आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review@ तनू वेड्स मनू रिटर्न्स: भूमिका फिट, कथा सुपरहिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकहाती चित्रपट खेचून नेणाऱ्या नायिकांमध्ये विद्या बालन, प्रियंका चोप्रा, दीपिका पडूकोण यांच्यासोबतच कंगना रनोटच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तनु वेडस मनु चित्रपट ४ वर्षांपुर्वी येऊन गेला. त्याचा सिक्वल तनु वेडस मनु रिटर्न चित्रपट आज प्रदर्शित झाला. कंगनाने एकहाती चित्रपट खेचून नेताना प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे.
दोन भूमिका निभावून नेताना कंगणाने अतिशय अलगदपणे एका भूमिकेतून दुसरीत जाण्याचे कौशल्य दाखवले. चित्रपटाच्या सर्वच व्यक्तीरेखा अचूक आहेत, तर कथा प्रेक्षकांना बांधून ठेवणारी आहे. लेखक हिंमांशु शर्मा यांने कथानकाची मांडणी करताना त्यातील मनोरंजन आणि विनोद सुरेख गुंफले आहेत. हरियाणवी टॉम बॉइश दत्तो आणि तनु अशा दोन टोकाच्या भूमिका कंगणाने सहजतेने निभावल्या आहेत. संवादफेक, देहबोली, अभिनय अशा विविध अंगाने ती प्रगल्भ झाली असल्याचा परिचय देताना प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे श्रेय कंगणाला देता येईल.
कथा :
चार वर्षे लंडनमध्ये सुखी संसार केल्यानंतर तनु आणि मनु घटस्फोट घेण्याच्या निर्णयाला येतात. यासाठी दोघेही वेगवेगळे भारतात परतात. परत येताच तनु आपल्या जुन्या आयुष्यात परतते. तर मनु येताच त्याची गाठ हरियाणवी खेळाडू दत्तो सोबत पडते. मनु पहिल्याच नजरेत तिच्यावर भाळतो. दिलखुलास दत्तो पाहताच तिच्या बिंधास्त व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात मनु वेडा होतो. दत्तो सोबत संसार थाटण्याचे स्वप्न पाहू लागतो. इकडे तनु आपल्या जुन्या आयुष्यात आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते. पण दत्तो चे मनुशी लग्न होते का? तनु आणि मनुचा विचार बदलतो का ही गंमत चित्रपटातच पाहणे योग्य आहे.

दिग्दर्शन :
दिग्दर्शक आनंद राय यांनी कंगणाच्या दोन्ही व्यक्तिरेखांवर प्रभावीपणे काम केलेले जाणवते. चित्रपटाची कथेत आणि पटकथेत कमकुवत दुवा राहू नये याची त्यांनी काळजी घेतली आहे. कथेच्या मागणीनुसार योग्य ठिकाणीच व्यक्तिरेखा पेरल्या आहेत. चित्रपटाचे संवाद आणि उत्तर भारतीय लहेजा प्रेक्षकांना आनंददायी अनुभव देतो. संवादातील सौंदर्य चित्रपटाच्या कथानकाला आणखी रंग भरतो.
अभिनय :
कंगणा रनोटचा अभिनय सशक्त झाला आहे. अभिनयासोबतच तिने दोन्ही व्यक्तिरेखांच्या देहबोलीवर पकड मिळवली असल्याचे स्पष्ट दिसते. आर.माधवन, जिम्मी शेरगील यांच्या भूमिका सहाय्यक आहेत. दोघांनीही आपल्या व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे. आर माधवनही चित्रपटात पती आणि प्रियकराच्या दुहेरी भूमिकेत आहे, त्याच्या दोन्ही बाजू अचूकपणे साकारल्या आहेत. हरयाणवी दत्तो ची भूमिका लक्षवेधी आहे. दिपक डोब्रियाल, एजाज खान आणि स्वरा भास्करच्या भूमिका चांगल्या झाल्या.

संगीत :
चित्रपटातील गाणी प्रदर्शनापुर्वीच प्रेक्षकांच्या ओठी आहेत. तनु वेडस मनु प्रमाणेच या भागाचे संगीत आणि गाणी उत्तम झाली आहेत. कथानकाला पुरक गाणी जोश भरणारी आहेत.

वैशिष्ट्य
क्विन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगणा त्या पुरस्काराची खरी मानकरी आहे हे तिने या दुहेरी भूमिकांतून सिद्ध करुन दिले. सुरुवातीच्या काळात आपल्या भाषाशैलीमुळे प्रत्येक ठिकाणी हास्याचे कारण ठरणारी कंगणा आतामात्र कुणालाही बोलू देणार नाही हे नक्की.