आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पितृऋण\' नात्याची वीण उलगडणारी सकस कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नितीश भारद्वाज दिग्दर्शित ‘पितृऋण’ चित्रपटातून 50 वर्षांपूर्वी गुंफण्यात आलेल्या घट्ट नात्याची वीण उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न करत प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती देण्यात आली. सचिन खेडेकर आणि तनुजा या दिग्गजांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. दोन सारख्या दिसणार्‍या माणसांच्या कहाणीचे जुळणारे धागेदोरे पुढे हळवे करतात. सकस कथेला उत्तम पटकथेची जोड लाभली आहे.
कथा : गाडी चालवताना एका सायकल चालवणार्‍या माणसाला व्यंकटेश कुलकर्णी (सचिन खेडेकर) या प्राध्यापकाची धडक लागते. पुढे पडलेल्या माणसाला उचलण्यासाठी त्याची मुलगी जाते. मात्र, पुढे पडलेला माणूस हुबेहूब आपल्या वडिलांसारखा दिसत असल्याचे ती सांगते. मग व्यंकटेश कुलकर्णीच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होते. या माणसाला भेटण्यासाठी ते गावात जातात. तेव्हा त्याची विधवा आई (भागीरथी) श्राद्धाची तयारी करत असते. विशेष म्हणजे त्या माणसाचे नावही व्यंकटेश कुलकर्णी. श्राद्धाच्या पूजेत त्याने सांगितलेले वडिलांचे नाव वगळता बाकी सगळी नावे सारखीच असल्याने प्राध्यापक अस्वस्थ होतात. त्यानंतर भागीरथी आपले पूर्वायुष्य प्राध्यापकासमोर मांडते. 50 वर्षांपूर्वी सेतू कुलकर्णीशी तिचा विवाह झालेला असतो आणि चारित्र्याच्या संशयावरून तो तिला सोडून गेलेला असतो. नंतर रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू होतो. या वेळी एका अंगठीचा उल्लेख ती सांगते. प्राध्यापक भागीरथीची कहाणी ऐकून प्रचंड अस्वस्थ होतो. पुण्यात परतल्यानंतर मरण पावलेल्या वडिलांच्या बँकेतील लॉकरचा ताबा घेण्यासाठी बँकेत गेल्यावर एक अंगठी त्याला सापडते. पुन्हा त्या आपल्यासारख्या दिसणार्‍या व्यक्तीशी याचा संबंध असल्याच्या विचारांनी तो अस्वस्थ होतो. स्वत:च्या आईशी बोलून काही धागेदोरे हाती लागतात का ते पाहतो. एका बाईचे जीवन उद्ध्वस्थ करणारी व्यक्ती आपला बाप असल्याचे त्याला सहन होत नाही. या घटनेचा काही धागादोरा हाती लागतो का म्हणून वडिलांचे मृत्युपत्र तो मिळवतो. तेव्हा पुण्यातील एक पत्ता सापडतो. तो सेतू कुलकर्णीचा असतो. या घरामध्ये लिहून ठेवलेल्या डायरीत भागीरथीचा उल्लेख आणि आपल्या आईच्या कटकारस्थानामुळे तिच्या उद्ध्वस्थ झालेल्या जीवनाबद्दल सेतू स्वत:ला आयुष्यभर दोषी मानतो. दहाव्याच्या वेळी पित्याला दिलेले वचन शेवटची इच्छा पूर्ण करीन असे होते. तेच प्राध्यापक पूर्ण करण्यात यशस्वी होतात का, ते पडद्यावर पाहणे जास्त रंजक.
अभिनय : तनुजा, सचिन खेडेकर, सुहास जोशी यांच्यासह नवतारका केतकी विलास यांचा अभिनय उत्तम झाला आहे. सर्व सहकलाकारांनीही आपल्या भूमिका उत्तमपणे निभावल्या आहेत.
संवाद : चित्रपटात कोकणी बाजाचे काही संवाद असले तरी इतर संवाद पुस्तकी असल्याचे अनेकदा जाणवते. त्यामुळे ते अतिशय नाटकी वाटतात.
संगीत : कौशिक इनामदार यांनी दिलेले संगीत चित्रपटाच्या कथेला साजेसे आहे. ‘दयाघना’ हे गाणे रूपकुमार यांच्याकडून गाऊन घेण्याचा त्यांचा निर्णय अचूक ठरला, तर ‘मंतरलेल्या चांदण राती’ हे गाणे कथा पुढे नेणारे असून उत्तम झाले आहे.
सार : कोकणातील गाव आणि पुण्यातील 50 वर्षांपूर्वीची सदाशिव पेठ यांचे चित्रण प्रेक्षणीय. स्त्रीमनाच्या प्रेम, प्रणय आणि विरक्त या भावना उत्कृष्टरीत्या मांडल्या आहेत. मात्र, चित्रपटातील काही प्रसंग अचानकच घुसडल्यासारखे आहेत. तनुजाच्या तरुणपणीची भूमिका नव्या अभिनेत्रीने उत्तमपणे निभावली आहे. केशवपनाचा धाडसी निर्णय घेत त्याला साजेसा अभिनय तनुजाने केला. मात्र, त्यांच्या हिंदी वाटणार्‍या मराठीमुळे संवाद तुटक वाटतात. श्रीरंग गोडबोलेंची गीते अर्थपूर्ण. चित्रपटातील भागीरथी-सेतूचा विवाह, त्यानंतरचे काही प्रसंग आणि भागीरथी आत्महत्येसाठी जाते तेव्हा तिला अडवणारा कोळी आणि त्याने केलेली मदत हे खटकते.