आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : बॉबी जासूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'डर्टी पिक्चर'मधून आपल्या अभिनयाच्या अदांनी सर्वांना घायाळ करणा-या विद्या बालनने नंतर 'कहाणी'मध्येही अभिनयाचे रंग दाखवले होते. त्यामुळे 'बॉबी जासूस' बाबत मोठी उत्सुकता होती. महिला हेर बनलेल्या विद्या बालनची धमाल 'बॉबी जासूस'ला तारणार असे प्रोमोज पाहून वाटले होते. मात्र प्रत्यक्षात काही कळा नसणारी ही हेरकथा निव्वळ पोकळ निघाली. विद्याने आपल्या अभिनयाने, वेगवेगळी रुपे घेऊन 'बॉबी जासूस'मध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र आडातच काही नसल्याने सारे मुसळ केरात गेले आहे.
कथा : बिल्कीस ऊर्फ बॉबी (विद्या बालन) ही हैदराबादेतील मध्यमवर्गीय मुस्लिम कुटूंबातील मुलगी. तिला प्रायव्हेट डिडेक्टीव्ह बनायचे आहे. त्याला अर्थातच तिच्या वडिलांचा विरोध. अनेकांची फुटकळ कामे तिच्याकडे असतात. मात्र अनिस खान (किरण कुमार) बॉबीला मोठे काम देतो. त्यातून बॉबीला भरपूर पैसा मिळत असतो, मात्र आपण काही तरी वाईट करतो आहोत का याचे उत्तर शोधण्यासाठी ती अनिस खानने सोपवलेल्या कामाच्या मुळाशी जाण्याचे ठरवते व त्यानुसार ती केस सोडवते. कशी ती पडद्यावर पाहा.
गीत-संगीत : शंतनू मोइत्रा यांच्या संगीताने सजलेली दोन-चार गाणी यात आहेत. मात्र ती फारशी श्रवणीय नाहीत.
कथा-पटकथा : मूळ कथा दिग्दर्शक समर शेख यांची आहे. पटकथा संयुक्ता चावला शेख यांची आहे. हेरकथा पडद्यावर मांडताना त्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवणा-या प्रसंगांची पेरणी अत्यंत खुबीने करावी लागते. मुळात कथाच दमदार असणे आवश्यक असते. प्रेक्षकांची उत्सुकता जेवढी शिगेला पोहचेल तेवढी हेरकथा रंगते. मात्र 'बॉबी जासूस'मध्ये या सर्वांचा अभाव प्रत्येक फ्रेमगणिक जाणवतो. नायिकेचे हेर म्हणून काम करण्याला काहीच ठोस आधार नाही. त्यातच व्यक्तीरेखा पूर्ण विकसित होत नसल्याने दिग्दर्शकाचा गोंधळ उडालेला स्पष्ट जाणवतो.
अभिनय : विद्या बालनने तिच्या वाट्याला आलेली बॉबी जासूस उत्तम वठवली आहे. वेषांतरे केल्यानंतरची तिची अदाकारी लाजवाब. बाकी पात्रांना फारसा वाव नाही. किरण कुमार ब-याच दिवसांनी पडद्यावर दिसतात. अली फाजल, सुप्रिया पाठक, झरीना वहाब, तन्वी आझमी, राजेंद्र गुप्ता आदींनी फारसा वाव नाही. अनुप्रिया गोयंका (अनेक सरकारी जाहिरातीत दिसणारी) मात्र लक्ष वेधून घेते.
सार : हेरकथा सादर करणे म्हणजे वेगवेगळे वेश बदलून पडद्यावर वावरणे असा काहीसा समज दिग्दर्शक समर शेखचा झाला आणि येथेच सारे घोडे पेंड खाल्ले. वेशभुषेकडे लक्ष केंद्रीत झाल्याने कथेकडे दुर्लक्ष झाले, त्यातून प्रसंग लांबल्याने बॉबी जासूस नीरस बनला. त्यापेक्षा आपल्या सुहास शिरवळकर किंवा नारायण धारपांची एखादी हेरकथा वाचणे केव्हाही उत्तम.