आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Review Of Bollywood Actor Aamir Khan\'s PK

Movie Review: \'पीके\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट हे अंजन, मंजन व रंजनाचे माध्यम आहे यावरून विश्वास उडालेल्यांसाठी 'पीके' हा चोख पर्याय आहे. विनोदाच्या आडून समाज, धर्म, देवत्व, मानवता, भ्रष्टाचार, मानवी वृत्ती यावर केलेले उत्तम भाष्य 'पीके'मध्ये आहे. आशयसंपन्न पटकथेतला आमिर खानचा वावर तो परफेक्शनिस्ट का आहे याचे सकस उदाहरण आहे.
अनुष्का आणि अमीरची 'पीके' मधली केमिस्ट्री हसवता हसवता अंतर्मुख करणारी आहे. एका परग्रहावरील व्यक्तीच्या (एलियन) रुपकातून राजकुमार हिराणी व अभिजात जोशी यांनी पाहिलेला भारतीय समाज अत्यंत उच्चकोटीच्या अभिरुचीसंपन्न आशयातून 'पीके'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो. देवत्वाचे अवडंबर माजवून धर्माच्या नावाखाली चालवलेल्या फसवणुकीचा टराटरा बुरखा फाडणारा 'पीके' न पिताही नशा आणतो, समाजातल्या दांभिकतेचा हास्याच्या तुषारातून काढलेला पीके रुपी एक्स-रे आशय म्हणून पडद्यावरून आपल्या मनात उतरतो व साठून राहतो.
कथा :
परग्रहावरील एक एलियन (आमिर खान) राजस्थानात उतरतो. मग त्याची भेट इथल्या मानवाशी होते. त्याच्या गळ्यातील स्वगृही परत जाण्याचा रिमोट एकजण पळवतो. मग हा एलियन विक्षिप्त वागत भटकत असताना भैरोसिंह (संजय दत्त) त्याला आसरा देतो. मानवी भाषा शिकण्याचे कौशल्य या एलियनकडे असते. तो भोजपुरी शिकतो. मग भैरोसिंहला रिमोटबाबत सागंतो. भैरोसिंह त्याला दिल्लीत जाण्याचा सल्ला देतो. एलियन दिल्लीत दाखल होतो. त्याच्या वागण्यावरून त्याला 'पीके' हे नाव मिळते. जग्गू (अनुष्का शर्मा ) एका चॅनेलची रिपोटर असते, तिला पीके भेटतो. तिला पीके मध्ये ‘स्टोरी’ दिसते. दरम्यान रिमोट तपस्वी बाबाकडे (सौरभ शुक्ला) असल्याचे पीके तिला सांगतो. हा रिमोट परत मिळवून देण्याचे आश्वासन ती पीकेला देते. रिमोट पीकेला मिळतो का? पीके आपल्या ग्रहावर परत जातो का ? जग्गूला तिचे खेर प्रेम सर्फराज (सुशांत सिंह राजपूत) मिळते का ? हे पडद्यावर पाहणे जास्त योग्य.
पटकथा-संवाद :
राजकुमार हिराणी आणि अभिजात जोशी यांनी लिहिलेली पटकथा हा 'पीके'चा यूएसपी आहे. अत्यंत मुद्देसूद मांडणी, आशय-विषयानुरूप भाष्य करणारे प्रसंग, घटनांच्या एकामागून एक येणा-या फ्रेम्स, गोळीबंद रचना, व्यक्तीरेखांचा सखोल विस्तार व मुख्य म्हणजे विषयाची कोठेही अप्रामाणिक नसणारा आशय यामुळे 'पीके' पाहताना मिनटागणिक नवे काहीतरी समोर येत राहते व उत्तम रंजनात पीके शेवटी अंर्तमुख करतो. हॅटस ऑफ अभिजात अँड राजू. संवादही असेच समाजातील उणिवांवर मोजक्या शब्दांतून भाष्य करणारे, भोजपुरी तडका दिल्याने संवादांची लज्जत आणखी वाढली आहे.
गीत-संगीत :
विषयाला अनुरुप स्वानंद किरकिरे यांच्या लेखणीतून उतरलेली गाणी यात आहेत. अजय-अतुल, शंतनु मोइत्रा व अंकित तिवारी यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम, चार कदम ही आधीच लोकप्रिय झाली आहेत.
अभिनय :
पीकेला नेत्रसुखद बनवले आहे ते अर्थातच आमिर खानने. त्याचा एलियन अफलातून आहे. त्याचे वागणे, बोलणे, दिसणे, चालणे,पळणे, पापणी न लवता उघड्या डोळ्यांनी वावरणे व पान खाणे सारे काही आगळेवेगळे, तो आपल्यासारखा दिसत असूनही डिफरनशिएट असणारे. त्याने देहबोलीचे सांभाळलेले बेअरिंग तो खरेच परग्रहावरचा आहे हे ठसवणारी. केवळ आमिच हे करू शकतो. त्याला तेवढीच उत्तम साथ दिली आहे ती अनुष्का शर्माने. तिची आणि आमिरची केमेस्ट्री लाजवाब. बाकी सर्व पात्रे हिराणींच्या नियंत्रणामुळे उत्तम काम करतात.
सार :
तेच ते पाहून कंटाळेल्यांसाठी 'पीके' हे पंचपकवान्नाने भरलेले ताट आहे. आशयसंपन्न असूनही मनोरंजनाची कसर पूर्णपणे भरून काढणारी एक नितांतसुंदर अभिरुचीसंपन्न कलाकृतींच्या पंगतीत पीके स्थान पटकावणार यात शंका नाही. तर मग व्हॉटस अप व फेसबुकवर टाइमपास करण्यापेक्षा वेळात वेळ काढून 'पीके' लवकरात लवकर आवर्जून पाहावा हे काय आता वेगळे सांगावे लागणार का?