आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: भूतनाथ रिटर्न्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा बघून असं वाटतं, की या सिनेमाचे शीर्षक 'भूतनाथ रिटर्न्स'ऐवजी 'इलेक्शन रिटर्न्स' किंवा 'एनी बडी कॅन व्होट' असे असायला हवे होते. मध्यांतरानंतर अमिताभ बच्चन सिनेमात भूताच्या भूमिकेत असल्याचे बहुतेक दिग्दर्शक नितेश तिवारी विसरले आहेत.
अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि बालकलाकार पार्थचा अभिनय बघण्यासारखा आहे. 'भूतनाथ' या सिनेमाचा मुळ गाभा सिक्वेलमध्ये कुठेतरी हरवला आहे. सिनेमाचे सुरुवातीचे 45 मिनिटे वगळता भूतनाथ रिटर्न्स एक गंभीर आणि राजकारणावर आधारित सिनेमा आहे.
अमिताभ बच्चन आपल्या भाषणात लोकांना मतदान करण्याचे महत्त्व पटवून देताना दिसतात. थो़डक्यात सांगायचे म्हणजे ते या सिनेमात निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहेत. निवडणूक आयोग या सिनेमाचा वापर मतदात्यांची संख्या वाढवण्यासाठी करु शकतो. काही दिवसांनी भूतनाथ रिटर्न्स हा सिनेमा टॅक्स फ्री झाल्याचे ऐकिवात आले, तर नवल मुळीच वाटून घेऊ नका.
कथा -
पुढील जन्म कोणता हवा यासाठी कैलाशनाथ (अमिताभ) भूतवर्ल्डमध्ये जातो. कैलाशनाथ म्हणजेच भूतनाथ. पुढे मानव जन्म हवा हे सांगतो. याठिकाणी मोठी रांग असल्याने त्याला टोकन नं. देऊन वाट पाहण्यास सांगितले जाते. तिथे असलेली प्रत्येक आत्मा त्याला हसत असते. कारण जाणुन घेताना कळते की, भूतनाथ पृथ्वीवर असताना त्याला एका लहान मुलाला घाबरवता येत नाही. भूतवर्ल्डचा मुख्य अधिकारी भूतनाथला संधी द्यावी म्हणून पुन्हा पृथ्वीवर जाऊन कुणाला तर घाबरवून ये असे सांगतो. त्याप्रमाणे पृथ्वीवर आल्यावर मुलांना घाबरविण्याचा तो प्रयत्न करतो. पण, शक्य होत नाही. तेव्हा आक्रोड(पार्थ) त्याला मदत करतो. आक्रोडला भूतनाथ दिसत असतो. तो भूतनाथला घरी नेतो. इतरांना घाबरविण्यात आक्रोडने मदत केल्यामुळे गरीब, झोपडपट्टीत राहणा-या आक्रोडला मदत करण्याचा भूतनाथ प्रयत्न करतो. यात यश येते, आक्रोडला या कामातून पैसा मिळू लागतो. पुढे त्याच परिसरातील खासदार (वास्तविक गुंड) भाऊ (बोमन) त्याला एक काम सोपवितो. भूतनाथ आक्रोड हे काम करायला जातात, तेव्हा भ्रष्टाचाराचा बळी पडून मरण पावलेल्या आत्मा त्यांना भेटतात. भ्रष्टाचाराच्या भीषण वास्तवाकडे लक्ष वेधल्यानंतर भूतनाथने निवडणूक लढवावी असा निर्णय होतो. मग वकिल मिश्ती बहुडकडे येतात. मग अर्ज भरणे, निवडणुकांतील राजकारण, सिद्ध करणे अशा विविध घटना रंजकपणे घडतात. भूतनाथ प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी होतो. भाऊचे सर्व दावपेच उलटतात आणि धारावीमध्ये 95 टक्के मतदान होते. यातच लोकशाहीचा विजय असल्याचे यातून सांगण्यात आले.

अमिताभ बच्चन आणि बालकलाकाराची भूमिका कशी आहे?

पार्थ भालेराव याने केलेला अतिशय निखळ, जिवंत अभिनय प्रेक्षकांना भावणारा आहे. अमिताभ यांच्यासह संजय मिश्रा, बोमन इराणी यांचा सर्वांचाच अभिनय व्यक्तिरेखांना साजेसा आहे. तर बरीच नवी असलेली उषा जाधव ‘धग’ मधल्या यशोदेच्याच भूमिकेप्रमाणे यातही वावरली आहे. पार्थने मात्र सर्वांचे लक्ष वेधले.

शाहरुख खान आणि रणबीर कपूर सिनेमाची भाग आहेत का?
शाहरुख खान आणि रणबीर कपूर काही सेकंदांसाठीच सिनेमात आहे. अनुराग कश्यपने 'भूतनाथ रिटर्न्स'मध्ये कॅमिओ केला आहे.
कसे आहे सिनेमाचे संगीत?
राम संपथने केलेले ‘ये दुनिया पावे पंगे फिर बोले हर हर गंगे’ तर सिनेमाच्या सुरुवातीलाच असलेले ‘ये अपुन का इलाका, फुल बॉलीवुड धमाका’ ही दोन्ही गाणी ताल धरायला लावणारी आहेत. तर ‘साहिब नजर रखना, मौला नजर रखना’ ही गाणी उत्तम जमुन आली आहेत. प्रसंगानुरुप दिलेले संगीत सिनेमाला सूत्रात बांधणारी आहेत. यो यो हनीसिंग आणि अमिताभवर चित्रीत झालेले शेवटचे गाणे प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे.
संवाद कसे आहेत?
सिनेमाचे संवाद अतिशय उत्तमरित्या लिहीण्यात आले आहे. पियुश गुप्ता आणि नितेश तिवारी यांनी निखळ विनोदासोबत, मतदानासाठी जनजागरण करताना अतिशय अचुक संवादलेखन केले आहे. अतिशय जड संवाद लिहून अंर्तमुख करण्याचा प्रयत्न कुठेही केलेला नाही. विनोद गुंफताना व्दिअर्थी संवाद कुठेच नाहीत.
मोठा प्रश्न - सिनेमा बघावा की नाही?
हसत खेळत निवडणुकीत मतदानाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रारंभी बच्चेकंपनीचा वाटणारा हा चित्रपट 18 वर्षांवरील सर्वांसाठी जागरुक करुन जाणारा सिनेमा आहे. धमाल गाणी, उत्तम संवाद चित्रपटाचा आत्मा आहेत. हलकी फुलकी कथा मांडताना कुठेही आक्रमकपणा दिसून येत नाही. अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि पार्थच्या दमदार अभिनयासाठी हा सिनेमा तुम्ही नक्की बघू शकता.