आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेत्रींभोवती ग्लॅमर : प्रार्थना बेहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समाजाशी सुसंगत व्यक्तिरेखा चित्रपटांतून साकारल्या जातात तेव्हाच त्या लोकप्रिय होतात. ३० वर्षांपूर्वी तमाशा विषयावर अनेक चित्रपट आले. मात्र, चित्रपटकर्त्यांनी बदलता समाज लक्षात घेतला नाही. त्यामुळे सहावारी साडीच्या जमान्यात अभिनेत्री नऊवारीत दिसत होत्या. आज तशी परिस्थिती नाही. समाजातील उच्चवर्ग किंवा मध्यमवर्गातील तरुणी ज्याप्रमाणे वावरते तशीच किंवा त्यापेक्षा एक पाऊल पुढे अभिनेत्री वावरताना दिसते. त्यामुळे आजच्या अभिनेत्रींभोवती ग्लॅमर आहे, असे मत अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने व्यक्त केले.
"तुझ्याविन मरजावां' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरात आली असताना ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने तिच्याशी संवाद साधला. या वेळी मराठी अभिनेत्री आणि त्यांच्याभोवतीचे वलय या विषयावर तिने दिलखुलास गप्पा मारल्या. मराठीतील आताच्या पिढीतील सई ताम्हणकर, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी आणि तुलाही ग्लॅमरचे वलय आहे, मात्र यापूर्वी तसे होत नव्हते या प्रश्नावर उत्तर देताना प्रार्थना म्हणाली, आजच्या काळातील अभिनेत्रींची वेशभूषा आणि वैचारिक भूमिका समाजात वावरणाऱ्या चारचौघींसारखी आहे.
यामध्ये लेखक, दिग्दर्शक यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांनी आजच्या काळाशी सुसंगत अशा व्यक्तिरेखा चित्रपटांतून उभ्या केल्या. आम्ही त्या साकारत आहोत. समाजात असलेल्या सर्वांप्रमाणे किंवा आम्ही खऱ्या आयुष्यात अशाच आहोत म्हणूनही समाजाला ते जास्त अपील होत असावे अस मला वाटते. १२ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
मरजावा चित्रपटात मी निशी या पंजाबी मुलीची भूमिका करते आहे. माझा असा विचार मुळीच नाही की एकदा पंजाबी व्यक्तिरेखा केली आहे ना, मग पुन्हा नको. त्याउलट मी असे म्हणेन की, ते मला अधिक उत्तमपणे करता येईल. विविध भूमिका साकारण्याचे आव्हान पेलणे अधिक रंजक आहे, पण म्हणून पुन्हा त्याच प्रकारची भूमिका नको म्हणणेही योग्य नाही. पंजाबी मुलीलाच निरनिराळ्या पद्धतीने कसे साकारता येईल यात माझे कौशल्य आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना ते नक्कीच अनुभवायला मिळेल, असा माझा विश्वास आहे.
माझे आई-वडील माझा ड्रायव्हिंग फोर्स
मी आजवर जे काही केले ते माझ्या आई-वडिलांसाठी. मी त्यांना लहानपणापासून माझ्यासाठी खूप काही करताना, बोलताना पाहिले आहे. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास मला काम करण्यासाठी बळ देतो.
बातम्या आणखी आहेत...