आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : अ पेईंग घोस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व.पू काळे यांनी मराठीत एवढं विपूल वाड्मय लिहून ठेवलंय, की त्याची अक्षरश: पारायण करणारी एक पिढी आहे. त्यांचं वाड्मय म्हणजे खरं तर ‘हनी ट्रप’ आहे. एकदा का त्यांच्या कथा तुम्ही वाचायला लागलात. की तुम्ही त्यात हरवून जाता. व.पूंचा जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोण आहे, हे त्यांची प्रत्येक कथा वाचताना जाणवते. त्यांची अशीच एक मस्त कथा, म्हणजे बदली. खरं तर भूत म्हणलं की त्याच्याशी निगडीत भावना असते, ती भीतीची. पण भूतावर प्रेम करावं, त्याचा आदर वाटावा, आणि त्याचा सहवास सुखावह व्हावा अशी भन्नाट कल्पना वपू करून जातात, आणि फक्कड कथा निर्माण होते. या कथेवर आधारित आहे, सुश्रुत भागवत यांचा ‘अ पेईंग घोस्ट’. वपुंच्या या मनोरंजक कथेचे संवाद लिहीलेत संजय मोने यांनी. त्यामुळे फिल्ममेकरने अर्धी लढाई तर तिथेच जिंकलीय.
त्यात उमेश कामत, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, शरवानी पिल्लई, सनवी नाईक, समृद्धी साळवी, मॄणाल जाधव, सिद्धी कोळेकर, खुशबू कुलकर्णी, अतुल परचुरे, अनिता दाते, समिर चौघुले, उमा सरदेशमुख, उमेश दामले, श्रीरंग देशमुख, कांचन पगारे, भूषण तेलंग, पौर्णिमा अहिरे, गिरीश जोशी, मंगेश दिवाणजी, अजय टिल्लू, सिद्धेश्वर झाडबुके आणि महेश मांजरेकर अशी चांगल्या अभिनेत्यांची मोठी फौज.
दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि जयंत लाडे या दोघांनाही असलेली टेलिव्हीजन सिरीयलची पार्श्वभूमी. थोडक्यात काय तर अनुभवी कलावंताची संपूर्ण टीम एकत्र आलीय म्हटल्यावर ‘पीजी’ विषयी खूप अपेक्षा वाढतात आणि या अपेक्षांची पूर्तता फिल्म पाहताना होते.
खरं तर, उमेश कामत, स्पृहा जोशी, शरवानी पिल्लई आणि पुष्कर श्रोत्री हे चित्रपटातले मुख्य कलाकार आहेत. पण यातली प्रत्येक भूमिका आपल्या लक्षात राहते. याचं क्रेडिट जेवढं कलावंतांच त्याहीपेक्षा जास्त लेखक-दिग्दर्शकाला द्यायला हवं. वपूंनी कथा लिहून अनेक वर्ष उलटली. पण ती कालातीत आहे. आणि ती तशी मोठ्या पडद्यावर दिसावी आणि नव्या पिढीला आवडावी याची खबरदारी संजय मोने आणि सुश्रुत भागवत यांनी घेतलेली दिसतेय.
अशा मनोरंजक चित्रपटांना संगीत देणं खरं तर तारेवरची कसरत असते. कारण मग एखाद रोमॅंटिक गाणं एकदम विषयांतर झाल्यासारखं वाटतं. पण नरेंद्र भिडे यांचं संगीत मुळ विषयाला धक्का न देता ओघाने येतं आणि या गाण्यांमध्ये प्रसाद भेंडें यांची सिनेमॅटोग्राफीने तर बहारच आणलीय.
थोडक्यात सांगायचं झालं तर, भूतांच मॅजिकल विश्व पाहायचं असेल, आणि मे महिन्याच्या सुट्यांचा शेवटचा विकेन्ड फॅमिलीसोबत मजेत घालवायचा असेल, तर या भूताने पछाडायला हरकत नसावी.