Home | Bollywood | Marathi Cinekatta | Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai

झी नाट्यगौरव पुरस्कार : 'ढॅण्टॅढॅण'ची बाजी, स्पृहा ठरली बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 28, 2015, 03:04 PM IST

संगीत नाटकांपासून सुरू झालेला मराठी रंगभूमीचा प्रवास आज व्यावसायिक आणि प्रायोगिक या वाटांवरून यशस्वीपणे पुढे जात आहे.

 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  (झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त कलाकार)

  संगीत नाटकांपासून सुरू झालेला मराठी रंगभूमीचा प्रवास आज व्यावसायिक आणि प्रायोगिक या वाटांवरून यशस्वीपणे पुढे जात आहे. आज मराठीमध्ये या दोन्ही रंगभूमींवरून नव्या कल्पना, नवे विषय आणि नवे नाट्याविष्कार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या सा-या नाट्याविष्कारांची आणि त्याच्याशी संबंधित कलाकार तंत्रज्ञ यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा पुरस्कार सोहळा म्हणजे झी गौरव. यावर्षीपासून मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांसाठी स्वतंत्र असा झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला. मराठी नाटकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच स्वतंत्र सोहळा मुंबईत 26 मार्चला नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.
  नाट्यसृष्टीमध्ये झालेले महत्त्वाचे बदल, घटना यांचा आढावा घेत गीत, नृत्य आणि प्रहसनांच्या माध्यमातून हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. व्यावसायिक नाटकांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित आणि भरत जाधव अभिनीत ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाने ७ पुरस्कार मिळवत सरशी घेतली, तर प्रायोगिक नाटकांमध्ये ‘एक बाकी एकाकी’ने सर्वोत्तम नाटकाचा मान मिळवला. आपल्या लेखणीतून वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, पार्टी, वासांसि जिर्णानी यांसारखी अनेक महत्त्वपूर्ण नाटके मराठीच नव्हे तर जागतिक रंगभूमीला देणारे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि कमलाकर सोनटक्के यांच्या उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
  व्यावसायिक नाटकांमध्ये ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘कळत नकळत’, ‘त्या तिघांची गोष्ट, ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ आणि ‘सर्किट हाऊस’ यामध्ये सर्वोत्कृष्ट नाटकासाठीची चुरस रंगली त्यात ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाने हा मान मिळवत बाजी मारली. सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा, सहाय्यक अभिनेत्री, दिग्दर्शक आणि विशेष लक्षवेधी नाटक असे सात पुरस्कार मिळवत ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सर्वोत्कृष्ट लेखक मिहीर राजदा, अभिनेता मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत असे महत्त्वाचे पुरस्कार मिळवत ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक यावर्षीचे सर्वोत्कृष्ट नाटक ठरले.
  पुरस्कार प्राप्त कलाकार पुढीलप्रमाणेः
  सर्वोत्कृष्ट नेपथ्य
  प्रदीप मुळ्ये - ढॅण्टॅढॅण
  सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
  शीतल तळपदे - ढॅण्टॅढॅण
  सर्वोत्कृष्ट वेशभूषा
  ओंकार दत्त - ढॅण्टॅढॅण
  सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
  गंधार संगोराम - बेगम मेमरी आठवण गुलाम
  सर्वोत्कृष्ट रंगभूषा
  मिलिंद कोचरेकर - ढॅण्टॅढॅण
  सर्वोत्कृष्ट विनोदी कलावंत
  समीर चौघुले - बी. पी.
  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
  गौरी सुखठणकर - ढॅण्टॅढॅण
  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
  भूषण कडू - सर्कीट हाऊस
  सर्वोत्कृष्ट लेखक
  मिहिर राजदा - गोष्ट तशी गमतीची
  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  लीना भागवत - गोष्ट तशी गमतीची
  सर्वोत्कृष्ट अभिनेता
  मंगेश कदम - गोष्ट तशी गमतीची
  Garnier Black Natural Best Performer of the Year
  स्पृहा जोशी
  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
  केदार शिंदे - ढॅण्टॅढॅण
  सर्वोत्कृष्ट नाटक
  गोष्ट तशी गमतीची - सोनल प्रॉडक्शन
  विशेष लक्षवेधी नाट्यकृती (जाहिर पुरस्कार)
  ढॅण्टॅढॅण
  जीवनगौरव पुरस्कार - ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार
  पुढील स्लाईड्समध्ये पाहा, चित्र नाट्य गौरव सोहळ्याची खास क्षणचित्रे...

 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि कमलाकर सोनटक्के यांच्या उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत मांडताना महेश एलकुंचवार म्हणाले की, “नाट्यलेखन हा कधीच माझा व्यवसाय नव्हता म्हणून नाटक लिहिणं हा माझ्या जगण्याचा अग्रक्रम बनला नाही. मला जगत राहण्यात प्रचंड मजा येते आणि ही मजा अनुभवतच मी नाट्यलेखन करतो. कारण लेखकपणाची झूल अंगावर पांघरली की जगणं बंद होतं मग आपण केवळ अनुभव  ‘शोधत’राहतो त्यात तांत्रिकपणा येतो आणि आपण अनुभव ‘घेणं’ विसरून जातो. अनुभवाचे एकेक झाड शोधण्याच्या नादात आपलं अरण्य हरवून जातं आणि ते अरण्य हरवण्याची मला जास्त भीती वाटते कारण एकदा का आपल्या जगण्यातलं नैसर्गिकपण हरवलं तर आपल्यातील सर्जकाची अखेर होते.” 
 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  अभिनेत्री स्पृहा जोशीला बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला. 
 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
   'ढॅण्टॅढॅण'ने सात पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. पुरस्कारासोबत भरत जाधव आणि ओमकार दत्त
 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाची टीम पुरस्कार स्वीकारताना... 
   
  सर्वोत्कृष्ट लेखक
  मिहिर राजदा - गोष्ट तशी गमतीची
   
  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
  लीना भागवत - गोष्ट तशी गमतीची
   
  सर्वोत्कृष्ट अभिनेता
  मंगेश कदम - गोष्ट तशी गमतीची

  सर्वोत्कृष्ट नाटक
  गोष्ट तशी गमतीची - सोनल प्रॉडक्शन 
 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘महाराष्टाची लोकधारा’, ‘आंधळं दळतंय’ यातील प्रहसनं आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’गीत सादर करून शाहीर साबळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  सादरीकरण करताना केदार शिंदे आणि अन्य. 
 • Zee Natya Gaurav Award 2015 Held in Mumbai
  ‘संगीत सौभद्र’, ‘वा-यावरची वरात’, ‘वाडा चिरेबंदी’ पासून ते आजच्या ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ पर्यंतच्या नाट्यकृतींना स्पर्श करत या सोहळ्याची उत्तरोत्तर रंगत वाढत गेली. यावर कळस चढवला तो ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने. पं. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजाने आणि अभिनयाने अजरामर झालेल्या या नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ आणि ‘सूरत पियाकी’या गाण्यांची जुगलबंदी रंगली ख्यातनाम गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांच्यात.या दोघांच्या गायकीने रसिक भारावून गेले.

Trending