आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : आंधळी कोशिंबीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रसिकांना निखळ मनोरंजन द्यायचे, पण जाता-जाता दोन पिढ्यांमधील बदलांचे अंतर अधोरेखित करून जाणारा खेळ म्हणजे 'आंधळी कोशिंबीर' हा चित्रपट. यातील विनोद फारसे हसवत नसले तरी ते पाचगळ नक्कीच नाहीत आणि ते उगीचच घुसवलेलेही वाटत नाही. दोन तास बसावे. एक गुंतलेला डाव कधी एकावर तर कधी दुसर्‍यावर येतो आणि काय धम्माल. तरुणाईला क्षणात भान आणणारा चित्रपट म्हणून 'आंधळी कोशिंबीर'कडे बघावं लागेल.

कथा : रंगा (अनिकेत विश्वासराव)चा बाप बापू सदावर्ते (अशोक सराफ) काटकसरी, संस्कारी असतो. रंग्या मात्र उडाणटप्पू. याच उडाणटप्पूपणामुळे तो आणि त्याचा मित्र वश्या (हेमंत ढोमे) यांच्यावर गोरक्ष (हृषीकेश जोशी) या गुंडाचं 13 लाख रुपयांचं कर्ज होतं, तर गोरक्षचा वकील दुश्यंत बारणे (आनंद इंगळे) हा त्याच्याकडे भाड्याच्या खोलीत राहणार्‍या शांताबाईंच्या (वंदना गुप्ते) प्रेमात असतो. शांताबाई मात्र त्याला भीक घालत नाहीत. रंग्याला गोरक्षचे 13 लाख रुपये फेडण्यासाठी तो त्यांचा बंगला गहाण ठेवण्याची आयडिया देतो; पण रंग्याचा बाप अर्थातच तयार होणार नसतो. रंग्या कागदपत्र चोरतो. ते वकील बारणेकडे जातात. पण, स्टॅम्पवर बापूंची सही महत्त्वाची असते. ती मिळविण्यासाठी रंगा आणि त्याचा मित्र बापूंना वेडं ठरवत ते शांताबाईंच्या नवर्‍यासारखे दिसतात असे सांगतात आणि शांताबाईंनाही वेडं ठरवत त्या बापूंच्या बायकोसारख्या दिसतात. भांडण करणे हा दोघांमधील समांतर दुवा असल्याने शांताबाई बापूंना भांडणात हरवू शकतील आणि सही मिळू शकेल असे वाटते. पण, बापू आणि शांताबाईच प्रेमात पडतात. दुसरीकडे शांताबाईंची मुलगी राधिका (मृण्मयी देशपांडे) वश्याच्या प्रेमात पडते तर रंग्या आणि गोरक्षची बहीण एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे शांताबाईंचं लग्न बारणेशी होतं की, बापूंशी होतं हे बघण्याची मजा प्रत्यक्ष चित्रपट बघतानाच येईल.
संवाद : साधे, सरळ बोलीभाषेतील वाक्येच आहेत. अलंकारिक शब्दांचा अजिबात मारा केलेला नाही. शिवाय विनोद निर्मितीसाठीही अगदी साधेच शब्द वापरले आहेत. त्यात कोणताही पाचगळपणा न आणल्याने ते संवाद चांगले वाटतात. चित्रपटाच्या शेवटी बापूंना जेव्हा घर गहाण असल्याचे कळते तेव्हा बापू आणि शांताबाईंचे संवाद तरुणाईच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत.
अभिनय : अर्थातच सगळेच कलाकार कसलेले असल्याने तसा अभिनयात चित्रपट चांगल्या पातळीवर आहे. अनिकेत विश्वासराव भाव खाऊन जातो. आनंद इंगळेंचा अभिनय काही ठिकाणी बायकी वाटतो, तर मृण्मयी देशपांडे फक्त बारणेला मामा म्हणण्यासाठी आणि हेमंत ढोमेला जोडी म्हणूनच घेतल्याचे दिसते. अल्लड आणि आईच्या अति लाडक्या मुलीचा अभिनय मात्र तिला चांगला जमला आहे. हृषीकेश जोशी आपल्यातील वेगळी छटा दाखविण्यात पुन्हा यशस्वी झाला आहे, तर पाहुणे कलाकार म्हणून असलेले र्शीकांत मोघेही लक्षात राहतात.
संगीत : चित्रपटाला नरेंद्र भिडे यांचे साजेसे असे संगीत आहे. गाणी फार काही ओठांवर रेंगाळणारी नसली तरी ती चित्रपट बघताना कंटाळा येत नाही. शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, वैशाली यांचा आवाज गाण्यांना साजेसा आहे. अशक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यावर चित्रीत झालेले गाणे सुंदर आहे. वैभव जोशींची गीतरचना उत्तम आहे.
सार : चांगले संस्कार करूनही केवळ मजामस्ती आणि पैशांसाठी पोटची मुलं घर गहाण ठेवण्यापर्यंत जातात. पण, दोन पिढय़ांमधील अंतर आपणच कमी करायचे असते, असा संदेश देत हा चित्रपट शेवटाकडे जाताना देतो.