आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: सिटी लाइट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखात जगणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याकडे असणार्‍या सुखांची खरी जाणीव समोरच्यांची दु:ख पाहून होते. हाच फंडा वापरून सुरक्षित समाज व्यवस्थेत जगणार्‍या लोकांच्या जाणिवा जागृत करणारा चित्रपट तयार केला आहे. परप्रांतीयांच्या नावाने ओरड करणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या मनात माणुसकीची भावना निर्माण करण्याचे काम सिटी लाइट्स करतो. एका छोट्या खेड्यातून आपली उपजीविका भागविण्यासाठी शहरात येणार्‍या कुटुंबाची रंजक पण वास्तविक गोष्ट या चित्रपटात मांडली आहे. ब्रिटिश चित्रपट 'मेट्रो मॅनिला'चा हा रिमेक आहे.
कथा : पूर्वी सैन्यात असलेला दीपक (राजकुमार राव) उपजीविकेसाठी राजस्थानमधून पत्नी राखी (पत्रलेखा) आणि मुलगी माहीसह मुंबई शहरात येतो. गावात प्रचंड हाल, नुकसान सहन केलेला हिरो मुंबईत येऊन खिशात आहेत तेवढे पैसे घालवून फसतो. दोन दिवस रस्त्यावर काढल्यानंतर हे कुटुंब एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीत राहायला लागते. परिस्थिती अगदीच हालाखीची असल्याने पडेल ते काम करण्याच्या इच्छेने राखी डान्स बारमध्ये काम सुरू करते. दीपक एका प्रायव्हेट सिक्युरिटी ब्युरोमध्ये कामाला लागतो, तिथेही त्याचा घात होतो. पैसा आणि अनैतिक घटनांच्या जाळ्यात अडकत जाणारा, भीषण वास्तव जगणारा हिरो शेवटी त्यातून मार्ग काढण्यासाठी जिवाची बाजी लावून प्रयत्न करताना दाखवला आहे.
संवाद : राजस्थानी लहेजाचे मुख्य पात्रांचे संवाद इनोसन्ट वाटतात. चित्रपटाची स्टोरी लिहिताना फार मेहनत केलेली जाणवत नाही. संवादांमध्ये फारशी आकर्षकता नसली तरी हे संवाद त्या-त्या प्रसंगांना उभारी देतात. अतिशय साधा, प्रामाणिक व्यक्ती दीपक संवादांमुळे रंगवतो. काही परखड वाक्यांतून चित्रपट थोडा निगेटिव्ह वळणं घेतो असं वाटतं; पण नंतर सावरतो. विशेष लक्षात राहाणारे संवाद किंवा हिरोईक वाक्ये चित्रपटात नाहीत. यामुळे चित्रपटाची वास्तविकता टिकून राहिली आहे. चित्रपटातील लहान मुलगी माही संपूर्ण चित्रपटात एकही वाक्य बोलल्याचं मात्र कुठेही आठवत नाही हे एक विशेष.
अभिनय : राजकुमार राव अभिनयात अव्वल ठरतो. त्याच्या अभिनयात जिवंतपणा जाणवतो. त्याच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संवादांपेक्षा अभिनयाने जास्त केले आहे. अभिनेत्री पत्रलेखाचा हा पहिलाच चित्रपट आहे, ती जशी नाजुक, निष्पाप दिसते तशीच भूमिका तिने साकारली आहे. तिच्या दिसण्यामुळेच कदाचित चित्रपटातील काही बोल्ड दृश्ये ओंगळ वाटत नाहीत. दोन्ही मुख्य पात्रांनी अभिनयात कोणतीही कसर सोडलेली नाही. पण, काही ठिकाणी या जोडप्याच्या बिचारेपणाचा कळस झालेला जाणवतो तोही अभिनयामुळेच.
संगीत : चित्रपटाचे संगीत अप्रतिम आहे. धिंगाणा गाणी ऐकण्याची सवय असणार्‍यांना ते पसंतीस पडणार नाही हेही तितकेच खरे. ज्यांना जुन्या धाटणीतली गाणी आवडतात, प्रामुख्याने प्रेमगीते त्यांच्यासाठी चित्रपटात भरपूर गाणी आहेत. बर्‍याच दिवसांपासून या चित्रपटाचं 'मुस्कुराने की वजहा तुम हो, गुनगुनाने की वजहा तुम हो' हे गाणं चित्रपटात चपखल बसतं. नजरेला आणि कानांना सुखावणारी गाणी असल्याने चित्रपट अजून जवळचा वाटतो.
सार : चित्रपटाची स्टोरी लाइन एकच आहे, ती शेवटपर्यंत एकचराहाते. चित्रपट कुठेही ताणल्यासारखा किंवा रटाळ वाटत नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीसोबत इतक्या वाईट घडामोडी का घडाव्या, असा प्रश्न पडत राहातो. भीषण वास्तव दाखवण्याच्या नादात हिरो जास्तच गरीब वाटतो. त्याच्यात कुठेतरी चार्म दिसावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा वाढत राहाते. चित्रपटाचा शेवट चांगला होऊ शकला असता; पण वेगळ्या शेवटामुळे निदान बॉलिवूड स्टाइल हॅपी एंडिंगच्या चौकटी चित्रपट भेदतो. उथळ विचारसरणीने चित्रपट पाहिल्यास हिरमोड होणार नाही.