आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : बोल बेबी बोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुरावलेली नाती एका गैरसमजामुळे जुळू पाहत असतात. नाते जुळून यावे म्हणून गैरसमज दूर करता एका खोट्यासाठी दुसरे आणि दुसऱ्यासाठी तिसरे खोटे अशी गंुफण यात आहे. पुन्हा मुजरा पुन्हा गोंधळ या चित्रपटापेक्षा निराळ्या धाटणीची भूमिका बोल बेबी बोलमध्ये मकरंदने साकारली असली तरीही विनोदाचे वेगळे अंग यात आहे. त्यामुळे विनोदात तोचतोपणा जाणवत नाही. राजन अग्रवाल यांनी कथानकासोबत विनय लाड यांना साथीला घेत लिहिलेली पटकथा प्रेक्षकांना बऱ्यापैकी बांधून ठेवते.
कथा:
दुर्गादेवी (अरुणा इराणी) एक प्रतिष्ठित महिला आहे. तिच्या शब्दाबाहेर कुणीही जात नाही. दुर्गादेवीचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास असतो. प्रत्येक काम ज्योतिष्याला विचारूनच ती करते. तिचा मानलेला भाचा नंदू (मकरंद अनासपुरे) तिला असे सर्व सल्ले देत असतो. नंदूच्या सल्ल्याशिवाय दुर्गादेवीचे पान हालत नाही. मुलगा राहुल (अनिकेत विश्वासराव) एका मुलीच्या प्रेमात पडतो. हे दुर्गादेवीला कळल्यावर तिच्याशी लग्न करायचे की नाही यासाठी नंदूला शास्त्र पाहण्यास सांगितले जाते. नंदू शास्त्र पाहून सांगतो की या दोघांचा विवाह झाल्यास संतती होऊ शकत नाही. राहुल मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहून लग्न करतो. दुर्गादेवी रागावून राहुलला घराबाहेर काढते आणि त्याच्यासोबतची सर्व नाती संपवते. एकेदिवशी नंदू राहुलकडे येतो, तेव्हा मांडीवर मूल पाहतो. ते राहुलचे मूल असल्याचा समज होऊन तो ही गोष्ट दुर्गादेवीला सांगतो आणि इथूनच चित्रपटाच्या सर्व गमतीजमती सुरू होतात. दुर्गादेवी नातवाला भेटायला येते, सर्व सुरळीत होऊ पाहतेय म्हणून राहुल काही बोलत नाही. मात्र, दरवेळी वेगळे मूल आहे, ही बाब नंदूच्या लक्षात येते. यानंतर धमाल उडत राहते, नंदू मार खात राहतो. शेवटी मूल कुणाचे हे कळते का, कळल्यावर दुर्गादेवी हे सर्व मान्य करते का, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायला हवा.
अभिनय:
अरुणा इराणींचा अभिनय व्यक्तिरेखेला साजेसा झाला आहे. अतिशय दरारा असलेली प्रतिष्ठित महिला आणि मुलाच्या नातवाच्या प्रेमात हळवी झालेली आई त्यांनी उत्तम साकारली आहे. अनिकेत आणि नेहा यांचा अभिनय बरा झाला आहे. विनोदावरची हुकूमत सिद्ध करत मकरंद यांनी पुन्हा एकदा कौशल्य सिद्ध केले आहे. आयटम साँगमध्ये त्यांचे वेगळे रूप पाहायला मिळते.
संगीत:
निशिकांत सदाफुले यांनी संगीत दिलेले आहे. आयटम साँग धमाल आहे. बाकी गाणीही चांगली झाली आहेत.

संवाद:
संजय बेलोसे यांनी लिहिलेले संवाद सर्वांच्या तोंडी असलेलेच असल्याने विनोदाची जुगलबंदी सहज पेरता आली आहे.
सार:
गैर समजातून घडणाऱ्या विनोदात कथा गुंफण्यात आली आहे. अरुणा इराणींना मराठीत पाहणे चांगला अनुभव आहे. त्यांना पाहताना अनेकदा 'बेटा' चित्रपटातील सासूच्या भूमिकेची आठवण येते. मकरंद अनासपुरे यांनी चित्रपटात चांगलीच धमाल उडवून देत संपूर्ण चित्रपट एकहाती खेचला आहे.