आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावर नव्याने फुलणार दगडू प्राजक्ताची 'अधुरी प्रेमकहाणी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टाईमपास' सिनेमातल्या दगडू प्राजक्ताच्या लव्हस्टोरीने अबाल-वृद्ध साऱ्यांनाच भुरळ घातली होती. 'टाइमपास' चित्रपटात शेवटी होणारी दगडू आणि प्राजक्ताची ताटातूट पाहून अनेक प्रेक्षक हळहळले होते. 'मला वेड लागले प्रेमाचे' असं म्हणत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दगडू-प्राजक्ताची अधुरी प्रेमकहाणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. 'एक अधुरी प्रेमकहाणी आता पूर्ण होणार' या महाप्रीमिअरमधून दगडू प्राजक्ताची भावस्पर्शी प्रेमकहाणी पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
19 एप्रिलला झी टॉकीज वर हे दोघही आपल्या प्रेमाची कबुली देत एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त करणार आहेत. 'टाईमपास' चित्रपटातील दगडू प्राजक्तावर चित्रित झालेले काही सोनेरी क्षण या महाप्रिमिअरच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येणार आहेत.
रवी जाधव दिग्दर्शित आणि 'एस्सेल व्हिजन' आणि ‘अथांश' कम्युनिकेशन' निर्मित 'टाईमपास' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. 19 एप्रिलला दाखवण्यात येणारा 'टाईमपास' चित्रपट हा सुद्धा थिएटर मध्ये दाखवण्यात आलेल्या चित्रपटापेक्षा पूर्ण वेगळा असणार आहे. झी टॉकीजचा वेगळा प्रयत्न 'टाईमपास' चित्रपटासाठी यशाचे नवे मापदंड निर्माण करू पाहणारा असेल. दगडू प्राजक्ताची हळवी तरल प्रेमकहाणी परत फुलताना प्रेमकहाणीचा गोडवा अधिकच वाढणार आहे.
बहुचर्चित 'टाईमपास 2' चित्रपटाची ही सध्या चांगलीच हवा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रचंड हिट्स मिळाल्या आहेत. झी टॉकीजवर दाखवण्यात येणाऱ्या या महाप्रिमिअरमध्ये आधीच्या दगडू-प्राजक्ताच्या जोडीची (प्रथमेश परब, केतकी माटेगावकर) आणि आताच्या दगडू-प्राजक्ताच्या जोडीची (प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट) खास झलक पाहता येणार आहे.