आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा वसूल...'एक था टायगर'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खानचा कोणताही सिनेमा असो त्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात हे चित्रपट निर्मात्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय सलमानने एखादा सिनेमा साईन केला म्हणजे सिनेमाचे अर्धे प्रमोशन झाले, हे देखील निर्माते जाणून आहेत. म्हणूनच सलमानला आपल्या चित्रपटात साईन करायला निर्माते उत्सुक असतात.
प्रेक्षक सलमानच्या प्रत्येक अदावर फिदा आहेत. शिवाय या चित्रपटाची गोडी वाढवण्यासाठी सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोबतीला आहेच. चित्रपट निर्मात्यांनी या दोघांच्या नात्याचा योग्य वापर चित्रपटात केलेला आहे. चित्रपटातील एका दृश्यात कतरिना सलमानला 'आजवर लग्न का केले नाही', असा प्रश्न विचारते. चित्रपटातील हे दृश्य प्रेक्षक एन्जॉय करताना दिसतात.
आता सल्लु मियाचा सिनेमा म्हणजे तो 'बॉडीगार्ड' किंवा 'रेडी' सारखाच असणार, असा काही प्रेक्षकांचा गोड गैरसमज 'काबूल एक्स्पेस' आणि 'न्यूयॉर्क' सिनेमाचे दिग्दर्शन करणा-या कबीर खान यांनी 'एक था टायगर'च्या माध्यमातून दूर केला आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' आणि 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटांची कथा लिहिणारे आदित्य चोप्रा यांनीच या सिनेमाचे कथानक लिहिले आहे. कट्टर शत्रू असलेले दोन देश आणि फुलणारे प्रेम याचे शानदार एकत्रीकरण रुपेरी पडद्यावर दाखविण्यात दिग्दर्शक कबीर खान यांना यश आले आहे.
चित्रपटाची नायिका अर्थातच कतरिना कैफ नेहमीप्रमाणे सुंदर दिसली आहे. हिरो तर अर्थातच हॅण्डसम आहे. डब्लिन, इस्ताम्बुल आणि हवाना या तीन देशात चित्रपटातील नायक नायिकेचे प्रेम बहरताना आपल्याला दिसते. चित्रपटाचे सगळेच लोकेशन्स मनमोहक आहेत. चित्रपटातील कतरिना आणि सलमानची केमिस्ट्री हिट ठरली आहे.
एका बाजूला असलेले प्रेम आणि दुसर्‍या बाजूला असलेले कर्तव्य यांचे शानदार एकत्रीकरण म्हणजे 'एक था टायगर' आहे. प्रेक्षक नाराज होणार नाहीत, खुर्ची सोडून जाणार नाहीत, याची काळजी निर्माता-दिग्दर्शकाने अगदी चांगल्या पद्धतीने घेतली आहे.
'एक था टायगर' या रोमॅण्टिक थ्रिलरमध्ये टायगर (सलमान) भारतीय गुप्तहेर खात्याची एजन्सी असलेल्या रॉसाठी सिक्रेट एजेंटचे काम करत असतो. गेल्या बारा वर्षात हा टायगर एकदाही सुटीवर गेलेला नाहीये. गोपी (रणवीर शौरी) त्याचा असिस्टंट आहे. गोपीचे नाव मिथून चक्रवर्तींच्या 'गन मास्टर जी 9' (सुरक्षा, वारदात)च्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आले आहे. या दोन्ही गुप्तहेरांना भारतीय मिसाईल शास्त्रज्ञानावर पाळत ठेवण्यासाठी डब्लिनला पाठवले जाते. भारतीय मिसाइलची महत्त्वपूर्ण माहिती हा वैज्ञानिक पाकिस्तानी संघटना असलेल्या आयएसआयला देणार असल्याचा संशय भारत सरकारला असतो. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी टायगर आणि त्याचा सहकारी गोपीला मिशनवर पाठविले जाते. हा शास्त्रत्र आता विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करतोय. प्रोफेसरची भूमिका रोशन सेठने साकारली आहे. खरे तर सलमानच्या चित्रपटात रोशन सेठला पाहून जरा आश्चर्यच वाटते.
या प्रोफेसरच्या घरी एक मुलगी दिसते. ही मुलगी म्हणजे जोया (कतरिना) आहे. ही मुलगी या प्रोफेसरची नातेवाईक आहे की विद्यार्थीनी हे सांगणे कठीण आहे. त्यानंतर हा वैज्ञानिक चित्रपटातून नाहीसा होतो आणि सलमानची व्यक्तिरेखा आकार घेते.
ज्या चित्रपटांचा गरजेपेक्षा जास्त प्रचार केला जातो, अशा चित्रपटांच्या प्रोमोजमध्ये त्यातील अधिकाधिक दृश्य आधीच दाखविले जातात. त्यामुळे मुळात चित्रपट बघताना हे दृश्य आपण यापूर्वीच पाहिले असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे त्याचा रोमांच थोडा कमी झालेला असला तरीदेखील या रोमांचित करणा-या अ‍ॅक्शन सीनचे श्रेय हे दिग्दर्शकाला मिळायलाच हवे. या चित्रपटात नायिकेलाही आपण उंच उंच इमारतींवरुन उड्या मारताना पाहू शकतो.
वैज्ञानिकाच्या पाळतीवर असलेला टायगर नकळत जोयावर प्रेम करू लागतो. नंतर जोयाचे देखील टायगरवर प्रेम जडते. परंतु सिनेमाचे कथानक जसजसे पुढे सरकते तसे हळूहळू चित्रपटातील रहस्य उलगडायला सुरुवात होते. जोया ही वैज्ञानिकाची केअर टेकर नसून तरी पाकिस्तानी आयएसआय संघटनेची सिक्रेट एजेंट आहे. हे कळल्यानंतर टायगरला थक्का बसतो. परंतु त्यांच्या प्रेमापुढे देशाने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्त्वाची असते आणि तो तिला प्राधान्य देतो. शेवटी सिनेमाचा शेवट गोड होतो.
'दुनिया के दो सौ मुल्कों की लड़कियों में से टायगर को केवल एक पाकिस्तानी लड़की से ही इश्क हुआ।' 'रॉ'चे चीफ (गिरीश कर्नाड) यांचा हा डायलॉग प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा आहे. 'रॉ'ची यंत्रणा, शिस्त रुपरी पडद्यावर हुबेहूब साकारली आहे.
परंतु शेवटी नायक आणि नायिका आपल्या देशाचा विश्वासघात करत नाहीत. शेवटी विजय प्रेमाचाच होतो हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही.
मी या चित्रपटाचे समीक्षण करत आहे, त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याचा अंदाज बांधणे माझ्यासाठी थोडे कठीणच आहे. सलमान खानचा 'एक था टायगर' हा सिनेमा निश्चितच 'पैसा वसूल' करणारा आहे. 'दबंग'च्या चुलबुल पांडेनंतर या अभिनेत्याने पुन्हा एकदा आपली व्यक्तिरेखा उत्कृष्टरित्या साकारली आहे.
(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)