आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : ‘अगं बाई अरेच्चा 2’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा' चित्रपट झळकला आणि स्त्रियांच्या मनातल्या भावना जाणून घेतल्यावर गोंधळ उडालेल्या श्रीरंगची कथा सिल्व्हर स्क्रिनवर उलगडली. आता केदार शिंदे प्रेमातल्या स्पर्श भावनेची एक धमाल कथा आपल्या चित्रपटातनं घेऊन आलाय.
दिलीप प्रभावळकर यांची कथा आणि खास केदार शिंदे स्टाइलमधले डायलॉग त्यामुळे चित्रपट मनोरंजक झालाय.
‘अगं बाई अरेच्चा 2’ची हिरो किंवा सबकुछ खरं तर सोनाली कुलकर्णी आहे. सोनालीने साकारलेल्या शुभांगी कुडाळकर विषयी आपल्याला चित्रपटाचा प्रोमो पाहून उत्सुकता वाटतेच. पण चित्रपट पाहताना आपल्याला चार वेगवेगळ्या अभिनेत्री या भूमिकेत दिसतात. बालवयातली शुभांगी, पौंगडावस्थेतली शुभांगी, तरूण शुभांगी आणि तिशी ओलांडलेली शुभांगी. आनंदी, दु:खी, गोंधळलेली शुभांगी जेवढी सोनाली कुलकर्णीने सशक्तपणे साकारलीय. तेवढ्याच सहजतेने गौरवी आणि ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री सुरभी हांडेनेही शुभांगीच्या भूमिकेला न्याय दिलाय.
सोनालीसाठी तर जणू ही भूमिका ‘टेलर मेड’ भूमिका आहे. जे महत्व प्रियांका चोप्राच्या करियरमध्ये ‘मेरी कॉम’साठी, कंगना रनोटच्या करियरमध्ये ‘क्वीन’साठी, श्रीदेवीच्या करीयरमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’साठी आणि दीपिका पदुकोणच्या करियरमध्ये ‘पिकू’चं आहे, तसंच सोनाली कुलकर्णीच्या करीयरमध्ये ‘अगं बाई अरेच्चा 2’ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
शुभांगीचं मनोविश्व उलगडताना तिच्या आयुष्यातले पुरूष जसजसे तिला भेटत जातात तसतशी चित्रपटाची कथा पूढे सरकत जाते. यामध्ये प्रसाद ओक आणि भरत जाधव यांचा ट्रॅक खूपच मनोरंजक आहे. केदार शिंदेच्या सिनेमात भरत जाधवचा अभिनय नेहमीच जास्त फुलतो आणि तोच अनुभव पुन्हा एकदा हा सिनेमा देतो.
यातलं संगीतही श्रवणीय आहे. ‘एक पोरगी’ गाणं तर झकास आहे आणि सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर लोकप्रिय होतंय. केदार शिंदे, दिलीप प्रभावळकर, आणि ओमकार मंगेश दत्त यांनी लिहीलेले डायलॉग तर चित्रपटाची जानच आहे. एकुणच पूर्ण परिवारसह पाहू शकता येणारा एक चांगला चित्रपट 'अगं बाई अरेच्चा 2' आहे, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही