आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या दृष्टीने शाहरुख आणि आमिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ग्राफिक्स फोटो - सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान)
सूर्य देवता मी तुम्हाला नमन करतो आणि मी दररोज चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन, असे वचन देतो. सकाळी सूर्य प्रार्थनेचा प्रारंभ अशा प्रकारे होतो. आपण खरोखरच चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करत नाही. एक यशस्वी आणि लोकप्रिय नेता, अभिनेत्याकडून अशा प्रकारची अपेक्षाही करत नाही. कारण त्याच्या आवरणाच्या आत उजेड जाण्याची शक्यता कमी असते. नुकत्याच सलमान खानने दिलेल्या मुलाखतीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचा स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दलचे विचार हे संकेत आहेत की, तो चांगला माणूस बनण्याच्या प्रक्रियेत गांभीर्याने गुंतला आहे. आपल्या उद्योगाप्रती त्याची निष्ठा आणि जनतेच्या वेदनांप्रती असलेली त्याची संवेदनशीलता नेहमीच पाहायला मिळते. तसेच तो कमी-अधिक प्रमाणात आधुनिक हातीमताई प्रमाणे वागत आला आहे.
हातीमताईचा किस्सा अशा प्रकारे सुरू होतो. जन्माच्या वेळी त्याने दूध पिले नाही. त्यामुळे एका सूफीने बादशहाला सल्ला दिला की, जोपर्यंत तुम्ही तुमच्या संस्थानातील सर्व मुलांसाठी दूध उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत हातीमताई दूध पिणार नाही. झालेही तसेच. याच हातीमच्या बाबतीत नंतर सांगण्यात आले की, त्याने निष्काम कर्म केले आहेत. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या उद्धाराची त्याला गरज नव्हती. जणू काही, कर्म करा आणि फळाची चिंता करू नका. सर्व वेगवेगळे धार्मिक उपदेश एका ठिकाणी पोहोचून एकजीव होतात, परंतु उपदेशांचा व्यवसाय करणारे त्यांना एकमेकांचे विरोधक ठरवत आपली दुकानदारी चालवतात.
सलमान खान म्हणाला की, 'काही चापलूस लोक माझ्याकडे येऊन शाहरुख खानबद्दल वाईट बोलतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की, तुम्ही शाहरुख खानकडे जाऊन त्याला मूर्ख बनवू शकत नाही आणि मला मूर्ख बनवून माझ्याकडे आपला मूर्खपणा सिद्ध करण्यासाठी येता.' शाहरुख खानने अत्यंत चातुर्याने आणि मेहनतीने आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित केले आहे. सलमान खान अनेकदा माहीत असतानाही फसवल्या गेला आहे. कारण त्याचे विचार सर्वांपेक्षा वेगळे आहेत. तसेच कोण कुठपर्यंत त्याचे शोषण करतो, हे त्याला पाहायचे आहे. त्याचा आणि शाहरुखचा दृष्टिकोन वेगवेगळा असून काम करण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. हे सलमानला माहीत आहे, पण शाहरुख आपल्या ठिकाणी शंभर टक्के योग्य आहे. सलमान खानने आयुष्याच्या नदीत आपल्या एका लाटेचा शोध घेतला आहे आणि तो त्यासोबतच वाहत आहे. एखाद्याला काहीतरी सिद्ध करून दाखवायचे आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास जिंकायचा आहे, असे त्याच्या मनात कधीच येत नाही.
सलमानने हेसुद्धा स्पष्ट केले आहे की, शाहरुखने खूप संघर्ष केला आहे. आपल्या आई-वडिलांनाही गमावले आहे. म्हणून त्याच्या जीवनाचा दृष्टिकोन त्याच्या अनुभवाने तयार झाला आहे. दुसरीकडे सलमान खानला संघर्ष करण्याची गरज पडली नाही. तसेच त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण नेहमीच त्याची ताकद राहिले आहेत. तो समृद्ध आणि यशस्वी कुटुंबातील मुलगा आहे. तो कधीच आपल्या आई-वडिलांसमोर रडला नाही, परंतु जेव्हा तो एकटा रडला तेव्हा का कुणास ठाऊक त्याने गुप्तपणे एकांतात गाळलेल्या अश्रूंचा ओलावा त्याच्या आई-वडिलांनी अनुभवला आहे. कुटुंबात अदृश्य सेतू असतात. निदा फाजली यांच्या ओळी आहेत, 'मैं रोया परदेश में भीगा मां का प्यार, दिल ने दिल से बात की बिन चिठ्ठी बिन तार.' आमिर खानबाबत सलमानने सांगितले की, दोघांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात 'अंदाज अपना अपना'मध्ये आमिरची दोन एकल दृश्ये खूप चांगली चित्रित झाली होती, परंतु संपादनाच्या टेबलावर ही दृश्ये त्याने हा विचार करून कापली की, या दृश्यांमुळेच त्याची भूमिका सलमानपेक्षा चांगली होत आहे. सलमानचे म्हणणे आहे की, जर तुम्ही मनातून बोललात तर आमिर मनातून उत्तर देतो आणि जर तुम्ही तुमच्या बुद्धीने त्याला भेटाल तर तो बुद्धीनेच वागेल. सलमान खानसोबत त्याचे मनाचे नाते आहे.
अशाच प्रकारे अक्षयच्या बाबतीत सलमानचे म्हणणे आहे की, तो एका वर्षात अनेक दिग्दर्शकांसोबत काम करतो. तसेच या रोटेशनमुळे अनेक तंत्रज्ञांना काम मिळते. सलमानचे हे नवे रूप समोर आले आहे. हा 'किक'च्या प्रचाराचा किस्सा नाही. तो आधीपासूनच मनमौजी आहे, पण आता या खेळकर वृत्तीसोबत इतरांचा दृष्टिकोन समाविष्ट करून घेण्याचे सार्मथ्य त्याच्यात आले आहे. माणूस सातत्याने बदलतो आणि इतर लोकांच्या बदलासह सामंजस्य आवश्यक आहे. एवढे सर्व उघड झाल्यानंतरही सलमान खान एक कोडे बनून राहतो. कारण कोणत्याही साधूला हे विचारता येऊ शकत नाही की, तो कोणत्या धर्मशाळेत किती वेळ घालवणार आहे.