आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोखो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत कसंबसं आयुष्य घालवणा-या श्रीरंग देशमुख (भरत जाधव) नावाच्या साध्या स्वभावाच्या एका सरळमार्गी शिक्षकाची ही गोष्ट आहे. या शिक्षकाच्या मितभाषी स्वभावाचा सगळेजण गैरफायदा घेत असतात. हा शिक्षक चाकोरीबद्ध आयुष्याला कंटाळलेला असतानाच त्याच्या बदलीची बातमी त्याला कळते आणि तो मनोमन सुखावतो कारण त्याची बदली चक्क त्याच्या स्वतःच्याच गावी म्हणजे बडवेबुद्रुक येथे झालेली असते.

आपले पूर्वज जिथे नांदले होते, त्याच जुन्या वाड्यात जाऊन रहावे आणि उर्वरित आयुष्य शांतपणे घालवावे, असे तो ठरवतो. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. एक बिल्डर त्या गावात येतो आणि बडवेबुद्रुकमध्ये रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली लोकांच्या प्रॉपर्टीज हस्तगत करायला सुरुवात करतो. या कामात बिल्डरबरोबर पक्याभाय नावाचा एक गावगुंड त्याच्या मदतीला असतो. त्यांना हवा असतो तो देशमुखांचा हा वाजा. पक्याभायच्या धमकीमुळे श्रीरंग वाडा सोडून जायला तयार होतो. सामान आवरताना श्रीरंगला एक जुनेपुराणे हस्तलिखित सापडते. त्याच्याच एका पूर्वजाने लिहिलेला घराण्याचा इतिहास असतो. तसेच सात पराक्रमी पूर्वजांची माहितीही त्यात असते. श्रीरंग ते वाचायला घेतो आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्यातूनच एक धमाल खेळ सुरु होतो. त्याचे नाव आहे खोखो.

या सिनेमाद्वारे केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केदार शिंदे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, विजय चव्हाण, रेशम टिपणीस, उदय टिकेकर, कमलाकर सातपुते यांच्यासह प्राजक्ता माळी, वरद चव्हाण, वरुण उपाध्ये, राजा बापट, यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.

या सिनेमाबद्दल आणखी सांगायचे म्हणजे या सिनेमासाठी एक खास प्रोमोशनल साँग तयार करण्यात आले असून वैशाली सामंतचे संगीत आणि उषा उत्थुप यांचा आवाज हे त्याचे वैशिष्ट्य आहे. येत्या 31 मे रोजी बॉक्स ऑफिसवर हा खोखोचा धमाल खेळ प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.