आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: बँग बँग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चकाचकसेट, जगभरातील अप्रतिम लोकेशन्स, लक्झरी गाड्या, नयनरम्य सिमला, देखणा नायक सुंदर नायिका या सर्वांचा संगम सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ताज्या 'बँग बँग'मध्ये आहे. असे असूनही 'बँग बँग' काही मनाला म्हणावा तसा भावत नाही. सुपरफास्ट रेल्वे असे समजून आपल्या नशिबी पॅसेंजर यावी तसे काहीसे 'बँग बँग'च्या बाबतीत घडते. 'नाइट अँड डे' या हॉलिवूडपटाची ही हिदी आवृत्ती. तिकडे टॉम क्रूझ, तर इकडे हृतिक रोशन. हिंदीतला हा आजवरचा सर्वात महागडा चित्रपट मानला जातो. 'सफर', 'एक दुजे के लिए'सारख्या गाजलेल्या पटकथा लिहणाऱ्या इंदर राज आनंद यांचा सिद्धार्थ हा नातू, तर 'शहेनशहा'सारखे चित्रपट देणाऱ्या टिनू आनंद यांचा पुतण्या. 'बँग बँग'मध्ये पटकथेवर आणखी काम केले असते तर सुंदर थरारपट अनुभवास आला असता. पण...सर्व काही 'बँग बँग' म्हणजे हा गाजावाजा झालेला जोराचा झटका निव्वळ फुसका आहे.
कथा:
ओमरजफर (डॅनी) हा आंतरराष्ट्रीय अट्टल गुन्हेगार. अनेक देशविघातक कार्यात तो वाँटेड असतो. लंडनमध्ये कैदेत असताना वीरेन नंदा (जिमी शेरगिल) या जाँबाज भारतीय अधिकाऱ्याची हत्या करून तो पलायन करतो. मग कोहिनूर हिरा चोरीसाठी बक्षीस जाहीर करतो. राजवीर ऊर्फ जय नंदा (हृतिक रोशन) हा एक आंतरराष्ट्रीय चोर. तो काहिनूर चोरतो. हा कोहिनूर ओमरच्या हाती लागणार नाही याची काळजी घतो. दरम्यान, त्याची भेट हरिलनशी (कतरिना कैफ) होते. मग ओमरची माणसे दोघांच्या जिवावर उठतात. या काळात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. कालांतराने जय हा चोर नसून भारताच्या सिक्रेट मिशनचा अधिकारी असतो हे हरलिनला समजते. मग दोघे मिळून ओमरचे साम्राज्य उद्ध्वस्त करतात.
संगीत
विशाल-शेखर यांच्या संगीताने सजलेली गाणी यात आहेत. तू मेरी, मेहेरबान, बँग बँग आधीच तरुणाईत प्रिय झाली आहेत.
अभिनय
हृतिकचे देखणेपण, उंची, त्याची स्टाइल या भूमिकेला शोभेलशी आहे. त्याचा त्याने चांगला वापर केला आहे. कतरिना कैफला बराच वाव आहे. मात्र, आंग्लाळेले हिंदी चेहरा कोरा ठेवून ती वावरते. डॅनी, जावेद जाफरी, पवन मल्होत्रा नेहमीप्रमाणे ठीक.
कथा-संवाद
सुभाष नायर यांची कथा आहे, मात्र पटकथेवर काहीच मेहनत घेतल्याने गाडी बऱ्याच ठिकाणी अडखळली आहे. संवाद मात्र दमदार आहेत. विकास सिवारामन यांनी जगभरातील सिमल्यातील लोकेशन्स अप्रतिम टिपले आहेत.
सार
एवढा मोठा खर्च करून 'बँग बँग'सारखे चित्रपट बनवायला धाडस लागते. ते फॉक्स स्टार स्टुडिओने दाखवले आहे. मात्र, पंचपक्वान्नाने भरलेल्या थाळीत काही पदार्थांत मीठ टाकायचे विसरले तर काय होते, नेमके तेच 'बँग बँग' पाहिल्यावर होते. संथगती आणि लांबलेला क्लायमॅक्स वैताग आणतो. बाकी तुमची मर्जी.