'कॉफी आणि बरंच काही', 'बाजीराव मस्तानी' यांसारख्या दर्जेदार कलाकृतींमधुन रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता वैभव तत्त्ववादी आता चक्क ''चीटर'' बनला आहे. हो पण जास्त तर्कवितर्क लावू नका. खासगी आयुष्यात वैभव मुळीच चीटर झालेला नाही, तर हे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते अजय फणसेकर "चीटर" या सिनेमाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा विषय घेऊन येणार आहेत. नुकतेच या सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. सिनेमाच्या नावावरूनच आपल्याला या सिनेमाची कथा जरी लक्षात येत असली तरी त्यातील वेगळेपण जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.
स्वीस एन्टरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या 'चीटर' सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून बी. लक्ष्मण ह्यांनी या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पहिले आहे. अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट असून झाकरी नृत्य कलाप्रकार ही आपल्याला पहायला मिळणार आहे.
अखिल जोशी यांनी या सिनेमातील चारही गाणी लिहिली असून अभिजित नार्वेकर यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच एकाच मराठी सिनेमासाठी दोन गाणी गायली आहेत.गायक अवधूत गुप्ते, गायिका उर्मिला धनगर, आनंदी जोशी यांच्या आवाजातही सिनेमातील अन्य गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
"चीटर" सिनेमाचे ७०% शुटींग हे मॉरिशियस येथे झाले असून उर्वरित शेवटच्या टप्प्यातील शुटींग हे पुणे येथे झाले आहे. तर असा हा आगळा वेगळ्या धाटणीचा "चीटर" सिनेमा येत्या २२ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा मुळचा पुण्याचा असलेल्या कूल ''चीटर'' वैभवचा तितकाच कूल टीझर...