाणी गायली आहेत.
आर्याचे निवडक अल्बम
पंचरत्न भाग 1, 2, 3
मला म्हणत्यात आर्या आंबेकर
हम और तुम - हिंदी गाण्यांचा गीतसंग्रह
दिवा लागू दे रे देवा - पहिला सोलो अल्बम
अलवार मन हे माझे - व्हिडिओ अल्बम
सोशल मीडियावर असते अॅक्टिव...
सोज्वळ चेहरा लाभलेली अभिनेत्री म्हणून आर्याने मराठी फिल्म इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली आहे. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते. मेकअपच नव्हे तर विदाऊट मेकअपसुद्धा आर्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. सोशल मीडियावर अॅक्टिव असलेल्या आर्याचे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विदाऊट मेकअपमधील अनेक फोटोज बघायला मिळतात.
आर्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील छायाचित्रांचा खास नजराणा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये आर्याने स्वतः शेअर केलेले तिचे मेकअप आणि विदाऊट मेकअपमधील फोटोज तुम्हाला बघता येतील.
आर्याचे हे खास फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर आणि हो, आर्याच्या 'अलवार मन हे माझे' या व्हिडिओची खास झलकही शेवटच्या स्लाईडवर बघायला विसरु नका...