आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षभरापासून विविध पुरस्कारांमुळे चर्चेत असलेला शिवाजी लोटण पाटील दिग्दर्शित ‘धग’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. स्मशानात राहणा-या स्मशानजोगी कुटूंबाची कहाणी, आपल्या आधुनिक जगात वावरणा-या प्रत्येकाचे लक्ष वेधणारी आहे.
पिढ्यान पिढ्या एकच व्यावसाय करणारा समाज आजही अस्तित्त्वात आहे. मात्र, आपल्या व्यवसायाला छेद देऊन पूढे जाण्याची वाट निवडताना होणारी सामाजिक, आर्थिक आणि भावनिक घालमेल चित्रपटातून उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात आली आहे. कथा-पटकथा आणि संवादलेखक नितीन दिक्षित यांनी अतिशय अचुकरित्या या समाजाचे वास्तव आणि नवी पिढी यांची ही कथा मांडली आहे. चित्रीकरणासाठी खांदेशातील चाळीसगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाची केलेली निवड चित्रपटाला वास्तवाशी जोडते. उत्तम तंत्रकौशल्य, दर्जेदार अभिनय, जबरदस्त कथा-पटकथा यामुळे चित्रपट एक परिपूर्ण कलाकृती ठरला आहे. कुठलीही बिभत्सपणा न दाखवता चित्रपटातून अचुक संदेश देण्याचे कौशल्य दिग्दर्शक, पटकथाकरांनी साधता आले आहे.
चित्रपटाचा बालकलाकार हंसराज जगताप आणि अभिनेत्री उषा जाधव यांनी चित्रपटावर छाप टाकली आहे. हंसराजला मिळालेल्या पहिल्याच संधीचे त्याने सोने केले आहे, तर उषानेही आपल्या अभिनयाच्या जोरावर पुरस्कार पदरात पाडून घेतले. गेल्याच अठवड्यात शहरातील कलावंतांना घेऊन केलेला शिवाजी पाटील यांचा ‘फेमस’ चित्रपट मात्र, धगपूढे अतिशय तोकडा वाटतो. एकाच दिग्दर्शकाने केलेल्या या दोन्ही चित्रपटांत कमालीची तफावत असल्याचे दिसून येते. समाजाच्या वास्तव मानसिकतेचा वेध, परिस्थिती आणि मनाची घालमेल यातील प्रत्येक प्रसंगातून कलावंत, दिग्दर्शकाने जिवंत ठेवली आहे.
कथा
शिरपा या स्मशान जोग्याचे कुटूंब गावातील स्मशानाची जबाबदारी सांभाळून आहे. आई, दोन मुले आणि (यशोदा)पत्नीसह कुटूंबाचा उदरनिर्वाह, मयताची विल्हेवाट आणि कुंभाराकडे घडे घडवून शिरपा करत असतो. शिरपाला हे काम कधीच करायचे नव्हते, पण शिक्षण-शेती नसल्याने पर्याय नसतो. मुलगा किस्नालाही स्मशानजोग्याचे काम मुळीच आवडत नसते. किस्नाला हे काम करावे लागू नये अशी शिरपा आणि यशोदा यांची इच्छा असते. साप चावल्याने शिरपाचा मृत्यू होतो. किस्ना स्मशानाचे काम नाकारतो, पण मग शिरपाचा मित्र(मंगेश) हे काम करण्यास मदत करु लागतो. मित्राच्या कुटूंबाची जबाबदारी स्वत:वर घेतो. मात्र, यामुळे गावात यशोदा आणि त्याचे अनैतिक संबंध असल्याच्या चर्चेला उधाण येते. तेव्हा सासू यशोदाला मंगेशला खुश करण्याचा सल्ला देते. तसे केले तरच आपण जीवन काढू शकू हे वास्तव ती सूनेपुढे मांडते. आईला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणार या विचारांनी किस्ना अस्वस्थ होतो आणि स्मशानजोग्याचे काम हाती घेतो. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर हे काम करुनच बाहेर पडावे लागणार हे वास्तव तो कुटूंबाला सांगतो.
संवाद
गावातील स्मशान जोगी कुटूंब ज्या पद्धतीने संवादफेक करत असेल त्याच पद्धतीचे संवादलेखन करण्यात आले आहे. चित्रपटातील दोन्ही बालकलाकार व इतर सहायक कलावंतांनी भाषेचा लहेजा अगदी अचुक साधला. तसेच उषा जाधवच्या संवादातूनही ग्रामीण स्त्री अतिशय अचुकरित्या ध्वनीत होते. तर उपेंद्र लिमयेंच्या तोंडी असलेल्या संवादात मात्र अनेकदा मुंबईय्या टोन असल्याचे जाणवते.
अभिनय
कलावंताने भूमिकेत शिरकाव केला तर होणारा नैसर्गिक अभिनय कलाकृतीत जीवंतपणा आणतो. उषा जाधव ही सावळ्या रंगाची अभिनेत्री चित्रपटावरर असलेल्या सहज वावरातून प्रेक्षकांचे लक्ष वेधते. सहज संवादफेक, चपळाईपूर्ण देहबोली, चरचरीत चेहरा यातून ती प्रेक्षकांच्या मनात पोहचते. तर अनेक चित्रपटांतून दमदार भूमिका निभावलेले उपेंद्र लिमये यांचा अभिनय भूमिकेला साजेसा होता. कुठेही भडकपणा अभिनयात दिसून येत नाही. आपल्या मुलाने स्मशान जोग्याचे काम करु नये, हे सांगताना संवेदनशील, हळवा होणा-या बापाच्या चेह-यावरील करुण भाव प्रेक्षकांच्या मनाला भिडतात.
संगीत
आदि रामचंद्र यांच्या आवाजातील ‘धग’ हे थिम गाणे, त्यातील आशयघन शब्दांमुळे वेगळेपण राखून आहे. चित्रपटार अनेक प्रसंगात हे गीत परिस्थितीनूसार चालते.
सार
समाजाचा एक घटक म्हणून शहर किंवा गावात प्रत्येक ठिकाणी असणारे स्मशान जोग्याचे कुटूंब आणि त्यांची मानसिकता यातून दाखविण्यात आली. प्रत्येकाला या कुटूंबाचा आधार घरातील मौतीच्या महत्त्वाच्या प्रसंगात घ्यावा लागतो, पण आपल्याप्रमाणेच यांचीही स्वप्ने आहेत, त्यांनाही यश, प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा याचा समाजाला विसर पडला आहे. परिस्थितीशी तडजोड करुन कशा पद्धतीने रहावे लागत असते, हा संदेश चित्रपटाने उत्तमरित्या दिला आहे.