आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवकुफियाँ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्तरीच्या दशकात मध्यमवर्गाला केंद्रित करणारे अनेक चित्रपट आले. ऋषीकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यातील क्षण रुपेरी पडद्यावर अजरामर केले. खूबसूरत, गोलमाल, चुपके चुपके आदी ऋषीदांच्या आणि बातों बातों मे, छोटी सी बात, रजनीगंधा आदी बासूजींचे चित्रपट आजही निखळ करमणुकीसाठी आवर्जून पाहिले जातात. यशराजचा ताजा बेवकुफियाँ हा चित्रपटही असाच निखळ करमणूक करणारा चित्रपट आहे. आजच्या तरुणाईची मानसिकता, जीवनशैली, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रेम याचे नितांत सुंदर चित्रण बेवकुफियाँमधून घडते. ही केवळ एक प्रेमकहाणी नसून आयुष्यातील प्रत्येक वळण, अडचणी, टप्पे-टोणपे यावर मात करायला शिकवणारा वेगळ्या बाजाचा कॅन्व्हास आहे. दिग्दर्शिका नूपुर अस्थानानेही त्याचा प्लॉट विनोदी अंगात ओवल्याने प्रेक्षकांच्या मेंदूला फारसा ताण न देता अनेक वळणांनी अखेरचा टप्पा गाठणारा आहे. प्रत्यक्ष जीवनात प्रत्येकाच्या तरुणपणी होणार्‍या प्रेमाला उजाळा देणारी ही कथा पडद्यावर ज्या पद्धतीने मांडली आहे, त्याने मूड प्रसन्न होतो.
कथा : ही कथा आहे मोहित चड्ढा (आयुष्यमान खुराणा) आणि मायेरा सहगल (सोनम कपूर) या एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्‍या तरुणांची. मोहित एका विमान वाहतूक कंपनीत कामाला आहे, तर मायेरा एका खासगी बँकेत मोठया हुद्दयावर आहे. या दोघांतील प्रेम आता विवाहाच्या टप्प्यावर आहे. मायेराचे वडील व्ही. के. सहगल (ऋषी कपूर) हे आयएएस दर्जाचे प्रामाणिक अधिकारी. अत्यंत कडक स्वभावाचे. मोहितने लग्नासाठी हात मागावा यासाठी मायेरा मोहितकडे आग्रह धरते. व्ही. के. सहगल साहजिकच या नात्याला नकार देतात. मात्र एकुलत्या एक मुलीच्या आग्रहाखातर मोहितची चाचणी घेण्याचे ठरवतात. आपला होणारा जावई किती लायकीचा आहे यासाठीची ही परीक्षा असते. दरम्यान, मोहितची नोकरी जाते. तो ही बाब सहगलपासून लपवून ठेवतो. मग सुरू होतो एक रंजक लपंडाव. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहते, मायेरा आणि मोहित ब्रेक अपच्या वळणावर असताना मोहित सहगलच्या चाचणीत उत्तीर्ण होतो. पुढे काय होते, मोहित-मायेराचे प्रेम सफल होते का, हे पडद्यावर पाहणे अधिक रंजक
संवाद- पटकथा : कथा हबीब फैसल यांची आहे. कथा सामान्य असली तरी तिची मांडणी उत्तम झाली आहे. विनोदी अंगाने खुलणारे अनेक प्रसंग प्रेक्षकांना बोअर करत नाहीत. संवाद चटपटीत आणि खुसखुशीत आहेत. स्क्वॅश खेळणे, नोकरी जाणे, अंगठी खरेदी अशा अनेक प्रसंगांची पेरणी मजा आणते. अंतरा लाहिरी यांच्या उत्तम संकलनाने हे प्रसंग जास्त खुलतात.
गीत- संगीत : गाणी फारशी नाहीत. जी आहेत ती संगीतकार रघु दीक्षित यांनी चांगली सजवली आहेत.
अभिनय : तीन मुख्य व्यक्तिरेखांवर आधारलेला हा चित्रपट आहे. सोनम कपूरने उच्च मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारी मायेरा उत्तम साकारली आहे. वडील आणि आपले प्रेम यांतील संतुलन तिने उत्तम राखले आहे. आयुष्यमान खुराणाने सीनियर एक्झिक्युटिव्ह ते बेकार ते वेटर हा बाज चांगला वठवला आहे. तिच्या पैशांवर जगणारा ते स्वाभिमान जागृत झालेला असा प्रवास त्याने लीलया साकारला आहे. कमाल करतात ते ऋषी कपूर, आपल्या नेहमीच्या नैसर्गिक शैलीचा अभिनय करत त्यांनी मुलीच्या पित्याचे बेअरिंग चांगले सांभाळले आहे. सारी सूत्रे आपल्या हाती घेत ऋषी कपूरने बाजी मारली आहे.
सार : आजच्या पिढीचे प्रश्न आणि प्रेम यांच्यावर चुरचुरीत भाष्य करणारा बेवकुफियाँ न पाहणे मूर्खपणाचे ठरेल. दिल्ली आणि दुबईचे नयनरम्य चित्रण यात आहे. ‘इगो’मुळे काय होऊ शकते यापासून ते मंदीचा फटका कसा असू शकतो, त्यामुळे तरुणांनी काय काळजी घ्यावी इथपासून ते करिअरच सर्वश्रेष्ठ नाही, जीवनात प्रेमाचे, पैशाचे काय महत्त्व असते, याचे सुंदर चित्रण पाहण्यासाठी बेवकुफियाँची वारी आवर्जून करावी.