आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: आशय विषय चांगला, अवास्तव स्टंटबाजीत अडकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट   कमांडो 2 
रेटींग 
2 स्टार
कलाकार   विद्युत जामवाल, इशा गुप्ता, अदा शर्मा, फ्रेडी दारूवाला  
दिग्दर्शक देवेन भोजानी 
श्रेणी अॅक्शन-ड्रामा 

देशभक्तीला वाहिलेल्या चित्रपटांची मध्यंतरी एक लाटच आली होती. दिग्दर्शक देवेन भोजानी यांचा ताजा 'कमांडो 2' हा चित्रपटही देशभक्तीला वाहिलेला. देशातील काळा पैसा आणि त्याभोवतीचे राजकारण असा सध्या चर्चेत असणारा विषय घेऊन दिग्दर्शकाने निम्मी बाजी मारली होती. आशय आणि विषय चांगला असताना केवळ स्टंटबाजीला अवास्तव महत्त्व दिल्याने मांडणीच्या युध्दात मात्र हा कमांडो बराच कमकुवत आहे. नवे कलाकार, चांगला विषय, त्यात धक्कातंत्राची उत्तम पेरणी असूनही हा कमांडो केवळ स्टंटबाजीत वाहून गेला आहे. ताडमाड उंचीचा धुष्टपुष्ठ देहयष्टीचा नायक सदानकदा हाणामारीत गुंतल्याने  बिचारा प्रेक्षक गुरफटून जाईल याचे भान दिग्दर्शक भोजानी यांनी ठेवायला हवे होते.
 
देशातील राजकारणी, उद्योजकांचा काळा पैसा, त्याची विदेशात सोय करणारा एजंट आणि त्याला भारतात आणण्यासाठी गेलेला भारतीय कमांडो या विषय सूत्राभोवती कमांडो गुंफलेला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर झालेली गोची असा ताजा संदर्भ, त्याला संगणकीय करामतींची जोड, पटकथेतील धक्का तंत्राची सोय, अद्ययावत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असा सारा मामला असताना, मांडणी मात्र जुन्याच वळणाची. या विरोधाभासामुळे कमांडो प्रेक्षकांची म्हणावी तशी पकड घेत नाही. विद्युत जामवाल या तगड्या नायकाचा पूरेपूर वापर करून घेण्यावर दिग्दर्शकाने भर दिल्याने सारे मुसळ केरात अशी स्थिती झाली आहे. 
 
ताज्या विषयावरील चित्रपट सादर करताना प्रत्येक संदर्भ तपासून, तलाखून सादर करावा लागतो. मात्र प्रेक्षक हा निर्बुध्द प्राणी असून जगात आपलाच नायक बुध्दीमान या सूत्राला प्रत्येक फ्रेमगणिक बळकटी मिळत जाते आणि कमांडोची पकड ढिली होत जाते. खरेतर काळा पैसा हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय, त्याला अनेक कंगोरे आहेत. तो वेगळ्या मांडणीसह आला असता तर कमांडो अधिक उंचीवर गेला असता. विषयाशी प्रामाणिक न राहता दिग्दर्शकाने व्यावसायिक तडजोडी केल्याचे जाणवते. चित्रपटातील पोलिस अधिकारी भावना रेड्डी हे अभिनेत्री अदा शर्मा हिने साकारलेले पात्र म्हणजे निव्वळ मेषपात्र. बालबोध, बालिश विनोदाने प्रेक्षकांचा मेंदू कुरतडणे हे एकमेव काम ही ललना लिलया पार पाडते. त्यातच जफर नावाचे सायबर सेल अधिकाऱ्याचे आणखी एक पात्र आपण चित्रपटात का घेतले असा प्रश्न दिग्दर्शकाला चित्रपट निमा संपल्यावर पडतो ? मग त्याला मारण्यात येते. असे अनेक कच्चे दुवे घेत आशय-विषयाला फाटा देत स्टंटबाजी करत कमांडो आपले मिशन पार पाडतो. आणि बिचारा प्रेक्षक एकदाचा त्याच्या कचाट्यातून सुटतो.
 
पुढे वाचा, काय आहे सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि बरंच काही...

  
   
 
बातम्या आणखी आहेत...