आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉरबर-पूरना जगनाथन : अहिल्या ते ‘निर्भया’पर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक दशकांपूर्वी एक कविता वाचली होती. दोन शेजारी मित्र आपापल्या घरातील खिडकीजवळ बसून दारू प्यायचे. एके दिवशी एका मित्राने दारूचा प्याला भरला. मात्र, पिला नाही. कारण ज्या दिवशी कोणत्याच वृत्तपत्रात बलात्कारची बातमी आलेली नसेल, त्याच दिवशी दारू पिणार, असा निर्धार त्याने केला होता. जणू काही ज्या दिवशी एकही बलात्कार झालेला नाही, तो दिवस त्याला मोठय़ा थाटात दारू पिण्याची परवानगी देणार आहे. अनेक वर्षे तो दररोज दारूने भरलेला ग्लास पाहत होता, पण पीत नव्हता. एके दिवशी तो शेजार्‍याला म्हणाला की, आज कुठेच महिलेवरील अत्याचाराची बातमी दिसत नाही. चीअर्स म्हणत त्याने तोंडापर्यंत ग्लास आणताच त्याचा मित्र ओरडला. म्हणाला की, अरे तुझ्या मुलीचे अपहरण होत आहे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिला उचलून नेत आहेत. हे ऐकताच तो व त्याचा मित्र दोघेही धावत गेले आणि गुंडांच्या वाहनाकडे पाहतच राहिले.
18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबईच्या एनसीपीए टाटा थिअटरमध्ये लेखिका-दिग्दर्शक फॉरबर आणि निर्माती-अभिनेत्री पूरना जगनाथन यांचे ‘निर्भया’ हे नाटक मनमोहन शेट्टी यांच्या अँडलॅब्सच्या सौजन्याने पाहण्याची संधी मिळाली. यासोबतच रात्रीचे जागरणही झाले. मी ग्लास तर भरला होता, पण पिला नाही. कारण आतापर्यंत 16 डिसेंबर 2012 च्या काळ्या रात्री राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या बलात्काराच्या बाबतीत प्रसारमाध्यमांनी केलेले विपुल लिखाण वाचले होते. यामुळे तिच्या वेदनांची जाणीवही झाली होती. मात्र, फॉरबरआणि पूरना यांच्या सादरीकरणात पहिल्यांदाच असे वाटले की, मी या क्रूर घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असून सर्वकाही माझ्या डोळ्यांदेखत घडले आहे. तसेच मी केवळ भरलेल्या ग्लासकडे पाहत महानगरातील संवेदनहीनतेने ग्रस्त झालेली एक ढोंगी व्यक्ती आहे. मी आतापर्यंत दु:खी होण्याचा अभिनय करत आलो आणि आज पहिल्यांदा निर्भयाची किंकाळी माझ्या कानात घुमत आहे. निर्भयावर झालेला अत्याचार टाटा थिअटरमध्ये उपस्थित असलेल्या हजार लोकांनी पहिल्यांदा एवढय़ा उग्रतेने अनुभवला. त्यामुळे नाट्यविद्येला सलाम.
17 मार्च रोजी निर्भया नाटकाचा एक शो दक्षिण मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांनी आयोजित केला होता. त्यांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेसोबत एक संक्षिप्त अर्थपूर्ण पत्रही पाठवले. त्यामध्ये सुरक्षेचा अभाव, सरकारच्या उणिवा आणि कायद्यातील पळवाटांसह हेदेखील लिहिले होते की, भारतीय जनमानसात अनेक शतकांपासून असलेला लिंगभेद नष्ट करणे हा सुरक्षेचा पहिला परिणामकारक उपाय आहे. स्त्री-पुरुष असमानतेची पाळेमुळे आपल्या समाजात खूप खोलवर रुजलेली आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1956 मध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करत मुलीला वडिलांच्या संपत्तीचा बरोबरीचा वारसदार बनवले. कदाचित तेव्हापासूनच रूढी-परंपरावादी लोक नेहरूंच्या विरोधात गेले असावेत. तसेच आर्थिक उदारीकरणाच्या सुरुवातीपासूनच नेहरूंच्या विरोधाचे एक घातक षड्यंत्र रचण्यात आले असावे. जे आजदेखील वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होत आहे. आधुनिकतेबाबत असलेल्या त्यांच्या आग्रहाची रूढीवादी लोक आजही निंदा करत आहेत. हे नाटक आपल्याला शोएब मन्सूर यांच्या ‘बोल’ या चित्रपटाची आठवण करून देते.
या नाटकात अन्यायाच्या विरोधात गप्प बसणार्‍यांची निर्भर्त्सना करण्यात आली आहे. शांतता भंग करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. बलात्काराच्या जेवढय़ा घटनांची पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असते, त्यापेक्षा शंभर पटींनी जास्त घटना केवळ गप्प राहिल्यामुळे समोर येत नाहीत. अत्याचार झालेल्या मुलीचे कुटुंबच घडलेल्या प्रकाराची वाच्यता न करण्याचा सल्ला मुलीला देतात. बालपणातील लैंगिक शोषणाच्या या घटना अशा प्रकारेच दडपल्या जातात. जसे आपण इम्तियाज अलीच्या ‘हायवे’मध्ये पाहिले आहे. मात्र, या नाटकात हे दु:ख सहन करणार्‍या मुलीचे वारंवार आपले शरीर स्वच्छ करणे आणि दंशाप्रमाणे असलेल्या त्या अभद्र स्पर्शातून मुक्ती मिळवण्याचे निराशजनक प्रयत्न आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणतात. वस्तुत: हे स्पर्श त्वचेच्या काठापल्याड जाऊन आत्म्यात बसतात आणि आयुष्यभर व्यक्ती हे ओझे घेऊन फिरत असते. विवाहित पती आपल्या अनिच्छुक पत्नीसोबत कायदेशीररीत्या जे करतात त्या वैध आणि ‘संस्कार संमत’ बलात्काराचा उल्लेखही या नाटकात करण्यात आला आहे.
या नाटकात एका पाकिस्तानी मुलीची व्यथा मांडण्यात आली असून एका भारतीय महिलेवर शिकागोमध्ये झालेल्या बलात्काराची कथाही आहे. तसेच एका पत्नीला हुंड्यासाठी जाळण्याची आणि ती यातून बचावल्यानंतर तिच्या मुलाला बळजबरीने हिसकावून घेण्याची हृदयद्रावक कथादेखील आहे. रुग्णालयातील 50 टक्के जळालेल्या चेहर्‍यावर निरागस मुलगा बोटे फिरवत असल्याचे चित्रणही संवेदनांसह सादर करण्यात आले आहे. 50 टक्के भाजलेली महिला रस्त्यावरून जाणार्‍या प्रत्येक तरुणामध्ये आपल्या मुलाचा शोध घेत आहे. नाटकात सादर केलेल्या सर्व घटना खर्‍या आयुष्यातील असून शेवटी सर्व पात्रे यथार्थ व्यक्तीचे पूर्ण नाव घेतात. फॉरबर यांनी विलक्षण प्रायोगिक सादरीकरण केले आहे. मंचावर सहा स्त्रिया आणि एक पुरुष विविध भूमिका करतात. ते रस्त्यावरील गर्दीपासून ते बस आणि ट्रेनमधील कक्षापर्यंतचे अनुभव सादर करतात. मंचावर फक्त दोन ठिकाणी एकूण पाच खिडक्या लावलेल्या आहेत. या खिडक्या हलण्याचा आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून चालत्या बस आणि ट्रेनचा प्रभाव निर्माण केला आहे. यातील सर्व कलावंत प्रतिभावंत आहेत. नाटकात जागोजागी दुर्गा स्तुती योग्य उच्चारासह म्हटली आहे. नाटकाच्या शेवटी निर्भयाच्या प्रेतयात्रेचे दृश्य अत्यंत प्रभावी असून प्रेतयात्रेत तुम्ही सहभागी झाल्याचा आभास होतो. फॉरबर आणि पूरना जगनाथन यांना भारतरत्न दिले पाहिजे.