आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच सुरु होणार ‘वायझेड’गिरी, पोस्टर झाले लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘वायझेड’ असं अतरंगी नाव असलेल्या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून मराठी प्रेक्षकांना लागलेली उत्सुकता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या पोस्टरने अजूनच वाढवली आहे. त्यात हा सिनेमा समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन या लेखक-दिग्दर्शक जोडीचा असल्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. सगळ्या रंगांचा वापर करून लिहिलेली इंग्रजी वायझेड ही अक्षरं अशा स्वरुपाचं हे पोस्टर पाहिल्यावरच सिनेमात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार याचा अंदाज येतो. हे आकर्षक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून आता स्टारकास्ट कोणती असेल यावर सोशल कट्टयावर चर्चा रंगत आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाबिय्रा आणि प्रतिसाद प्रोडक्शन्सचे अनीश जोग यांची निर्मिती असलेल्या वायझेड सिनेमाच्या या पहिलंवहिल्या पोस्टरनं नुकतंच मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं.
समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन या जोडीनं आतापर्यंत नाट्य आणि सिनेमा क्षेत्राला एकापेक्षा एक सरस व दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘डबलसीट’ आणि ‘टाइमप्लीज’ हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरलेले आहेत. रोजच्या जगण्याशी संबंधित तरीही टवटवीत कथा, क्षणात आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तीरेखा आणि विनोदाचा प्रसन्न शिडकावा हे त्यांच्या आतापर्यंतच्या कलाकृतींचं ठळक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. समीर- क्षितिजच्या सिनेमांतून प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवं आणि वेगळं पाहायला मिळतं असं समीक्षकही म्हणतात. त्यामुळे साहजिकच ‘वायझेड’ सिनेमात कोणते कलाकार दिसणार, त्यांच्या व्यक्तीरेखा कशा असतील, पात्रांना अतरंगी नाव देण्याची त्यांची पद्धत या सिनेमातही पाहायला मिळणार का असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्याची उत्तरं मिळायला वेळ असला, तरी सेटवरच्या सूत्रांनी आम्हाला खास माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं, की हा सिनेमा अतिशय मनोरंजक आणि खुसखुशीत आहे. सगळ्याच वयोगटातल्या चाहत्यांना आवडेल असा हा सिनेमा असून त्यानं ‘वायझेड’ या शब्दाचा अर्थच बदलेल. हे ऐकल्यावर सिनेमाची उत्सुकता आणखी वाढणार असली तरी ही ‘वायझेड’गिरी सुरू होईपर्यंत थोडं थांबावं लागेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे इतर पोस्टर्स...
बातम्या आणखी आहेत...