आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या अंदाजातील \'पिंजरा\' पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेलापिंजरा १८ मार्चला राज्यभरातील सिनेमागृहात दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे.
वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार विचार करावा लागतो. या चित्रपटाच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया ही सोपी नव्हती. पुरुषोत्त्म लढ्ढा आणि सौ चंद्रसेना पाटील यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रोडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेत प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करत तिचे २ के स्कॅनिंग करत नवी अद्यावत प्रिंट तयार केली. हॅंड क्लिनिंग,अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, ऑडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, ऑडिओ रीस्ट्रोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे.
पिंजरा चित्रपटातील आली ठुमकत नार लचकत, छबीदार छबी, तुम्हांवर केली मी मर्जी बहाल, मला इष्काची इंगळी डसली, दिसला ग बाई दिसला, कशी नशिबानं थट्टा, दे रे कान्हा चोळीलुगडी या गीतांच गारुड आजही तितकंच आहे. खेबुडकरांचे विलक्षण आशयपूर्ण शब्द आणि रामभाऊंच्या अस्सल मराठमोळ्या ठसक्याच्या चालींना आधुनिक पार्श्वसंगीताची किनार देत संगीतकार अविनाश–विश्वजीत यांनी अद्यावत वाद्यवृंदासह या गाण्यांना नवा मुलामा दिला आहे.
संवाद, गाणी, पार्श्वसंगीत, तांत्रिकबाबी या महत्त्वपूर्ण गोष्टींचे विभाजन करत त्यात काही बदल करण्यात आला आहे. चित्रपटाचा मूळ मोनो ऑडियो हा आता ५.१ करण्यात आला आहे. एकंदरीतच मूळ कलाकृतीला धक्का न लावता नव्या अंदाजातील पिंजरा पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...