Home »Bollywood »Marathi Cinekatta» Winners List And Photographs Of Zee Chitra Gaurav Awards Night

झी चित्र गौरव पुरस्कारांवर ‘सैराट’ची मोहोर, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 14:20 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणारा, चित्रपटसृष्टीसह अवघ्या रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला. आपल्या हळव्या प्रेमकथेने आणि झिंगाट गाण्यांनी सर्वांनाच वेड लावणा-या 'सैराट' चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांसहित आठ पुरस्कारांवर ‘सैराट’ने आपलं नाव कोरलं. डोळे दिपवून टाकणारा रंगमंच, त्यावर सादर होणारे रंगतदार नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांमधून वाहणारा सळसळता उत्साह अशा वातावरणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याचं आकर्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार. आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आणि त्यांचा सन्मान करणाऱ्या झी चित्र गौरव पुरस्काराची प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतील सर्वच मंडळी आतुरतेने वाट बघत असतात. या सोहळ्यात कोण बाजी मारतो याकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या पुरस्काराबाबतीतही ही उत्सुकता कायमच होती. मराठी रसिकांची मने जिंकलेले चित्रपट आता कोणता पुरस्कार जिंकतात याबद्दलची उत्कंठा उपस्थितांमधे होती. यंदा हाफ तिकीट, कासव, नदी वाहते, उबुंटू, वाय झेड, जाऊंद्याना बाळासाहेब, सैराट यांसह अनेक चित्रपटांना विविध विभागांत नामांकने मिळाली होती. यामध्ये सैराटने सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकाविले. याशिवाय इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता हा पुरस्कार अभिनेता आकाश ठोसरने तर गार्नियर नॅचरल प्रस्तुत मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनेत्री रिंकु राजगुरुने मिळविला.


यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारांमध्ये आकाश ठोसर (सैराट), गिरीश कुलकर्णी (जाऊंद्याना बाळासाहेब) आणि मकरंद अनासपुरे(रंगा पतंगा) यांच्यामध्ये चुरस रंगली आणि यात बाजी मारली ती गिरीश कुलकर्णी यांनी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रिंकू राजगुरु (सैराट), पर्ण पेठे (फोटोकॉपी) आणि इरावती हर्षे (कासव) यांच्यामध्ये बाजी मारली ती इरावती हर्षेने.
नृत्याविष्काराचे अनोखे रंग
झी चित्र गौरवच्या या सोहळ्याला चार चांद लावले ते रंगतदार नृत्याविष्काराने. डोळे दिपवून टाकणारे देखावे आणि नृत्याच्या अदा दाखवणारे मराठमोळे कलाकार. प्राजक्ता माळी, श्रुती मराठे, वैभव तत्त्ववादी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, वैदही परशुरामी, रसिका सुनील या कलाकारांच्या देखण्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली. यातही सर्वांची दाद मिळवून गेला तो अभिनय बेर्डेचा परफॉर्मन्स. आपले वडिल लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्याच गाण्यांतून अभिनयने आदरांजली दिली आणि त्याची साथ दिली ती लक्ष्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रींनी म्हणजेच किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, किशोरी अंबिये आणि निवेदिता सराफ. याशिवाय ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही रंगमंचावर येत अभिनयच्या सोबतीने आपल्या नृत्याची झलक दाखवली.
सीमाताईंना मानाचा मुजरा
‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘पाठलाग’, ‘वरदक्षिणा’, ‘सरस्वती चंद्र’, ‘आनंद’ अशा एक ना अनेक मराठी हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या सीमा देव यांना यावर्षीचा झी जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते. “आजवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कलाक्षेत्राची जेवढी सेवा करता येईल ती प्रामाणिकपणे केली. प्रेक्षकांनी वेळोवेळी त्यांच्या आवडीची पोचपावती दिली आणि आता हा पुरस्कार म्हणजे त्या सा-या मेहनतीचं गोड फळ आहे” असे मनोगत सीमाताईंनी व्यक्त केले. आपल्याला आदर्शस्थानी असलेल्या सुलोचनादीदींच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं याहून मोठा सन्मान असूच शकत नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी रंगमंचावर सीमाताईंचे दोन्ही सुपुत्र अजिंक्य व अभिनय देव तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

या रंगतदार सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी केलं. एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रंगात रंगवून टाकणारा असा हा भव्य दिव्य सोहळा येत्या 26 मार्चला सायंकाळी 7 वा. झी मराठी आणि झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याची खास क्षणचित्रे...

Next Article

Recommended