आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Reveiw: पुरानी जीन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच मित्र, कसौली गाव, एक मुलगी आणि जुन्या नातेसंबंधांत अतिशय अचूकपणे गुंफलेली ही कहाणी आहे. रति अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी याने या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यासोबतच आदित्य सिअल आणि इसाबेल लिटे या अभिनेत्रीनेही रूपेरी पडद्यावर पहिले पाऊल ठेवले आहे. इसाबेलला यापूर्वी अनेक जाहिरातींतून प्रेक्षकांनी पाहिले आहे, मात्र चित्रपटात ती भाव खाऊन जाते. दोघेही अभिनेते नवे आहेत, अभिनय उथळ आहे. सारिका आणि रति अग्निहोत्री या एक काळ गाजवलेल्या अभिनेत्रींचे बर्‍याच काळानंतरचे पडद्यावरील दर्शन प्रेक्षकांसाठी सुखद. दिग्दर्शिका तनुर्षीने टीनएर्जसचा विषय उत्तम मांडला आहे. मजा मस्ती, प्रेम, मैत्री आणि रहस्य यामुळे रंजकता वाढते. पहिला भाग काहीसा संथ असला तरी दुसर्‍या भागात चित्रपट कमालीचा वेग पकडतो. क्षणोक्षणी उत्कंठा वाढवतो आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.
कथा : सिद्धार्थ रे ऊर्फ सिध (तनुज), सॅम्युअल लॉरेन्स ऊर्फ सॅम (आदित्य सिअल), बलविंदर सिंग शेखावत ऊर्फ बॉबी (परम बिडवान), सुशील शर्मा ऊर्फ सुझी (राघव राज कक्कर) आणि तेजिंदरसिंग कटुरिया ऊर्फ टिनो (कश्यप कपूर) हे पाच जिवलग मित्र. कसौली गावात राहणारे. सॅम लॅँडलॉर्ड कुटुंबातला लंडनला शिकायला गेलेला मुलगा. सिध हा एका दिगवंत लष्करी अधिकार्‍याचा मुलगा आई मोनिका (रति अग्निहोत्री) सोबत राहत असतो. सॅम आणि सिध लहानपणापासूनचे मित्र. तर बॉबी, टिनो आणि सुझी नंतर भेटलेले पण घट्ट मित्र. सॅम लंडनहून परतला की धमाल मजा करणे ऐवढेच त्यांचे गणित. सिधने लंडनला जाऊन शिकावे असे त्याच्या आईचे स्वप्न असते. सॅमची आई शैरी (सारिका) हिला नवरा सोडून जातो, या दु:खात तिने स्वत:ला दारूच्या व्यसनात बुडवून घेतलेले असते. सॅमला आईचे प्रेम मिळत नाही, पण तो मित्रांमध्ये हे प्रेम शोधतो. अशातच नैनतारा ही मुलगी या सर्वांमध्ये येते. नैनतारा आणि सिधचे एकमेकांवर प्रेम जडते. सिध हे सॅमला सांगण्यापूर्वीच सॅमही नैनतारावर प्रेम करू लागतो. एक दिवस त्याला सिध आणि नैनताराबद्दल कळते आणि तो प्रचंड संतापतो. नंतर रागाच्या भरात गाडी दरीत कोसळून मरण पावतो. सॅमचा मृत्यू आपल्यामुळे झाला या दु:खात सिध कसौली सोडून जातो. त्याच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत, हे ओझे त्याच्या मनावर येते. प्रत्यक्षात सॅमच्या मृत्यूचे कारण निराळेच असते. हे रहस्य उलगडताना पडद्यावर पाहणे, अतिशय रंजक
आहे.
संवाद : संवाद अतिशय साजेसे आहे. कुठेही अतिशयोक्ती, कृत्रिमपणा जाणवत नाही. तरळ संवाद, भावभावनांना वाट करून देण्यासाठी साधेच पण मनाला भिडणारे आहेत.
अभिनय : कलावंतांची नवी फळी असल्याने त्यांच्याकडून अभिनय करून घेणे हे आव्हान दिग्दर्शिकेने लीलया पेलले आहे. तनुज विरवानीचा अभिनय ठोकळेबाज वाटतो. मात्र आदित्य सिअलचा अभिनय उत्तम झाला आहे. स्वप्न, मजा आयुष्याला जल्लोष करणारा तरुण त्याने उत्तमरीत्या वठवला. इसाबेल शोभेच्या बाहुलीप्रमाणे वावरली. तर सारिका आणि रति यांचा अभिनय वयाला साजेसा.
संगीत : राम संपत यांनी पुन्हा एकदा श्रवणीय संगीताचा साज पेश केला आहे. नुकत्याच आलेल्या भूतनाथ रिटर्न्‍समध्येही मनात रेंगाळणारी गाणी त्यांनी दिली तर पुरानी जीन्समध्येही संगीताची बाजू दमदार राहिली. 'दिल आज कल मेरी सुनता नही' हे गाणे धमाल झाले आहे. तरुणाईला भावणारे हे गाणे आहे.
सार : चित्रपटाचा विषय तरुण मनाला साद घालणारा आहे. तारुण्यात मैत्री आणि प्रेम या सर्वाधिक जवळच्या वाटणार्‍या नात्यांमध्ये भावनिकरीत्या सगळेच गुंफले जातात. तेच या चित्रपटात मांडण्यात आले आहे. उत्तम चित्रपटासाठी लागणार्‍या सर्व बाबी यामध्ये आहेत. उत्तम कथानक, मनात रुळणारी गाणी, नवे चेहरे, निसर्गरम्य चित्रीकरण, तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट अशा सर्व जमेच्या बाजू आहेत. विनोद, भावना, प्रेम, रहस्य यांचा योग्य समतोल असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावेल असा आहे. पुरानी जीन्स हे चित्रपटाचे शीर्षक शेवटच्या काही दृश्यांत प्रकट होते. सर्मपकही वाटते. तरुणाईने नक्की पाहावा असा चित्रपट.